जन्म-मृत्यू दाखल्यासाठी मनपासमोर रांगा

मनपा आयुक्त लक्ष देणार का?, जनतेनेही नोंदीची काळजी घेणे गरजेचे बेळगाव : जन्म आणि मृत्यू दाखल्यासाठी महानगरपालिकेसमोर लांबचलांब रांगा दररोज लागत आहेत. कर्मचाऱ्यांची कमतरता आणि केवळ एकच संगणकामुळे हा ताण साऱ्यांवरच पडत आहे. तेव्हा त्यामध्ये सुधारणा करावी, अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे. दरम्यान याबाबत आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांच्याकडे विचारणा केली असता किचकट प्रक्रियेमुळे […]

जन्म-मृत्यू दाखल्यासाठी मनपासमोर रांगा

मनपा आयुक्त लक्ष देणार का?, जनतेनेही नोंदीची काळजी घेणे गरजेचे
बेळगाव : जन्म आणि मृत्यू दाखल्यासाठी महानगरपालिकेसमोर लांबचलांब रांगा दररोज लागत आहेत. कर्मचाऱ्यांची कमतरता आणि केवळ एकच संगणकामुळे हा ताण साऱ्यांवरच पडत आहे. तेव्हा त्यामध्ये सुधारणा करावी, अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे. दरम्यान याबाबत आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांच्याकडे विचारणा केली असता किचकट प्रक्रियेमुळे ही समस्या निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. जन्म किंवा मृत्यू दाखल्याची नोंद झाल्यानंतर महानगरपालिकेतून देण्यात येणाऱ्या दाखल्यावर योग्यप्रकारे नोंद केली पाहिजे. त्यानंतर जन्म किंवा मृत्यू दाखल्याची प्रत दिली जाते. त्यासाठी बराच कालावधी लागत आहे. तातडीने कामे करणे अशक्य झाले आहे. एकच संगणकाला ऑनलाईन पद्धतीने जोडणी करण्यात आली आहे. यातच काही कर्मचारी सुटीवर गेल्यास अधिकच ताण पडत असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिका आयुक्तांनी याबाबत गांभीर्याने दखल घेऊन किमान आणखी दोन ते तीन संगणकांना ऑनलाईन जोडणी केल्यास ताण कमी होणार आहे. सध्या उन्हाचा तडाखा वाढला आहे. उन्हामध्येच महिला, वृद्धांना ताटकळत थांबावे लागत आहे. तेव्हा मनपा आयुक्तांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. जन्म किंवा मृत्यू दाखल्यातील नावामध्ये बदल करायचा असेल तर न्यायालयातून आदेश आणावा, असे सांगण्यात येत आहे. इतर सर्व कागदपत्रे असताना सामान्य जनतेला न्यायालयात जावे लागत आहे. त्यामध्ये पैसा आणि वेळदेखील वाया जात आहे. तेव्हा ती अटही मागे घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
नोंद करताना काळजी घ्या
मुलाचा जन्म झाल्यानंतर हॉस्पिटल किंवा इतर ठिकाणी नोंद करताना काळजी घेणे गरजेचे आहे. नाव दाखल करताना एखादा शब्द चुकला तरी त्याची दुरुस्ती करणे अवघड जात आहे. तेव्हा मुलाचा जन्म झाल्यानंतर आई-वडील किंवा नातेवाईकांनी काळजीपूर्वक नोंद करणे गरजेचे आहे. मृत्यू दाखल्याचीही नोंद करताना काळजी घेणे महत्त्वाचे आहे. एखादा शब्द चुकला तर दुरुस्तीसाठी न्यायालयाची पायरी चढावी लागत आहे. याचबरोबर स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र द्यावे लागत आहे. त्यामुळे नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तेव्हा नावाची नोंद करताना अत्यंत काळजीपूर्वक करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
आम्ही जनतेची कामे करू की नगरसेवकांची?
भर उन्हामध्ये जन्म आणि मृत्यू दाखल्यासाठी लांबचलांब रांगा लावाव्या लागत आहेत. यातच अचानक नगरसेवक जन्म आणि मृत्यू दाखला पाहिजे म्हणून थेट कार्यालयात येतात. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची कामे करणे अशक्य झाले आहे. तातडीने काम करा, असा आदेश ते देत असतात. त्यासाठी दबावही घातला जातो, अशी चर्चा सध्या महानगरपालिकेमध्ये सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे काही नगरसेवक तर दररोज 10 ते 15 जन्म-मृत्यू दाखले काढण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना करत असतात. त्यामुळे आम्ही जनतेची कामे करायची की नगरसेवकांची? असा प्रश्न आता अधिकारी व कर्मचाऱ्यांना पडला आहे.