‘चोर्ला रस्ता’ कामाला चालना

मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते शुभारंभ वार्ताहर /कणकुंबी बेळगाव-चोर्ला-पणजी या रस्त्यापैकी रणकुंडये ते चोर्ला पर्यंतच्या 43.5 कि.मी. रस्त्याच्या कामाला जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी शनिवार कणकुंबी येथे भूमिपूजन करून चालना दिली. यावेळी खानापूरचे आमदार विठ्ठलराव हलगेकर, विधान परिषद सदस्य नाडगौडा, बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ, कणकुंबी ग्राम पंचायत अध्यक्षा  दीप्ती गवस […]

‘चोर्ला रस्ता’ कामाला चालना

मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते शुभारंभ
वार्ताहर /कणकुंबी
बेळगाव-चोर्ला-पणजी या रस्त्यापैकी रणकुंडये ते चोर्ला पर्यंतच्या 43.5 कि.मी. रस्त्याच्या कामाला जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी शनिवार कणकुंबी येथे भूमिपूजन करून चालना दिली. यावेळी खानापूरचे आमदार विठ्ठलराव हलगेकर, विधान परिषद सदस्य नाडगौडा, बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ, कणकुंबी ग्राम पंचायत अध्यक्षा  दीप्ती गवस व उपाध्यक्षा नीलिमा महाले, राष्ट्रीय महामार्ग कारवार विभागाचे मुख्य अभियंते सी. मंजाप्पा व इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले, बेळगावहून गोव्याला जोडणाऱ्या रस्त्यांपैकी चोर्ला रस्ता हा मुख्य असून या रस्त्याच्या खराब स्थितीबद्दल व दररोज होणाऱ्या अपघाताबद्दल वर्तमानपत्रांमध्ये दररोज बातम्या येत होत्या. तसेच स्थानिक नागरिकांकडून तक्रारी येत होत्या. म्हणून मी पहिल्यांदा चोर्ला रस्त्याचा विचार करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना या रस्त्याच्या विकासासंदर्भात विनंती केली. त्यानुसार नितीन गडकरी यांनी या रस्त्याला त्वरित मंजुरी दिली. त्यानुसार 35.33 कोटी रुपयांना रस्त्याचे टेंडर झाले आहे. त्याचे आपणा सर्वांच्या साक्षीने आम्ही भूमिपूजन केलेले असून रविवारपासून रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती जारकीहोळी यांनी दिली. हा गोव्याशी जोडणारा जवळचा रस्ता असून इंधन व वेळेची बचत करणारा आहे. त्याचबरोबर मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडणारा असल्याने या रस्त्याला फार महत्त्व आहे. त्यामुळे मी मंत्री झाल्यानंतर चोर्ला रस्त्यासाठी सुरुवातीपासूनच प्रयत्न केले होते. केंद्रीय मंत्री गडकरींच्या माध्यमातून या रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रश्न निकालात निघाला आहे.
कुसमळी येथे मलप्रभा नदीवर पूल नवा बांधणार
रस्त्याचे मुख्य अभियंते सी. मंजाप्पा यांनी रस्त्यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार कुसमळी येथील मलप्रभा नदीवरील ब्रिटिशकालीन पूल  जीर्ण झाल्याने तो पूल काढून त्या ठिकाणी बारा मीटर रुंदीचा नवीन पूल (ब्रिज) बांधण्यात येणार आहे. तसेच पहिल्या टप्प्यात रस्त्यावरील मोठमोठे ख•s खोदून पॅचवर्क करून दोन भागात रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. रणकुंडये ते जांबोटी-कणकुंबी व नंतर दुसऱ्या भागात कणकुंबी ते चोर्ला अशा पद्धतीने कामाला सुरुवात करून पावसाळ्यापूर्वी म्हणजे दोन-तीन महिन्यात रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच पावसाळ्dयानंतर ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान मलप्रभा नदीवरील कुसमळीजवळील जुना ब्रिज काढून नवीन ब्रिज बांधण्यात येणार आहे. या भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने रस्त्याचे काम उत्तम दर्जाचे करण्याची ग्वाही कंत्राटदराने दिली आहे. तसेच रस्त्याच्या दुतर्फा गटारांची निगा राखून रस्त्यावरून पाणी जाणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे. यावेळी तालुक्यातील विविध खात्याचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, स्थानिक नेतेमंडळी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
किरण ठाकुर यांनी केली होती मागणी
चोर्ला रस्त्याच्या दुरुस्तीसंदर्भात विशेषत: भारत लाईव्ह न्यूज मीडियाचे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी अनेकवेळा चर्चा करून रस्त्याच्या विकासासंदर्भात वेळोवेळी मागणी केली होती. तसेच बेळगाव सिटीझन कौन्सिल व बेळगाव ट्रेडर्स फोरमनेही याबाबत अनेकवेळा निवेदन दिले होते. त्याचबरोबर बेळगाव जिल्हा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष किरण गावडे यांनीही स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने वेळोवेळी रस्त्यासंदर्भात आवाज उठविला होता. या सर्वांच्या प्रयत्नांतून चोर्ला रस्त्याच्या डांबरीकरणाला चालना मिळाली आहे.
राष्ट्रीय महामार्ग 748 ए.ए. हा रस्ता बेळगाव विभागांतर्गत येत असून राष्ट्रीय महामार्ग विभाग कारवार यांच्यावतीने निविदा मागविण्यात आल्या होत्या. सदर रस्त्याचे कंत्राट हुबळी येथील एम. बी. कल्लूर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी यांनी घेतलेले आहे. बेळगाव ते चोर्ला गोवा हद्द रस्त्यापैकी 26.130 कि.मी. ते 69.480 कि.मी म्हणजे रणकुंडये ते चोर्ला असे 43.5 कि.मी. रस्त्याचे डांबरीकरण सध्या असणाऱ्या रस्त्याइतकेच रुंदीचे डांबरीकरण करण्यात येणार आहे.