महिला प्लंबर प्रशिक्षणासाठी 2.48 कोटी निधीची तरतूद

जिल्हा पंचायतच्या जीवनोपाय विभागाकडून महिला सबलीकरणाला प्राधान्य बेळगाव : कौशल्य विकास उद्यमशिलता आणि जीवनोपाय खात्याकडून विविध उपक्रम राबवून महिला सबलीकरणाला प्राधान्य देण्याचे नियोजन केले आहे. महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊन आर्थिक सबल करण्यासाठी जिल्हा पंचायतीकडून विशेष परिश्रम घेण्यात येत आहेत. ग्रा. पं. पातळीवर महिला प्लंबरची नेमणूक करून प्रशिक्षण देण्यासाठी सरकारकडून 2 कोटी 47 लाख 90 हजार रुपयांचा निधी खर्च करण्याचे नियोजन […]

महिला प्लंबर प्रशिक्षणासाठी 2.48 कोटी निधीची तरतूद

जिल्हा पंचायतच्या जीवनोपाय विभागाकडून महिला सबलीकरणाला प्राधान्य
बेळगाव : कौशल्य विकास उद्यमशिलता आणि जीवनोपाय खात्याकडून विविध उपक्रम राबवून महिला सबलीकरणाला प्राधान्य देण्याचे नियोजन केले आहे. महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊन आर्थिक सबल करण्यासाठी जिल्हा पंचायतीकडून विशेष परिश्रम घेण्यात येत आहेत. ग्रा. पं. पातळीवर महिला प्लंबरची नेमणूक करून प्रशिक्षण देण्यासाठी सरकारकडून 2 कोटी 47 लाख 90 हजार रुपयांचा निधी खर्च करण्याचे नियोजन केले आहे.
जिल्ह्यातील 500 ग्रा. पं.मध्ये 1000 महिला प्लंबर नेमण्यात येणार आहेत. 650 महिलांची नावे निश्चित केली असून 250 महिला प्लंबरना प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रत्येक ग्रा. पं. मधून दोन महिलांची निवड करण्यात येत आहे. प्रत्येक महिलेला प्रशिक्षण देण्यासाठी खर्चाची तरतूद केली आहे. ग्रा.पं.कडून निवडलेल्या दोन महिलांना प्रशिक्षणासाठी 49 हजार 580 रुपये खर्च येणार आहे. एका महिलेला 24,790 रुपये खर्च करण्यात येणारा निधी ग्रा.पं.च्या 15 व्या वित्त आयोगातून खर्च करावा लागणार आहे.
केंद्र सरकारकडून राबविलेल्या पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन व्हावे, पाण्याचा अपव्यय रोखण्याबरोबरच ग्रामीण महिलांशी संवाद साधण्यास महिला प्लंबर योग्य ठरतील, या उद्देशाने महिला प्लंबर नेमणुकीची योजना आखली असल्याचे जि. पं.कडून सांगण्यात येत आहे. सबलीकरणाच्या माध्यमातून महिलांना आर्थिकरीत्या सक्षम करण्यासाठी व रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्राधान्य देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. नल, जल मित्र म्हणून सदर महिला ग्रा. पं. मध्ये कार्यरत असणार आहेत.
250 महिलांना प्रशिक्षण
सध्या जिल्ह्यातील 14 तालुक्यांमधील 250 महिला प्लंबरची निवड केली असून त्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यांच्यासाठी 61 लाख 97 हजार 500 रुपये निधीचे वितरण केले आहे.