राम दूत हनुमान…..5

रावण वधानंतर तेथील गादी विभीषणाला देऊन तिथली राज्यव्यवस्था सगळी सुरळीत चालू करून मगच श्रीराम पुष्पक विमानाने पुन्हा आयोध्याकडे आले. अयोध्येत आल्यानंतर त्यांचा पुन्हा जेव्हा राज्याभिषेक झाला, त्यावेळी अनेक सरदारांना, अनेक मंत्र्यांना मोठमोठी पदे दिली, पुरस्कार दिले, हा सगळा सोहळा खूप मोठा रंगात आला होता. प्रत्येकाचं नाव घेऊन त्याला पुढे बोलावण्यात येत असे. त्याचवेळी हनुमंताची यादी […]

राम दूत हनुमान…..5

रावण वधानंतर तेथील गादी विभीषणाला देऊन तिथली राज्यव्यवस्था सगळी सुरळीत चालू करून मगच श्रीराम पुष्पक विमानाने पुन्हा आयोध्याकडे आले. अयोध्येत आल्यानंतर त्यांचा पुन्हा जेव्हा राज्याभिषेक झाला, त्यावेळी अनेक सरदारांना, अनेक मंत्र्यांना मोठमोठी पदे दिली, पुरस्कार दिले, हा सगळा सोहळा खूप मोठा रंगात आला होता. प्रत्येकाचं नाव घेऊन त्याला पुढे बोलावण्यात येत असे. त्याचवेळी हनुमंताची यादी वाचायला सुरुवात झाली. ती वाचता वाचता ते थकून गेले आणि शेवटी म्हणाले माझे पंचप्राणवळले तरीही यादी संपणार नाही कारण मला प्राण पाचच आहेत पण यादी मात्र हातभार लांबली. मी कायम हनुमंताच्या उपकारातच राहणं पसंत करेन. असा हा पराक्रमी बलवान, उत्साही राजनीतिज्ञ, धैर्यवान, वेगवान अशा कितीतरी गुणांनी युक्त असलेला हनुमंत भावी जगाचा नियामक ठरेल हे लक्षात घेऊनच श्रीरामांनी हनुमंताला चिरंजीवित्व दिलेलं दिसतंय. तरुण पिढीला व्यायाम शिकवून त्यांना मनाने सशक्त करणारा हनुमान प्रत्येक गावागावात मनामनात वास्तव्याला आजही आहेच. राम कार्य जगासमोर आणण्याचा प्रयत्न करतोय. आम्हाला त्याच्यापर्यंत न्यायचं काम श्री रामदासांनी केले आणि हनुमंताच्या ओळखीबरोबरच आमची स्वत:ची देखील ओळख करून दिली. म्हणून या सगळ्यांचे उपकार आमच्यावरती आहेतच. हे राम कार्य चालू ठेवणाऱ्या हनुमंताचे आदर्श दैवत म्हणजे राम. त्यांच्या अवताराच्या समाप्तीच्या वेळेला शरयूत प्रवेश करताना सर्वजण रामाबरोबर निघाले. तेव्हा रामाने हनुमंताला थांबून सांगितलं की माझ्यामागे या जगाचा नियामक म्हणून तुला काम करायचे आहे. त्यावेळेला हनुमंतांनी देखील रामाला वचन दिलं की जगात जोपर्यंत रामकथा सुरू असेल जिथे जिथे सुरू असेल त्या ठिकाणी मी उपस्थित असेनच आणि तसंच घडतंयदेखील. जिथे जिथे रामाची कथा सुरू असते त्या ठिकाणी त्या हनुमंतासाठी एक चौरंग किंवा आसन ठेवलं जातं. कारण तिथे हनुमंत उपस्थित असतात अशी भावना अनेक संतांची आजही आहेच. आपण बघतो, गावागावात वेशीवर गावाच्या रक्षणासाठी, माणसांच्या रक्षणासाठी, हनुमंताची मंदिरे रामापेक्षाही जास्त आहेत. याचं कारणच तो आम्हाला लढायला किंवा आमच्यातल्या शक्तीला कायम आश्वस्त करत असतो. त्या शक्तीरूपानेच खरं म्हणजे तो त्या देवळात उभा असतो. असं कुठलंही देऊळ पाहिलं की आपल्याला आपल्या गावाची आठवण येते. या कविते प्रमाणे…
‘अजूनही जसेच्या तसे आठवते,
वेशीवरून ठळक दिसणारे तुझे देऊळ
गावाला धीर देणारे तुझे राऊळ
अनाहुतांचे स्वागत करणारे तुझ्या मंदिराचे मोकळेद्वार
भोवतालचा आटोपशीर दगडी पार
अजूनही आठवतोस जसाच्या तसा शेंदुराने माखलेल्या तुझ्या मूर्तीला
अन् मूर्तीने उजळणारा तुझा गाभारा, काजळलेल्या कोनाड्यात दिवा जागा
गावातला कंदील जागा असेपर्यंत……
तुला आठवले की आठवतात पारावर संध्याकाळी बसलेले दिवंगतांचे चेहरे
आणि सगळं गावच चिरंजीव होतं अगदी माझ्यासकट’
म्हणूनच हनुमंत आपल्या मनात जपायला हवा, आपल्या वेशीवर दिसायला हवा आणि आपल्या शक्तीमध्ये जागवायला हवा.
जय हनुमान.