पौष्टिक मुळ्याची भाजी याप्रकारे बनवा चवदार
हिवाळ्यात बाजारात मुळा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. लोक सलाड किंवा पराठ्यामध्ये मुळ्याचा वापर करतात, पण मुळ्याची भाजीही खायला खूप चविष्ट असते. मुळ्याची भाजी बनवण्यासाठी फारशा गोष्टींची गरज नसते आणि ती खूप चविष्ट लागते. आयर्न, व्हिटॅमिन ए, सी, ई आणि इतर अनेक पोषक तत्वांनी युक्त मुळा खाण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत.
यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहते आणि हृदयाच्या आरोग्यासाठीही ते फायदेशीर आहे. आज या भाजीमध्ये मुळा सोबतच मुळ्याची पाने देखील वापरणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया मुळ्याची भाजी कशी बनते.
साहित्य
मुळा – 2 (बारीक चिरून), मुळ्याची पाने – 1 वाटी, कांदा – 1 (मध्यम आकाराचा), आले – 1 इंच (किसलेला), हिरवी मिरची – 2, मोहरीचे तेल किंवा रिफाइंड तेल – 2 चमचे, ओवा – 1 चमचे , हिंग- चिमूटभर, हळद- अर्धा चमचा, मिरची पावडर-अर्धा चमचा, मीठ- चवीनुसार
कृती
मुळ्याची भाजी करण्यासाठी मुळा आणि त्याची पाने पाण्याने धुवून घ्यावीत. आता मुळा बारीक चिरून घ्या किंवा किसून घ्या. आता मुळ्याची पानेही बारीक चिरून घ्या. तसेच कांदा आणि हिरवी मिरची चिरून बाजूला ठेवा. आता कढईत तेल गरम करुन मोहरी घाला. तेल गरम झाल्यावर त्यात ओवा आणि हिंग घाला.
आता त्यात किसलेले किंवा बारीक चिरलेले आले आणि हिरवी मिरची घाला. आता कढईत मुळा आणि त्याची पाने घाला. झाकण ठेवून नीट शिजवा. 10-15 मिनिटे नीट शिजल्यानंतर मुळा आणि पाने शिजू लागली आहेत का ते बघा, नंतर त्यात हळद, तिखट आणि मीठ घालून चांगले मिक्स करा. आता मुळा चांगला शिजेपर्यंत शिजवा. भाजी शिजली की गरमागरम पराठा किंवा फुलकासोबत सर्व्ह करा.