महानगरपालिकेच्या महसूल विभागाच्या दिरंगाईमुळे समस्या

गोवावेस पेट्रोल पंपांचे घोंघडे भिजत : तिढा सुटेना बेळगाव : गोवावेस येथील पेट्रोलपंप दुसऱ्या ठेकेदाराला चालविण्यास द्यावा, असा आदेश न्यायालयाने देऊन दोन महिने उलटले तरी मनपाच्या महसूल विभागाने त्याबाबत अद्याप कोणतेच पाऊल उचलले नाही. त्यामुळे या पेट्रोलपंपांचा तिढा अद्याप सुटला नाही. गोवावेस येथील पेट्रोलपंपाचा वाद न्यायप्रविष्ट होता. न्यायालयाने नवीन ठेकेदाराला हा पेट्रोल पंप चालविण्यासाठी द्यावा, […]

महानगरपालिकेच्या महसूल विभागाच्या दिरंगाईमुळे समस्या

गोवावेस पेट्रोल पंपांचे घोंघडे भिजत : तिढा सुटेना
बेळगाव : गोवावेस येथील पेट्रोलपंप दुसऱ्या ठेकेदाराला चालविण्यास द्यावा, असा आदेश न्यायालयाने देऊन दोन महिने उलटले तरी मनपाच्या महसूल विभागाने त्याबाबत अद्याप कोणतेच पाऊल उचलले नाही. त्यामुळे या पेट्रोलपंपांचा तिढा अद्याप सुटला नाही. गोवावेस येथील पेट्रोलपंपाचा वाद न्यायप्रविष्ट होता. न्यायालयाने नवीन ठेकेदाराला हा पेट्रोल पंप चालविण्यासाठी द्यावा, असा आदेश दिला आहे. हा आदेश दोन महिन्यांपूर्वी दिला आहे. दुसऱ्या ठेकेदाराला पेट्रोल पंप चालविण्यासाठी मंजुरी दिली गेली. मात्र सध्या असलेल्या पेट्रोल पंपाचे साहित्य काढून संबंधित ठेकेदाराला देण्याबाबत महसूल विभागाने चालढकल केल्याने पेट्रोल पंपाचे घोंघडे भिजत पडले आहे. गोवावेस येथील पेट्रोल पंपाचे भाडे थकले होते. भाडे न दिल्यामुळे महानगरपालिकेने संबंधित मालाकाला तातडीने ते भाडे भरण्यासाठी नोटीस दिली. त्यानंतर संबंधित मालकाने दिलेला धनादेश वठला नाही. बरेच दिवस हा पेट्रोल पंप बंद असून भाडेही मोठ्या प्रमाणात थकले गेले होते. याबाबत महानगरपालिकेने कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार संबंधित पेट्रोल पंप दुसऱ्या ठेकेदाराला देण्याचा निर्णय घेतला. मात्र पूर्वीच्या पेट्रोल पंपचालकाने आक्षेप घेवून न्यायालयात धाव घेतली. न्यायालयामध्ये महापालिकेनेही आपली बाजु भक्कमपणे मांडली. न्यायालयाने पूर्वीच्या पेट्रोल चालकाकडून पेट्रोलपंप ताब्यात घेवून नव्याने लिलाव प्रक्रिया राबविण्याचा आदेश दिला. त्यानुसार महानगरपालिकेने लिलाव प्रक्रिया राबविली. दुसऱ्या व्यक्तीने पेट्रोलपंप चालविण्यासाठी ठेकाही घेतला. मात्र अद्याप तेथील साहित्य महसूल विभागाने हलविले नाहीत. त्यामुळे हे काम अजूनही प्रलंबित आहे. निवडणुकीनंतर तेथील पेट्रोलपंपाचे साहित्य हटविणार असल्याचे महसूल विभागातून सांगण्यात आले. याबाबत कायदा सल्लागार उमेश महांतशेट्टी यांना विचारले असता न्यायालयाने दुसऱ्या व्यक्तीला पेट्रोलपंप चालविण्यासाठी आदेश दिले आहेत. ती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता महसूल विभागाने पुढील कारवाई करणे गरजेचे आहे. याबाबत रितसर आम्ही संबंधित विभागाला सूचना केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.