फेरपरीक्षा घेता येणार नाही

सर्वोच्च न्यायालयाचा सुस्पष्ट निर्णय : पद्धतशीर गैरप्रकाराचे पुरावे नसल्याचे कारण वृत्तसंस्था/ नवी दिल्ली ग्रेस गुणांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या नीट परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी मोठा निर्णय घेतला आहे. ही परीक्षा पुन्हा घेता येणार नसल्याचे न्यायालयाने सुस्पष्टपणे म्हटले आहे. नीट युजीचे निकाल पूर्णपणे चुकीचे आहेत आणि परीक्षेत पद्धतशीरपणे गैरप्रकार झाला आहे, हे दर्शवणारे पुरेसे पुरावे नाहीत. त्यामुळे […]

फेरपरीक्षा घेता येणार नाही

सर्वोच्च न्यायालयाचा सुस्पष्ट निर्णय : पद्धतशीर गैरप्रकाराचे पुरावे नसल्याचे कारण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ग्रेस गुणांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या नीट परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी मोठा निर्णय घेतला आहे. ही परीक्षा पुन्हा घेता येणार नसल्याचे न्यायालयाने सुस्पष्टपणे म्हटले आहे. नीट युजीचे निकाल पूर्णपणे चुकीचे आहेत आणि परीक्षेत पद्धतशीरपणे गैरप्रकार झाला आहे, हे दर्शवणारे पुरेसे पुरावे नाहीत. त्यामुळे ही परीक्षा पुन्हा घेता येणार नसल्याचे खंडपीठाचे मत झाले असल्याचे म्हटले आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठापुढे याबाबत सुनावणी झाली.
यंदाची नीट युजी परीक्षा 5 मे रोजी घेण्यात आली होती. 24 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. 4 जून रोजी याचा निकाल लागला. तथापि तब्बल 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाल्याचे आणि त्यांच्यातील 6 विद्यार्थी एकाच केंद्रातील असल्याचे समोर आल्याने मोठा संशयकल्लोळ निर्माण झाला होता. त्यानंतर या परीक्षेबाबत विविध ठिकाणी याचिका दाखल करण्यात आल्या. या सर्व याचिकांची सुनावणी गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. सर्वोच्च न्यायालयाने या परीक्षेवरुन एनटीए आणि केंद्र सरकारवरही कडक ताशेरे ओढले होते. त्यामुळे याप्रकरणी काय निकाल येतो याकडे विद्यार्थ्यांसह देशाचे लक्ष लागले होते. याचिकाकर्त्यांचे वकिल आणि सॉलिसिटर जनरल यांचा युक्तिवाद झाल्यानंतर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी निकालाचे वाचन केले.
पुरावे पुरेसे नाहीत
चंद्रचूड म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने परीक्षेमध्ये झालेल्या अनियमिततेप्रकरणी 8 जुलै रोजी अंतरिम आदेश दिला होता. त्याचवेळी केंद्र सरकार एनटीए आणि सीबीआयकडे या परीक्षेतील गडबड घोटाळ्याबाबत खुलासा मागवला होता. सीबीआयचे अतिरिक्त संचालक श्रीकृष्ण यांनी न्यायालयात उपस्थित राहून याविषयीची माहिती दिली होती. नीट युजीचे निकाल पूर्णपणे चुकीचे आहेत आणि परीक्षेच्या पावित्र्यामध्ये पद्धतशीरपणे उल्लंघन झाले आहे, हे दर्शवणारे पुरेसे पुरावे नाहीत. त्यामुळे नीट युजी परीक्षा पुन्हा घेता येणार नाही, असे आमचे स्पष्ट मत झाले असल्याचे सांगितले.
वैयक्तिक दाद मागू शकतात
दरम्यान, या निर्णयानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या या खंडपिठाने उमेदवारांना आणखी काही सूचना केल्या आहेत. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले, ज्या उमेदवारांच्या वैयक्तिक तक्रारी आहेत ते त्यांच्या प्रकरणांबाबत उच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकतात. ती त्यांची वैयक्तिक बाब ठरवली जावी. उच्च न्यायालय त्याविषयी योग्य ती कारवाई करण्याबाबत सूचना करु शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रश्न 19 साठी पर्याय 4 हे बरोबर उत्तर
यंदाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 19 वरुनही मोठा वाद निर्माण झाला होता. फिजिक्स विषयातील या प्रश्नाला दिलेल्या चारपैकी 2 पर्याय योग्य उत्तर ठरणारे होते. या प्रश्नाचे उत्तर निश्चित करण्यासाठी दिल्ली आयआयटीतील तज्ञांची समितीही नियुक्त करावी लागली होती. या समितीने मंगळवारी न्यायालयाच्या आदेशानुसार अहवाल दिला. त्यावर बोलताना सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, आम्हाला आयआयटी दिल्लीने स्थापन केलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार पर्याय 4 हे बरोबर उत्तर आहे. त्यामुळे याप्रश्नी अन्य पर्याय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांचे त्याचे गुण कमी होणार आहेत, असेही सांगितले.
