पोस्टातील आधार नोंदणीला जनतेचा प्रतिसाद

वर्षभरात 60 हजारहून अधिक नागरिकांनी घेतला लाभ बेळगाव : पोस्ट विभागाच्या आधार नोंदणी व दुरुस्ती सेवेचा उपयोग नागरिकांना होऊ लागला आहे. मागील वर्षभरात तब्बल 60 हजारहून अधिक नागरिकांनी आधार नोंदणी व दुरुस्ती करून घेतली आहे. त्यामुळे आपल्या परिसरातील पोस्ट कार्यालयात जाऊन आधार नोंदणी करणे सहजशक्य झाले आहे. मागील काही वर्षांपासून पोस्ट विभागाने डिजिटल सेवांना सुरुवात […]

पोस्टातील आधार नोंदणीला जनतेचा प्रतिसाद

वर्षभरात 60 हजारहून अधिक नागरिकांनी घेतला लाभ
बेळगाव : पोस्ट विभागाच्या आधार नोंदणी व दुरुस्ती सेवेचा उपयोग नागरिकांना होऊ लागला आहे. मागील वर्षभरात तब्बल 60 हजारहून अधिक नागरिकांनी आधार नोंदणी व दुरुस्ती करून घेतली आहे. त्यामुळे आपल्या परिसरातील पोस्ट कार्यालयात जाऊन आधार नोंदणी करणे सहजशक्य झाले आहे. मागील काही वर्षांपासून पोस्ट विभागाने डिजिटल सेवांना सुरुवात केली. केवळ पत्र, स्पीड पोस्ट, रजिस्टर पोस्ट, पोस्टल विमा इतक्याच सेवा न देता अनेक डिजिटल सेवा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. बेळगाव पोस्ट विभागाने काही वर्षांपूर्वी पासपोर्ट सेवा केंद्र सुरू केले. त्यापाठोपाठ बेळगावमधील महत्त्वाच्या पोस्ट कार्यालयांमध्ये आधार नोंदणी सेवा केंद्र सुरू करण्यात आले. बेळगाव मुख्य पोस्ट कार्यालयासह काही ठिकाणी या सेवा दिल्या जात आहेत. पूर्वी काही ठरावीक सरकारी कार्यालये, बँका, बेळगाव वन यामध्येच आधार नोंदणी केली जात होती. यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. पोस्ट विभागाने काही कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन आधार नोंदणीला सुरुवात केली. याला उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे. पूर्वी आधार नोंदणीसाठी काही सीएससी सेंटर्सधारकांकडून 500 ते 600 रुपये वसूल केले जात होते. पोस्ट विभागाने अवघ्या 50 रुपयांमध्ये नोंदणी सुरू केल्याने पोस्टामध्ये आधार नोंदणी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
या ठिकाणी केली जाते आधार नोंदणी
कॅम्प येथील मुख्य पोस्ट कार्यालयासह नेहरूनगर, टिळकवाडी, शहापूर, शिवाजीनगर या शहरातील कार्यालयांसह सांबरा, खानापूर, रामदुर्ग, कित्तूर व बैलहोंगल या पोस्ट कार्यालयांमध्ये आधार नोंदणी केली जात आहे. कॅम्प येथील मुख्य पोस्ट कार्यालयात स्वतंत्र काऊंटर असून दररोज टोकन पद्धतीने आधार नोंदणी केली जाते.
दैनंदिन कामकाज संपवून आधार नोंदणी
बेळगाव पोस्ट विभागाने मुख्य कार्यालयासह महत्त्वाच्या पोस्ट कार्यालयांमध्ये आधार नोंदणीची व्यवस्था करण्यात आली आहे. दैनंदिन कामकाज संपवून त्यानंतर आधार नोंदणी केली जाते. जानेवारी ते डिसेंबर 2023 मध्ये 60 हजार आधार नोंदणी व दुरुस्ती करण्यात आली.
– विजय वडोनी (पोस्ट अधीक्षक)