रामकृष्ण नायक गोवा-महाराष्ट्राला जोडणारा सांस्कृतिक दुवा होते

आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर यांचे उद्गार फोंडा : रामकृष्ण नायक यांचे सामाजिक आकलन उच्च कोटीचे होते. त्यांनी राबविलेल्या प्रत्येक सामाजिक प्रकल्पामागे उत्तुंग ध्येय दिसते. जीवनात अजून खूप काही करण्याचा ध्यास ते अखेरपर्यंत उराशी बाळगून होते. सामाजिक जीवनात आपण त्यांच्यामुळेच ओढलो गेलो. माणूस म्हणून ते वेगळेच रसायन होते. गोवा व महाराष्ट्राला जोडणारे ते सांस्कृतिक दूवा होते, […]

रामकृष्ण नायक गोवा-महाराष्ट्राला जोडणारा सांस्कृतिक दुवा होते

आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर यांचे उद्गार
फोंडा : रामकृष्ण नायक यांचे सामाजिक आकलन उच्च कोटीचे होते. त्यांनी राबविलेल्या प्रत्येक सामाजिक प्रकल्पामागे उत्तुंग ध्येय दिसते. जीवनात अजून खूप काही करण्याचा ध्यास ते अखेरपर्यंत उराशी बाळगून होते. सामाजिक जीवनात आपण त्यांच्यामुळेच ओढलो गेलो. माणूस म्हणून ते वेगळेच रसायन होते. गोवा व महाराष्ट्राला जोडणारे ते सांस्कृतिक दूवा होते, अशी भावना ख्यातनाम शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केली. धी गोवा हिंदू असोसिएशनचे अर्ध्वयु दिवंगत स्व. रामकृष्ण नायक यांच्या निधनाला एक महिना पूर्ण झाल्याने बांदोडा येथील स्नेहमंदिरमध्ये आयोजित केलेल्या ‘स्मृतीसंध्या’ कार्यक्रमात डॉ. काकोडकर बोलत होते. काल रविवारी सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमात डॉ. काकोडकर व ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांनी रामकृष्ण नायक यांच्या सहवासातील स्मृतीं जागविल्या. तसेच काही वैयक्तिक आठवणी व समाजकार्यातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला.
नायकांनी दिली प्रेरणा
रामकृष्ण नायक यांच्याशी मुक्तीपूर्व काळापासून आपले कौटुंबिक व जिव्हाळ्याचे संबंध होते. शास्त्रज्ञ म्हणून नेहमीच प्रयोगशाळेत बसून न राहता समाजाशी जवळीक साधण्याची प्रेरणा त्यांनीच दिली. विद्यार्थ्यांशी संवाद साधा असा त्यांचा नेहमीच आग्रह असे व तसे कार्यक्रमही त्यांनी गोव्यात घडवून आणले. शिक्षणक्षेत्रात त्यांना बरेच काही करायचे होते. त्यासाठी ते सतत आपल्याला काहीतरी सांगू पाहत होते. त्याचा पूर्ण उलगडा अद्याप आपल्याला झालेला नाही. आज ते आपल्यात नसले तरी त्यांनी उभारलेले प्रकल्प व दाखविलेली समाजकार्याची दृष्टी सतत प्रेरणा देत राहणार आहे, असे काकोडकर पुढे म्हणाले.
जगाचा प्रपंच केला
विजय कुवळेकर यांनी रामकृष्ण नायक यांच्या सहवासातील काही आठवणी सांगितल्या. कुसुमाग्रज, वसंत कानेटकर अशा साहित्य व कला क्षेत्रातील अनेक मोठ्या व्यक्तींचा सहवास त्यांच्यामुळेच आपल्याला लाभला. गोवा मुक्तीसंग्रामापासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात त्यांनी खूप काम केले. त्यांनी कौटुबिक प्रपंचापेक्षा जगाचा प्रपंच केला. आपल्या वैयक्तिक स्वार्थापेक्षा समाजासाठी ते सतत देत राहिले. त्यांच्या व्यवहारात पारदर्शकता व विचारात स्पष्टता होती. स्वभावातील स्नेह व जिव्हाळ्यामुळे जन्मभर त्यांनी माणसे जोडली. स्पष्ट वक्ते असलेल्या रामकृष्ण नायक यांचे काही लोकांशी वैचारिक मतभेद होते. पण द्वेश व आकस त्यांच्या मनात नव्हता. त्यांच्या व्यक्तीमत्त्वाबद्दल हे काही पैलू आपण जवळून अनुभवल्याचे कुवळेकर यांनी सांगितले.
पत्र व्यवहार ग्रंथबद्ध व्हावा
रामकृष्ण नायक यांनी साहित्य, कला व अन्य विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्तींशी पत्रव्यवहार केला. त्यांची ही पत्रे खासगी स्वऊपाची असला तरी त्यातील विषय, आशय हा सामाजिक, साहित्यिक, वैचारिक आहे. हा पत्रसंग्रह पुस्तक स्वऊपात यावा, यासाठी आपण प्रयत्न केले होते व त्यासाठी ते तयारही झाले होते. त्यांच्या पश्चात हे पत्रसंकलनाचे कार्य झाल्यास आपण त्यासाठी निश्चितच सहकार्य कऊ असा प्रस्ताव विजय कुवळेकर यांनी यावेळी मांडला. डॉ. अनिल काकोडकर व विजय कुवळेकर यांनी स्व. रामकृष्ण नायक यांच्या प्रतिमेला पुष्पाजंली वाहिली. त्यानंतर सुमेधा देसाई यांनी रामकृष्ण नायक यांना आवडणारी निवडक गाणी सादर केली. डॉ. अजय वैद्य यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.