याचिकाकर्त्यांचा परीक्षाव्यवस्थेवर नाराजी
नीट युजी परीक्षेमधील गैरव्यवहार उघड झाला असल्याने या परीक्षेचे पावित्र्य नष्ट झाले असल्याची खंत याचिकाकर्त्यांचे वकील अॅड. नरेंद्र हुडा यांनी सुनावणीवेळी व्यक्त केली. काही विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका 20 मिनिटे उशीरा मिळाल्याचे तसेच ती प्रश्नपत्रिका त्यानी पहिले तीन तास व नंतर पुढचे तीन तास जवळ ठेवली होती. त्यामुळे काहींना तीन तास तर काहींना 6 तास 20 मिनिटे मिळाले. हा सर्व प्रकार परीक्षेचे पावित्र्य नष्ट करणारा असल्याचे ते म्हणाले.
पेपरफुटीचे 155 लाभार्थी
सरकारची बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल म्हणाले, आम्ही केवळ 2 ते 5 केंद्रावर गैरप्रकार झाल्याची भीती व्यक्त केली होती. टॉपचे 100 विद्यार्थी हे सुमारे 95 केंद्रे, 56 शहरे आणि 18 राज्ये व केंद्रशासीत प्रदेशातील आहेत. या पेपरफुटीचा गैरफायदा केवळ 155 लोकांना झाला असल्याचे आमचे म्हणणे आहे. यातील दोघांना 573 व 518 गुण तर बाकींना फक्त 11 गुण मिळाल्याचे त्यांनी समोर आणले. त्यावर सरन्यायाधीशांनी समाज माध्यमांवर प्रसिद्ध झालेल्या प्रश्नपत्रिकेबाबत विचारणा केली. तथापि पेपर तोच असल्याचा कोणताही फॉरेन्सिक अहवाल नसल्याचे सॉलिसिटर जनरल यांनी म्हटले आहे.  फेर परीक्षा जाहीर केल्यावर 1563 पैकी 816 जण परीक्षेस बसले. त्यांचे ग्रेस गुणे उणे असतानाही त्यांना चांगले गुण मिळाले आहेत. या परीक्षेच्या सर्वच प्रक्रियेबाबत आम्ही न्यायालयाला माहिती दिली आहे. न्यायालयापासून काहीही लपवणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
सवालजबाबाच्या फैरी
या सुनावणवेळी खंडपीठ आणि वकिल यांच्यामध्ये सवाल जबाबाच्या फैरी झडल्याचे दिसले. नीट परीक्षेचा पर्सेंटाईल दरवर्षी 50 च असतो काय अशी विचारणा खंडपिठाने केली. यंदा हे पर्सेंटाईल 164 आहे त्यामुळे 12.5 लाख विद्यार्थी समुपदेशन प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात, असे सॉलिसिटर जनरल यांनी उत्तर दिले. तसेच दरवर्षी हे पर्सेटाईल बदलत असते. गेल्या वर्षी ते 137 असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यंदा ते वाढले असल्याचेही सांगितले.
फेरपरीक्षा न घेतल्यास अन्याय
याचिकाकर्त्यांचे वकील अॅड. नरेंद्र हुडा यांनी न्यायालयाने फेरपरीक्षेचा निर्णय न घेतल्यास मुलांवर अन्याय होईल, असा दावा केला. या पेपरफुटीतील मुख्य आरोपी संजीव मुखिया आहे. पेपर फुटला, तो व्हॉटसअॅपवरुन व्हायरल झाला. बिहारच्या हजारीबाग, पाटण येथील उमेदवारांना त्याचा फायदा झाला असल्याचा जबाबही आरोपींनी तपास संस्थांसमोर दिला आहे. मात्र या घटनेनंतर एकही मोबाईल जप्त न झाल्याने येथेच गैरप्रकार झाला असे कसे म्हणता येईल, असा सवाल केला. संजीव मुखीयाने 200 ठिकाणी पेपर पाठवल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या गैरप्रकारची व्याप्ती मोठी असल्याचाही दावा त्यांनी केला.
सरन्यायाधीशांनी फटकारले
हा युक्तिवाद सुरु असतानाच अॅड. मॅथ्युज नेदुमपारा यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. तथापी सरन्यायाधीशांनी त्यांना रोखले, नंतर वेळ दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. परंतु तरीही नेदुमपारा यांनी वक्तव्य सुरुच ठेवल्याने सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी त्यांना इशारा दिला. त्यावरही नेदुमपारा यांची टकळी सुरुच राहिल्याने सरन्यायाधीश चंद्रचूड यांना राग आवरता आला नाही. मला आपल्याला बाहेर पाठवण्याचे आदेश द्यावे लागतील, ते योग्य होणारा नाही, हे निंदनीय आहे, अशा शब्दांमध्ये संताप व्यक्त केला. त्यानंतर नेदुमपारा बाहेर गेले. तथापि काहीकाळाने ते परत आले आणि त्यांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांची माफी मागितली. त्याचबरोबर नीट युजी फेरपरीक्षा घेण्याशिवाय पर्याय नसल्याचेही मत मांडले.
आतापर्यंत काय घडलं?
5 मे 2024 रोजी नीट परीक्षा झाली. 4 जून 2024 रोजी निकाल जाहीर झाला. तब्बल 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण. तर काहींना 720 पैकी 718, 719 गुण मिळाले. हरियाणाच्या एकाच केंद्रातील 6 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले. यामुळे परीक्षेतील अनियमिततेबद्दल शंका निर्माण झाली.67 विद्यार्थ्यांना ग्रेस गुण देण्यात आल्यानेच पैकीच्या पैकी गुण मिळाल्याचा आरोप करण्यात आला.