राजस्थान-केकेआर सामना पावसामुळे रद्द,

हैदराबाद-केकेआर यांच्यात क्वालिफायर तर राजस्थान-आरसीबी यांच्यात एलिमिनेटर लढत वृत्तसंस्था/ गुवाहाटी राजस्थान रॉयल्स व कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएलच्या प्राथमिक टप्प्यातील शेवटचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आल्यानंतर दोन्ही संघांना एकेक गुण देण्यात आला. स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यात शानदार प्रदर्शन करणाऱ्या राजस्थान रॉयल्सला उत्तरार्धात केलेली काहीशी खराब कामगिरी महागात पडल्याने त्यांना 17 गुणांसह तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले […]

राजस्थान-केकेआर सामना पावसामुळे रद्द,

हैदराबाद-केकेआर यांच्यात क्वालिफायर तर राजस्थान-आरसीबी यांच्यात एलिमिनेटर लढत
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
राजस्थान रॉयल्स व कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएलच्या प्राथमिक टप्प्यातील शेवटचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आल्यानंतर दोन्ही संघांना एकेक गुण देण्यात आला. स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यात शानदार प्रदर्शन करणाऱ्या राजस्थान रॉयल्सला उत्तरार्धात केलेली काहीशी खराब कामगिरी महागात पडल्याने त्यांना 17 गुणांसह तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले तर हैदराबादला दुसरे स्थान मिळाले.
संततधार पावसामुळे सामना सुरू होण्यास उशीर झाला. रात्री 10.15 च्या सुमारास पावसाने विश्रांती घेतल्यानंतर मैदानावरील साठलेल्या पाण्याचा निचरा करण्यात आला आणि 10.45 वाजता प्रत्येकी 7 षटकांचा सामना घेण्याचा निर्णय घेतला गेल्यानंतर नाणेफेकही झाली. केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पण खेळाडू सज्ज होत असताना पावसाने पुन्हा हजेरी लावल्यानंतर पंच व सामनाधिकाऱ्यांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.
केकेआरचा रद्द झालेला हा दुसरा सामना असून त्यांनी एकूण 20 गुणांसह अग्रस्थान कायम राखले. त्यांनी एकूण 9 विजय मिळविले. हैदराबाद व राजस्थानचे प्रत्येकी 17 गुण झाले असले तरी सरस धावसरासरीच्या आधारे हैदराबादला दुसरे व राजस्थानला तिसरे स्थान मिळाले. हैदराबादचा नेट रनरेट 0.414 तर राजस्थानचा 0.273 इतका झाला. आता 21 मे रोजी पहिल्या क्वालिफायर सामन्यात सनरायजर्स हैदराबाद व कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात मुकाबला होईल तर 22 मे रोजी होणाऱ्या एलिमिनेटर लढतीत राजस्थान रॉयल्स व रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर यांच्यात गाठ पडेल. दोन्ही सामने अहमदाबादमध्ये खेळविले जातील.
विशेष म्हणजे पहिल्या आठपैकी सात सामने जिंकणारा राजस्थान संघ व पहिल्या आठपैकी 7 सामने गमविणारा आरसीबी संघ एलिमिनेटर लढतीत एकमेकांविरुद्ध असतील. या लढतीत पराभूत होणाऱ्या संघाला स्पर्धेबाहेर पडावे लागेल. स्पर्धेच्या पूर्वार्धात राजस्थानने शानदार कामगिरी केली होती. पण उत्तरार्धात त्यांची कामगिरी घसरली. त्यामुळे आता स्पर्धेबाहेर पडण्याचा धोका त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. हैदराबादने मात्र रविवारच्या अखेरच्या सामन्यात जबरदस्त फटकेबाजी करीत विजय मिळविताना नेट रनरेटही सुधारत दुसरे स्थान पटकावले. क्वालिफायर 1 मध्ये पराभूत होणाऱ्या संघाला क्वालिफायर 2 मध्ये खेळण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.