राकसकोप जलाशयाची पाणीपातळी स्थिर

दरवाजा क्र. 2 आणि क्र. 5 सात इंचाने उघडले : मार्कंडेय नदीत एकाचवेळी जादा पाणी सोडल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची भीती रविंद्र मोहिते /तुडये  बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाची पाणीपातळी रविवारी सायंकाळी 2474.80 फुटावर पोहचली आहे. 2475 फुटावरील पाणीपातळी आता नियंत्रणात ठेवताना शहर पाणी पुरवठा मंडळाला नियोजनबद्धता राखावी लागणार आहे. सध्या ही पाणीपातळी स्थिर […]

राकसकोप जलाशयाची पाणीपातळी स्थिर

दरवाजा क्र. 2 आणि क्र. 5 सात इंचाने उघडले : मार्कंडेय नदीत एकाचवेळी जादा पाणी सोडल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची भीती
रविंद्र मोहिते /तुडये 
बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाची पाणीपातळी रविवारी सायंकाळी 2474.80 फुटावर पोहचली आहे. 2475 फुटावरील पाणीपातळी आता नियंत्रणात ठेवताना शहर पाणी पुरवठा मंडळाला नियोजनबद्धता राखावी लागणार आहे. सध्या ही पाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी वेस्टवेअरच्या सहा दरवाजांपैकी दरवाजा क्र.2 आणि क्र.5 हे दोन दरवाजे सात इंचाने खुले करण्यात आले आहेत. वेस्टवेअरच्या दरवाजातून मार्कंडेय नदीत पाणी सोडण्यामधील नियोजनाची गरज आहे. मार्कंडेय नदीत एकाचवेळी जादा पाणी सोडल्यास पूरस्थिती निर्माण होणार आहे.
सन 2019-2020 व 2021 या सलग तीन वर्षात पूरस्थिती निर्माण करण्यास राकसकोप जलाशयाची वाढीव पाणीपातळी कारणीभूत ठरली होती. त्यावेळी बेळगाव जिल्हा पूर नियंत्रण विभागानेही साफ दुर्लक्ष केल्याने या तिन्ही वर्षी मार्कंडेय नदीला येऊन मिळणारे सर्वच नाले व नदी पुरमय बनले होते. तुडये-सरोळी, तुडये-राकसकोप, बिजगर्णी, बेळगुंदी, तुडये-शिनोळी, सोनोली-बेळगुंदी, सुरूते-शिनोळी, बेळगाव-मण्णूर, सुळगा-हिंडलगा, बेनकनहळळी-बेळगाव मार्गातील नाल्यावरील पुलांवरून पाणी वाहत असल्याने हे सर्व मार्ग वाहतुकीला बंद झाले होते.
1962 साली जलाशयाची उभारणी
1962 साली बेळगाव शहराला पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यासाठी कर्नाटक शासनाने बेळगाव शहरापासून 18 कि.मी. अंतरावरील राकसकोप येथून वाहणाऱ्या मार्कंडेय नदीवर जलाशय उभारणी केली. या जलाशयाला तुडये-ता चंदगड, मळवी, इनाम बडस, बेळवट्टी व राकसकोप येथील शेती जमिनी पाणलोट क्षेत्राखाली बुडाल्याने शेतकऱ्याचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले हेते. या विरोधात तुडये मळवी येथील शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई दावे सर्वोच्च न्यायालयात दाखल केले आहेत.
शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पाणीपातळी 2475 फुटावरच ठेवण्याचा निर्णय
2022 साली कर्नाटक व महाराष्ट्र राज्यांच्या पाटबंधारे विभागाची एक बैठक मुंबई मंत्रालयात झाली होती. कर्नाटक व महाराष्ट्र राज्यांचे पाटबंधारे मंत्री, चंदगडचे आमदार राजेश पाटील, दोन्ही राज्यांचे सचिव यांच्यात चर्चा झाली. आणि शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पाणीपातळी 2475 फुटावरच ठेवण्याचे ठरले. त्यानुसार पाणीपातळी नियंत्रित ठेवण्याची कसरत करावी लागत आहे.
पत्रे काढण्यास टळाटाळ
नुकसानीचे दावे सध्या दिल्लीत न्यायालयात प्रलंबित आहेत. पाणीपातळी 2475 ते 2477 फुटापर्यंत केली जाते. यामध्ये पिकवून पाणी शिरल्याने दरवर्षी शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. मात्र 2475 फुटावरील वेल्डिंगने बसविलेले पत्रे काढण्याकडे आजपर्यंत दुर्लक्ष झाले आहे.
2019 साली मार्कंडेय नदीवरील सर्व पूल गेले होते पाण्याखाली
2018 सालापर्यंत पाण्याचा साठा हा योग्य पद्धतीचा 2475 फूट असल्याने पुराचे संकट यापूर्वी कधी जाणवले नाही. मात्र 2019 साली पाणीपातळी ही 2479 फूट झाल्यानंतर मुसळधार पाऊस झाल्याने जलाशयाला येणाऱ्या पाण्याचा ओघ इतका जादा झाला कि जलाशयाचा असलेल्या मातीच्या बंधाऱ्यावरून पाणी जातेय की काय… यामध्ये बंधाराही वाहून जातो कि काय… अशी परिस्थिती निर्माण झाल्याने वेष्ट वेअरचे सहाही दरवाजे तब्बल 7 फुटाने उघडण्यात आल्याने मार्कंडेय नदीला पूर आला होता, आणि या नदीवरील व नाल्यावरील पूल पाण्याखाली गेले होते. हे टाळण्यासाठी आताच जलाशयाला येणारे पाणी त्याप्रमाणात विसर्ग करण्याची तयारी जलाशय व्यवस्थापनाने करणे गरजेचे बनले आहे.