शहरात डेंग्यू-कावीळबाबत मनपाकडून जनजागृती

शहरात डेंग्यू-कावीळबाबत मनपाकडून जनजागृती

बेळगाव : शहरामध्ये डेंग्यू आणि काविळीचे रुग्ण वाढत चालले आहेत. त्यामुळे आता महानगरपालिकेने शहरातील हॉटेल, चहाच्या टपऱ्या या ठिकाणी जाऊन त्याची जागृती केली आहे. याचबरोबर शहरातील विविध भागात फॉगिंग मशीनद्वारे फवारणीही करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे तसेच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी ही जनजागृती केली आहे.शहरामध्ये काविळीचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. काविळ हा आजार पाण्यापासून होत असतो. दूषित पाणी पिल्यामुळे हा आजार होत असल्याने त्याची जनजागृती मोहीम राबविण्यात आली आहे.
शहरातील शहापूर, आझमनगर, गांधीनगर, ऑटोनगर, कणबर्गी रोड या परिसरात जनजागृती करण्यात आली. रुक्साना शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध ठिकाणी टपरीवर जाऊन शुद्ध पाणीपुरवठा करण्याबाबत सूचना केली आहे. डेंग्यूचे रुग्णही वाढत चालल्याने विविध ठिकाणी औषध फवारणीदेखील करण्यात येत आहे. डेंग्यू, चिकुनगुनिया तसेच इतर साथीचे आजार होऊ नयेत यासाठी ही फवारणी केली जात आहे. यापुढेही अशाच प्रकारे जनजागृती तसेच औषध फवारणी करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.