राहुल गांधींची यात्रा बिहारमध्ये दाखल

संघ-भाजपवर टीकास्त्र : नितीश कुमारांविषयी टिप्पणी करणे टाळले वृत्तसंस्था/ किशनगंज काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सोमवारी बिहारच्या किशनगंज जिल्ह्यात पोहोचली आहे. राहुल गांधी हे बंगालच्या उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातून किशनगंज येथे दाखल झाले आहेत. काँग्रेस समर्थक, आमदार आणि खासदारांनी राहुल गांधींचे यावेळी स्वागत केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राहुल यांनी भाजप तसेच […]

राहुल गांधींची यात्रा बिहारमध्ये दाखल

संघ-भाजपवर टीकास्त्र : नितीश कुमारांविषयी टिप्पणी करणे टाळले
वृत्तसंस्था/ किशनगंज
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सोमवारी बिहारच्या किशनगंज जिल्ह्यात पोहोचली आहे. राहुल गांधी हे बंगालच्या उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातून किशनगंज येथे दाखल झाले आहेत. काँग्रेस समर्थक, आमदार आणि खासदारांनी राहुल गांधींचे यावेळी स्वागत केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राहुल यांनी भाजप तसेच संघाला लक्ष्य केले आहे. राहुल गांधी यांनी स्वत:च्या भाषणात बिहारमधील नवे सरकार आणि नितीश कुमार यांच्यासंबंधी एक शब्दही काढला नाही.
या यात्रेचा उद्देश काय अशी विचारणा अनेक लोकांनी केली होती. संघ आणि भाजपच्या विचारसरणीने हिंसा आणि द्वेष फैलावल्याने भावा-भावांमध्ये भांडणं सुरू झाली आहेत. एक धर्म दुसऱ्या धर्माशी लढत आहे. भारत हा प्रेमाचा देश आहे. द्वेषाच्या या बाजारात मी प्रेमाचे दुकान खोलले आहे. या यात्रेदरम्यान मला लाखो लोकांची साथ मिळाली असल्याचे राहुल यांनी म्हटले आहे.
या यात्रेत आम्ही लाखो लोकांना भेटलो, हजारो लोकांसोबत सेल्फी काढली, सात तास चालत असताना विद्यार्थी, माता, शेतकरी आणि मजुरांशी आम्ही चर्चा करायचो. या घटकांच्या मनातील व्यथा ते आमच्यासमोर मांडायचे. दररोज संध्याकाळी 15-20 मिनिटांसाठी आम्ही आमची भूमिका मांडत होतो. हिंदुस्थानच्या राजकारणावर या यात्रेचा अत्यंत मोठा प्रभाव पडला आहे. भाजप देशासमोर एक विचारसरणी दररोज ठेवतो. द्वेष आणि हिंसेच्या विरोधात आता एक नवी विचारसरणी उभी ठाकली असून ती प्रेमाची आहे. द्वेषाला द्वेषाने नष्ट करता येऊ शकत नाही. द्वेष केवळ प्रेमानेच दूर करता येतो असे उद्गार राहुल गांधी यांनी काढले आहेत.
किशनगंज हा जिल्हा मुस्लीमबहुल आहे. येथे मोदी लाटेतही 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार डॉ. मोहम्मद जावेद यांनी विजय मिळविला होता. परंतु यावेळी काँग्रेसला येथे एआयएमआयएमकडून तीव्र आव्हान मिळत आहे. किशनगंज समवेत सर्व मुस्लीमबहुल मतदारसंघांमध्ये एआयएमआयएमचा वाढता प्रभाव पाहता काँग्रेसने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याचमुळे सीमांचलमध्ये राहुल गांधी यांच्या यात्रेला विशेष स्थान देण्यात आले आहे. राहुल गांधी हे मंगळवारी पूर्णिया येथे जाहीरसभेला संबोधित करणार आहेत.