बिजगर्णीत भंडाऱ्याच्या उधळणीत रथोत्सव

यात्रेला उत्साहात प्रारंभ : विवाहसोहळ्याला लक्षणीय गर्दी : पै-पाहुण्यांनी गावे गजबजली वार्ताहर /किणये ढोल, ताशा व पारंपरिक वाद्यांच्या गजरात महालक्ष्मी देवीच्या जयघोषात व भंडाऱ्याच्या उधळणीत बुधवारी बिजगर्णी येथील महालक्ष्मी देवीची रथोत्सव मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत भक्तांचा उत्साह दिसून आला. 30 वर्षांनंतर देवीच्या यात्रेला आलेल्या सर्व भक्तांमध्ये चैतन्य निर्माण झाले होते. बिजगर्णी, कावळेवाडी, राकसकोप (मोरे […]

बिजगर्णीत भंडाऱ्याच्या उधळणीत रथोत्सव

यात्रेला उत्साहात प्रारंभ : विवाहसोहळ्याला लक्षणीय गर्दी : पै-पाहुण्यांनी गावे गजबजली
वार्ताहर /किणये
ढोल, ताशा व पारंपरिक वाद्यांच्या गजरात महालक्ष्मी देवीच्या जयघोषात व भंडाऱ्याच्या उधळणीत बुधवारी बिजगर्णी येथील महालक्ष्मी देवीची रथोत्सव मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत भक्तांचा उत्साह दिसून आला. 30 वर्षांनंतर देवीच्या यात्रेला आलेल्या सर्व भक्तांमध्ये चैतन्य निर्माण झाले होते. बिजगर्णी, कावळेवाडी, राकसकोप (मोरे बंधू) या गावांमधील जागृत महालक्ष्मीदेवी यात्रेला मंगळवार दि. 16 पासून सुरुवात झाली. मंगळवारी सकाळी पारंपरिक वाद्यांच्या गजरात गावातील सर्व देवदेवतांची पूजा करण्यात आली. सायंकाळी देवीचा विधिवत हळदी कार्यक्रम झाला. यावेळी महिलांची लक्षणीय गर्दी होती. बिजगर्णीतील कलमेश्वर मंदिरसमोर बुधवारी सूर्योदयाला महालक्ष्मीदेवीचा विवाहसोहळा झाला. यावेळी हजारो भक्तांनी उपस्थिती दर्शविली होती. विधिवत पूजेनंतर यात्रा कमिटी, पुजारी व हक्कदार आणि ग्रामस्थांच्यावतीने पूजा करण्यात आली. त्यानंतर देवीला गोड नैवेद्य दाखविण्यात आला.
देवी रथावर विराजमान झाल्यानंतर भंडाऱ्याची उधळण करत रथोत्सव मिरवणुकीला सुरुवात झाली. हा रथ अगसगे येथून आणण्यात आला आहे. हा रथ  सुमारे 7 फूट उंच बनविला आहे. रथोत्सव मिरवणुकीत भंडाऱ्याची उधळण करत तरुण-तरुणी व महिला आनंदोत्सव साजरा करत होत्या. हेस्कॉम अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रथोत्सव मिरवणुकीत बरीच मेहनत घेतली. गल्ल्यांमध्ये येणाऱ्या विद्युततारा बाजूला करून रथ गेल्यानंतर त्या पुन्हा जोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. बुधवारी पहाटेच वडगाव ग्रामीण पोलिसांनी बिजगर्णी गावात चोख बंदोबस्त ठेवला आहे. रथोत्सव मिरवणुकीत यात्रा कमिटी अध्यक्ष वसंत अष्टेकर, ग्रा. पं. अध्यक्ष मनोहर बेळगावकर, अॅड. नामदेव मोरे, चांगदेव जाधव, यल्लाप्पा बेळगावकर, मारुती जाधव, श्रीरंग भाष्कळ, पुंडलिक जाधव, ताराचंद जाधव, बंडू भाष्कळ, निंगाप्पा जाधव, यशवंत जाधव, परशराम भाष्कळ, अब्दुल नावगेकर, संदीप अष्टेकर आदी यात्रा कमिटी सदस्य उपस्थित होते. गावभर रथोत्सव मिरवणुकीनंतर बुधवारी सायंकाळी प्राथमिक मराठी शाळेच्या आवारातील सुवर्ण मंदिराच्या सभामंडपात देवी विराजमान झाली. त्यानंतर गावच्यावतीने देवीची ओटी भरण्यात आली. या कालात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.