बेळगुंदी रस्त्यावरील धोकादायक झाडे हटवा

स्थानिक नागरिकांची मागणी : वनखात्याच्या अधिकाऱ्यांना पाहणी करण्याचे आवाहन वार्ताहर /किणये  बेळगुंदी स्मशानभूमीजवळ झाड कोसळून तीन दिवसांपूर्वी कर्ले गावातील दोन तऊण  ठार झाले होते. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. यामुळे कर्ले गावावर शोककळा पसरली. कुटुंबीयही आपल्या घरातील युवक अशा प्रकारे मृत्युमुखी पडल्यामुळे हतबल झाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, ज्या […]

बेळगुंदी रस्त्यावरील धोकादायक झाडे हटवा

स्थानिक नागरिकांची मागणी : वनखात्याच्या अधिकाऱ्यांना पाहणी करण्याचे आवाहन
वार्ताहर /किणये 
बेळगुंदी स्मशानभूमीजवळ झाड कोसळून तीन दिवसांपूर्वी कर्ले गावातील दोन तऊण  ठार झाले होते. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. यामुळे कर्ले गावावर शोककळा पसरली. कुटुंबीयही आपल्या घरातील युवक अशा प्रकारे मृत्युमुखी पडल्यामुळे हतबल झाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, ज्या कोसळण्याच्या अवस्थेत असणाऱ्या झाडामुळे या तऊणांचा बळी गेला यावर आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. बेळगुंदी, शिवाजीनगर येथील स्मशानभूमीजवळ अनेक झाडे कोसळण्याच्या मार्गावर आहेत. या रस्त्यावरून ये-जा करताना अनेकांच्या छातीत धडकी भरू लागली आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन वन खात्याने धोकादायक झाडे व फांद्या तोडणे अत्यंत गरजेचे आहे.
बेळगुंदी-राकसकोप मुख्य रस्त्यावर यापूर्वीही अनेकदा पावसाळ्याच्या दिवसामध्ये झाडांच्या फांद्या कोसळल्या आहेत. तसेच झाडेही कोसळली आहेत. मात्र, यापूर्वी केवळ किरकोळ अपघातांच्या घटना घडल्या होत्या. पण गत तीन दिवसांपूर्वी झाड कोसळून दोन तऊण ठार झाले आणि एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे आता प्रशासनाने जागे होण्याची वेळ आलेली आहे. बिजगर्णी-बेळगुंदी स्मशानभूमीजवळील रस्त्यावरून व बेळगुंदी-राकसकोप रस्त्यावरून रोज बेळगुंदी, बिजगर्णा, सोनोली, यळेबैल, राकसकोप, कावळेवाडी, इनाम बडस, बाकनूर आदी भागातील व पश्चिम परिसरातील वाहनधारकांची रोज मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. यामुळे या धोकादायक झाडांच्या फांद्या व कोसळण्याच्या अवस्थेत असणारी झाडे प्रवाशांना धोकादायक बनली आहेत.
धोकादायक झाडांची तोड व्हावी
यापूर्वीसुद्धा बेळगुंदी स्मशानभूमीजवळ अनेक झाडे कोसळली आहेत. यामुळे कावळेवाडी व बिजगर्णी गावातील बरेच नागरिक जखमीही झालेले आहेत. अशा घटनांचे आमच्याकडे पुरावेसुद्धा आहेत. वास्तविक ही झाडे कोसळून पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी झाडांची पाहणी करणे गरजेचे आहे. जी झाडे कोसळण्याच्या स्थितीत आहेत व ज्या फांद्या पडण्याच्या अवस्थेत आहेत त्यांची तोड करायला हवी. याचबरोबर बेळगुंदी-बिजगर्णी, बेळगुंदी-राकसकोप या रस्त्यांच्या आजूबाजूला झाडेझुडुपे वाढलेली आहेत. याची सार्वजनिक बांधकाम खात्याने साफसफाई करण्याची गरज आहे.
– अॅड. नामदेव मोरे, कावळेवाडी