बियाणे-खतांचा सुरळीत पुरवठा करा

जिल्हाधिकाऱ्यांकडून कृषी खात्याला सूचना : मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद बेळगाव : पावसाला लवकरच सुरुवात होणार आहे. खरीप हंगामातील पेरणीसाठी बी-बियाणे व रासायनिक खतांचा समर्पक पुरवठा करण्यात यावा, कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक ती तयारी करावी, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे. दुष्काळ निवारण आणि खरीप हंगामातील तयारीसंदर्भात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यातील सर्व […]

बियाणे-खतांचा सुरळीत पुरवठा करा

जिल्हाधिकाऱ्यांकडून कृषी खात्याला सूचना : मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद
बेळगाव : पावसाला लवकरच सुरुवात होणार आहे. खरीप हंगामातील पेरणीसाठी बी-बियाणे व रासायनिक खतांचा समर्पक पुरवठा करण्यात यावा, कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक ती तयारी करावी, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे. दुष्काळ निवारण आणि खरीप हंगामातील तयारीसंदर्भात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांबरोबर गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. बी-बियाणे वितरण करणाऱ्या केंद्रावर शेतकरी एकाचवेळी गर्दी करतात. अशावेळी बी-बियाणे व खतांचा पुरवठा सुरळीतपणे करण्यात यावा. कोणत्याही परिस्थितीत गैरसोय होऊ नये, याची काळजी घ्यावी. टोकन वितरण करून होणारा गोंधळ दूर करण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात. गरज पडल्यास अतिरिक्त वितरण केंद्रे सुरू करण्यात यावीत. बियाणे वितरण करणाऱ्या केंद्रामध्ये असणाऱ्या बी-बियाणांच्या साठ्याची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. दूषित पाण्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करताना पाण्याची शुद्धता तपासण्यात यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकाऱ्यांना आणि पंचायत विकास अधिकाऱ्यांना सांगितले. व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केलेल्या निर्देशानुसार पिण्याच्या पाण्याची समस्या निदर्शनास आल्यास तात्काळ उपाययोजना राबवाव्यात. जनावरांना चारा, शेतकऱ्यांना बी-बियाणे कमी पडू देऊ नयेत, याची दखल घ्यावी, अशाही सूचना केल्या आहेत. यावेळी जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, मनपा आयुक्त पी. एन. लोकेश, कृषी खात्याचे संचालक शिवनगौडा पाटील, पशुखात्याचे उपसंचालक डॉ. राजीव कुलेर आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या वारसदारांना तातडीने भरपाई द्या
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसदारांना विलंब न लावता भरपाई देण्यात यावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी व कृषी अधिकाऱ्यांना केली. यावर्षी पावसाचे प्रमाण अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. नदीकाठावर व पूर येणाऱ्या भागामध्ये आवश्यक ती तयारी करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.