प्रो लीग हॉकी : भारतीय संघ बेल्जियमपुढे निष्प्रभ

वृत्तसंस्था/ अँटवर्प (बेल्जियम)   भारतीय पुरुष हॉकी संघाला एफआयए प्रो लीगच्या युरोपियन टप्प्यात यजमान आणि जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या बेल्जियमकडून 1-4 असा पराभव पत्करावा लागला आहे. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील संघाने बुधवारी येथे झालेल्या सलामीच्या सामन्यात नियमित वेळेअखेर दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत राहिल्यानंतर शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाचा 5-4 ने पराभव केला होता. बेल्जियमविरुद्धच्या सामन्यात पहिल्या सत्रानंतर […]

प्रो लीग हॉकी : भारतीय संघ बेल्जियमपुढे निष्प्रभ

वृत्तसंस्था/ अँटवर्प (बेल्जियम)
 
भारतीय पुरुष हॉकी संघाला एफआयए प्रो लीगच्या युरोपियन टप्प्यात यजमान आणि जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या बेल्जियमकडून 1-4 असा पराभव पत्करावा लागला आहे. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील संघाने बुधवारी येथे झालेल्या सलामीच्या सामन्यात नियमित वेळेअखेर दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत राहिल्यानंतर शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाचा 5-4 ने पराभव केला होता.
बेल्जियमविरुद्धच्या सामन्यात पहिल्या सत्रानंतर बेल्जियमने 22 व्या मिनिटाला कर्णधार फेलिक्स डेनायरच्या मैदानी गोलद्वारे आघाडी घेतली. मध्यंतरानंतर चार मिनिटांनी अलेक्झांडर हेंड्रिक्सने पेनल्टी कॉर्नरवर गोल करून यजमनांची आघाडी दुप्पट केली. 49 व्या मिनिटाला सेड्रिक चार्लियरने आणखी एका सुरेख मैदानी गोलाची नोंद केली. बेल्जियन्सचे वेगवान पासिंग आणि कौशल्यपूर्ण खेळ यांना तोंड देण्यात भारतीय बचावफळी कमी पडली.
युवा आघाडीपटू अभिषेकने भारताची पिछाडी एका गोलाने कमी केली. पण बेल्जियम खूप मजबूत दिसला आणि खेळाच्या शेवटच्या मिनिटाला हेंड्रिक्सने पेनल्टी स्ट्रोकवर गोल करून यजमनांच्या दणदणीत विजयावर शिक्कामोर्तब केले. सुरुवातीपासून भारतीय बचावफळी विस्कळीत दिसली. अनुभवी गोलरक्षक पी. आर. श्रीजेशने तेवढे धीरोदत्तपणे आक्रमणांना तोंड दिले. आज शनिवारी भारताचा पुन्हा एकदा बेल्जियमशी सामना होणार आहे.
दुसरीकडे, भारतीय महिला हॉकी संघाला आपला दुसरा सामना गमवावा लागून बेल्जियमने पाहुण्यांना  0-2 ने पराभवाचा धक्का दिला. हरेंद्र सिंग आणि सलीमा टेटे या नवीन प्रशिक्षक आणि कर्णधाराच्या नेतृत्वाखालील भारतीय महिलांचा बुधवारी पहिल्या सामन्यात अर्जेंटिनाने 0-5 असा धुव्वा उडवला होता. बेल्जियमचे दोन्ही गोल हे अलेक्सिया टी सर्स्टीव्हन्स आणि डेवेट लुईस यांनी केलेल्या प्रयत्नांतून झाले.