शुक्रवारी ढगांच्या गडगडाटासह पावसाचे आगमन

शहरावर तुरळक सरी : उपनगरांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस : काही ठिकाणी रस्त्यावर साचले पाणी बेळगाव : शुक्रवारी ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. मात्र काही भागामध्ये बऱ्यापैकी पाऊस पडला तर काही भागामध्ये पावसाच्या केवळ सरी कोसळल्या. दमदार पाऊस पडेल, अशी अपेक्षा होती. मात्र पुन्हा एकदा बेळगावकरांच्या अपेक्षा भंग झाल्या आहेत. काही भागामध्ये दमदार […]

शुक्रवारी ढगांच्या गडगडाटासह पावसाचे आगमन

शहरावर तुरळक सरी : उपनगरांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस : काही ठिकाणी रस्त्यावर साचले पाणी
बेळगाव : शुक्रवारी ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. मात्र काही भागामध्ये बऱ्यापैकी पाऊस पडला तर काही भागामध्ये पावसाच्या केवळ सरी कोसळल्या. दमदार पाऊस पडेल, अशी अपेक्षा होती. मात्र पुन्हा एकदा बेळगावकरांच्या अपेक्षा भंग झाल्या आहेत. काही भागामध्ये दमदार पाऊस झाला. त्यामुळे गटारी तुंबून रस्त्यावरून पाणी वाहत होते. तर शहरात मात्र केवळ पावसाचा शिडकावाच झाला आहे. शुक्रवारी सकाळपासूनच उष्म्यामध्ये मोठी वाढ झाली होती. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. त्यामुळे पाऊस पडेल, असे साऱ्यांना वाटत होते. दुपारीच ढगांचा गडगडाट सुरू झाला. काही उपनगरांमध्ये पाऊस बऱ्यापैकी झाला. यावेळी जोरदार वाऱ्यासह पाऊस आल्याने झाडेदेखील कोसळली आहेत. काही ठिकाणी रस्त्यावरच पाणी साचून आहे.
खानापूर रोडवरील खादरवाडी क्रॉसजवळ एक झाड कोसळले. यावेळी सुदैवाने तेथे कोणीच नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. झाड कोसळल्यानंतर काही तरुणांनी तातडीने त्याच्या फांद्या बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला आहे. तर त्याच रस्त्यावर बेम्को परिसरात पाणी साचून होते. म्हणावा तसा दमदार पाऊस नसला तरी पाणी साचून राहिले. दमदार पाऊस कोसळला असता तर या परिसरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली असती. दुपारीच या पावसाला सुरुवात झाल्याने बाजारपेठेतील फेरीवाले, बैठे व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. जोरदार पाऊस कोसळेल या भीतीने आपले साहित्य तातडीने गोळा केले. त्यानंतर आडोसा शोधला. काहीवेळाने पाऊस गेला. त्यामुळे पुन्हा त्यांनी आपले व्यवसाय सुरू केले. मात्र या पावसामुळे त्यांची काहीवेळ तारांबळ उडाली होती. पावसापेक्षा ढगांचा गडगडाट आणि वाराच अधिक होता. गेल्या काही दिवसांपासून असाच प्रकार घडत आहे. दमदार पाऊस पडावा, अशी अपेक्षा असताना वाऱ्यामुळे पाऊस हुलकावणी देत आहे.