आणखी एका खासदाराचा वायएसआर काँग्रेसला रामराम

जगनमोहन रेड्डी यांच्यासमोरील आव्हान वाढले वृत्तसंस्था/ अमरावती आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी आंध्रप्रदेशात जगनमोहन रेड्डी यांच्यासमोरील आव्हाने वाढत आहेत. त्यांच्या पक्षाच्या आणखी एक खासदाराने राजीनामा दिला आहे. लावू श्री कृष्णा देवरायलु यांनी मंगळवारी संसद सदस्यत्वासोबत पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. 40 वर्षीय देवरायलु हे पालनाडु जिल्ह्यातील नारसराओपेट मतदारसंघाचे खासदार हाते. देवरायलु यांनी मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेस […]

आणखी एका खासदाराचा वायएसआर काँग्रेसला रामराम

जगनमोहन रेड्डी यांच्यासमोरील आव्हान वाढले
वृत्तसंस्था/ अमरावती
आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी आंध्रप्रदेशात जगनमोहन रेड्डी यांच्यासमोरील आव्हाने वाढत आहेत. त्यांच्या पक्षाच्या आणखी एक खासदाराने राजीनामा दिला आहे. लावू श्री कृष्णा देवरायलु यांनी मंगळवारी संसद सदस्यत्वासोबत पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. 40 वर्षीय देवरायलु हे पालनाडु जिल्ह्यातील नारसराओपेट मतदारसंघाचे खासदार हाते. देवरायलु यांनी मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेस प्रमुख जगनमोहन रेड्डी यांना स्वत:च्या राजीनाम्याचे पत्र पाठविले आहे. पक्षाच्या दबावामुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे.
अलिकडच्या काळात वायएसआर काँग्रेसच्या तिसऱ्या खासदाराने पक्ष सोडला आहे. यापूर्वी कुरनूलचे खासदार डॉक्टर संजीव कुमार आणि माचिलिपट्टणमचे खासदार वल्लभनेनी बालाशौरी यांनी राजीनामा दिला होता. पक्षनेतृत्वाने मला स्वत:चा मतदारसंघ बदलण्याची सूचना केली होती. येथे माझ्याऐवजी ओबीसी उमेदवार उभा करण्याची तयारी सुरू होती असे देवरायलु यांनी सांगितले आहे.
मागील 6 महिन्यांपासून माझ्या मतदारसंघावरून पक्षात अनिश्चितता आहे. मागील दोन आठवड्यांपासून मतदारसंघ बदलण्यासाठी माझ्यावर मोठा दबाव होता. खरं बोलायचे झाल्यास मला पक्षात एकाकी पाडण्यात आले होते. ही अनिश्चितता संपविण्यासाठी मी पक्षातून बाहेर पडणे योग्य समजले असे उद्गार देवरायलु यांनी काढले आहेत.
नारसराओपेट मतदारसंघात स्थानिक नेते नागार्जुन यादव यांना उमेदवारी देण्याची जगनमोहन यांची इच्छा आहे. स्वत:च्या राजकीय भवितव्याबद्दल सध्या कुठलाच निर्णय घेतलेला नाही. अन्य पक्षांकडून अद्याप प्रस्ताव मिळाला नसल्याचे देवरायलु यांनी सांगितले आहे. तर देवरायलु हे लवकरच तेलगू देसम पक्षात सामील होणार असल्याची चर्चा आहे.
13 जानेवारी रोजी माचिलीपट्टणमचे खासदार वल्लभनेनी बालाशौरी यांनी पक्षाला रामराम ठोकला होता. त्यानंतर त्यांनी जनसेना पक्षाचे अध्यक्ष पवन कल्याण यांची भेट घेतली होती. तर 10 जानेवारी रोजी कुरनूलचे खासदार डॉक्टर संजय कुमार यांनी पक्षासोबत लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. ओंगोलचे खासदार मगुंता श्रीनिवासुलु रेड्डीही लवकरच वायएसआर काँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याचे मानले जात आहे.