राजधानीसह संपूर्ण राज्याला पावसाने झोडपले

विविध ठिकाणी झाडांची पडझड : विजेचे खांबही कोसळल्याने वीजप्रवाह खंडित,आजही जोरदार पावसाची शक्यता,चक्रीवादळाचा गोव्यावर परिणाम नाही पणजी : अरबी समुद्रातदेखील कमी दाबाचा पट्टा केरळपासून गुजरातपर्यंत निर्माण झाल्यामुळे राजधानी पणजीसह संपूर्ण गोव्यात गुऊवारी सायंकाळी पावसाने झोडपून काढले. अनेक ठिकाणी झाडे पडली. वाळपईमध्ये विजेचे खांबदेखील तुटून पडले. जोरदार वादळी वाऱ्यासह पडलेल्या या पावसामुळे अनेक भागातील वीजपुरवठा देखील […]

राजधानीसह संपूर्ण राज्याला पावसाने झोडपले

विविध ठिकाणी झाडांची पडझड : विजेचे खांबही कोसळल्याने वीजप्रवाह खंडित,आजही जोरदार पावसाची शक्यता,चक्रीवादळाचा गोव्यावर परिणाम नाही
पणजी : अरबी समुद्रातदेखील कमी दाबाचा पट्टा केरळपासून गुजरातपर्यंत निर्माण झाल्यामुळे राजधानी पणजीसह संपूर्ण गोव्यात गुऊवारी सायंकाळी पावसाने झोडपून काढले. अनेक ठिकाणी झाडे पडली. वाळपईमध्ये विजेचे खांबदेखील तुटून पडले. जोरदार वादळी वाऱ्यासह पडलेल्या या पावसामुळे अनेक भागातील वीजपुरवठा देखील सायंकाळी खंडित झाला. बंगालच्या उपसागरामध्ये आज चक्रीवादळ तयार होत आहे. गेले दोन दिवस कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस दक्षिण भारतात चालू आहे.  तयार होणारे हे चक्रीवादळ बांगलादेशच्या दिशेने सरकणार असल्याने या चक्रीवादळाचा गोव्यावर कोणताही परिणाम होणार नाही.  मात्र अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून तो गुऊवारी गोव्याच्या दिशेने वर सरकत होता परिणामी गुऊवारी गोव्याला सायंकाळी पावसाने झोडपून काढले. सत्तरी, सांखळी, फोंडा, जुने गोवे, माशेल इत्यादी भागात सायंकाळी उशिरा मुसळधार पाऊस झाला. अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडल्यामुळे विविध भागात झाडे उन्मळून पडली. त्यातून वीज खात्याचे बरेच नुकसान झाले. पणजीसह अनेक भागात जोरदार पावसाच्या माऱ्यामुळे अनेक ठिकाणी वीज तारा तुटून पडल्या. यामुळे वीज खात्याचे बरेच नुकसान झाले . त्यातून वीज प्रवाह अनेक भागात सायंकाळी बंद पडला आणि त्यामुळे ग्राहकांना त्रास झाला. वीज खात्याने प्रयत्न करून रात्री उशिरा अनेक भागातील वीजप्रवाह देखील सुरू झाला.  अग्निशामक दलाला वारंवार कॉल आले आणि या जवानांची विविध ठिकाणी धावण्याची जणू स्पर्धाच लागली.
आजही दररोजप्रमाणे सायंकाळी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडेल,  असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. सध्या पडणारा पाऊस हा 30 मे पर्यंत दररोज पडणार अशी चिन्हे आहेत. हवामान खात्याने  28 मे पर्यंत दररोज सायंकाळी पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला आहे. 25 मे पर्यंत येलो अलर्ट जारी केला आहे. सध्या पडणाऱ्या मान्सूनपूर्व पावसामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना शेती मशागतीची कामे करणे शक्य झाले आहे, मात्र आंबा पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. काजू पीक 12 मे पर्यंत बंद झाले होते.  मान्सूनपूर्व पावसाने यंदा बराच जोर धरलेला असून दररोज सायंकाळी पाच नंतर पावसाचे आगमन होते मात्र गुऊवारी रात्री उशिरापर्यंत गोव्यात सर्वत्र जोरदार ते मध्यम गतीने पाऊस चालू होता. वाळपई, फोंडा व सांखळी या भागात मुसळधार पाऊस झाल्याचे वृत्त आहे. मडगाव तसेच सांगे, केपे व  काणकोण या भागातही सर्वत्र मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याचे वृत्त आहे. पणजीत आल्तिनो येथे मुख्य सचिव यांच्या बंगल्याच्या बाहेर एक झाड कोसळले. अग्निशामक दलाने त्वरित कारवाई करून झाड कापून रस्ता मोकळा केला. कामुर्ली -म्हापसा येथे एक माड वीज खांबावर पडल्यामुळे विजेच्या तारा तुटून पडल्या आणि त्यामुळे वीज प्रवाह देखील खंडित झाला. वाजे शिरोडा येथे एक झाड रस्त्यावरती कोसळले व वीजतारांचेही नुकसान झाले अग्निशामक दलाने हे झाड कापून रस्ता मोकळा केला. शेगाव कुळे येथेही सातेरी मंदिराच्या बाजूला एक वृक्ष कोसळून पडला, सुदैवाने कोणतेही जास्त नुकसान झाले नाही. जुने गोवे गवंडाळी पुलाजवळ एक मोठे झाड रस्त्यावर कोसळले. त्यामुळे बराच वेळ वाहतूक बंद पडली. अग्निशामक दलाने हे झाड हटवून वाहतूक पूर्ववत सुरू केली.