रामदुर्गात प्रत्यक्षात अवतरले होते ‘राम’!

श्रीराम-शबरी भेटीचा पुरावा : सुरेबानमध्ये पुरातन मंदिरासह कुंड बेळगाव : अयोध्या येथे श्री रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर रामायणकालीन प्रसंगांना उजाळा मिळाला आहे. वनवासात असताना श्रीराम आणि शबरी यांची भेट बेळगाव जिल्ह्यात झाली होती. आजही रामदुर्ग तालुक्यातील सुरेबानजवळ असलेल्या शबरी कुंडात त्याचे पुरावे आढळतात. रामदुर्गपासून 13 किलोमीटर अंतरावर सुरेबान गाव आहे. तेथून 3 किलोमीटरवर शबरी […]

रामदुर्गात प्रत्यक्षात अवतरले होते ‘राम’!

श्रीराम-शबरी भेटीचा पुरावा : सुरेबानमध्ये पुरातन मंदिरासह कुंड
बेळगाव : अयोध्या येथे श्री रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर रामायणकालीन प्रसंगांना उजाळा मिळाला आहे. वनवासात असताना श्रीराम आणि शबरी यांची भेट बेळगाव जिल्ह्यात झाली होती. आजही रामदुर्ग तालुक्यातील सुरेबानजवळ असलेल्या शबरी कुंडात त्याचे पुरावे आढळतात. रामदुर्गपासून 13 किलोमीटर अंतरावर सुरेबान गाव आहे. तेथून 3 किलोमीटरवर शबरी कुंड आहे. या परिसरात शबरीचे मंदिरही आहे. येथे रोज शबरीमातेची पूजा केली जाते. वनवासात असताना श्रीराम आणि शबरी यांची भेट होते. मातंग ऋषींच्या सल्ल्यानुसार शबरी श्रीरामाच्या प्रतीक्षेत असते. सुरेबानजवळ ही भेट झाल्याचे सांगितले जाते.
दूरदर्शनवरील लोकप्रिय रामायण मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांनी शबरी कुंडाचा शोध लावून श्रीराम आणि शबरीची भेट इथेच झाली होती, असे जाहीर केल्यानंतर या ठिकाणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. या मालिकेतील श्रीरामाचे पात्र साकारलेले अरुण गोविल यांनीसुद्धा एका मुलाखतीत शबरी कुंडचा उल्लेख केल्यानंतर त्याचे पौराणिक महत्त्व अधोरेखित झाले. सुरेबान हे नावच मुळात शबरीमुळे आले. शबरीबनचा अपभ्रंश होऊन सुरेबान झाले आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे. येथील शबरीचे मंदिर  देशातील एकमेव आहे. येथे पुरातन मंदिर आणि कुंड आहे. या कुंडामध्ये बारमाही पाणी असते. शबरी आणि बोरे यांचा रामायणात उल्लेख दिसून येतो. या परिसरातही बोरांची झाडे विपुल प्रमाणात आढळून येतात.