मुख्याध्यापक पी. एम. बेळगावकर यांचा सदिच्छा सोहळा

शिक्षक हा खरा समाजसुधारक : हायस्कूलसाठी उल्लेखनीय कार्य वार्ताहर /किणये पूर्वी पश्चिम भाग हा मागासलेला होता. समाजाची प्रगती व्हायची असेल तर शिक्षणाचा प्रसार असला पाहिजे. या उद्देशाने परशुरामभाऊ नंदिहळ्ळी यांनी विश्व भारत सेवा समितीच्या माध्यमातून बेळवट्टी गावात माध्यमिक विद्यालयाची स्थापना केली आणि हा भाग शिक्षित बनविला. या गावच्या हायस्कूलच्या प्रगतीच्या वाटचालीत मुख्याध्यापक पी. एम. बेळगावकर […]

मुख्याध्यापक पी. एम. बेळगावकर यांचा सदिच्छा सोहळा

शिक्षक हा खरा समाजसुधारक : हायस्कूलसाठी उल्लेखनीय कार्य
वार्ताहर /किणये
पूर्वी पश्चिम भाग हा मागासलेला होता. समाजाची प्रगती व्हायची असेल तर शिक्षणाचा प्रसार असला पाहिजे. या उद्देशाने परशुरामभाऊ नंदिहळ्ळी यांनी विश्व भारत सेवा समितीच्या माध्यमातून बेळवट्टी गावात माध्यमिक विद्यालयाची स्थापना केली आणि हा भाग शिक्षित बनविला. या गावच्या हायस्कूलच्या प्रगतीच्या वाटचालीत मुख्याध्यापक पी. एम. बेळगावकर यांचा मोलाचा सहभाग आहे. त्यांनी शाळेसाठी सेवक म्हणून कार्य केले आहे. या भागातील अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविले आहे. शिक्षक हा समाजाचा खरा समाज सुधारक असतो. याची प्रचिती बेळगावकर यांच्या कार्यातून येते, असे मनोगत बी. बी. देसाई यांनी बेळवट्टी येथे व्यक्त केले. विश्व भारत सेवा समिती संचालित बेळवट्टी येथील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. एम. बेळगावकर हे आपल्या 35 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून 31 जानेवारी 2024 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. यानिमित्त शुक्रवार दि. 19 रोजी  बेळवट्टी हायस्कूलच्या पटांगणात त्यांचा सदिच्छा (कृतज्ञता) सोहळा आयोजित केला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बी. बी. देसाई बोलत होते. ते पुढे म्हणाले, प्रारंभीच्या काळात त्यांनी विनाआनुदानित सेवा केली. त्यामुळे त्यांच्यामध्ये एक सेवाभाव रुजलेला आहे. आई-वडिलांनी आकार दिलेल्या मुलांना दुसरी आई म्हणजे शाळा असते, असेही ते म्हणाले.
अध्यक्षस्थानी विश्व भारत सेवा समितीचे अध्यक्ष विजय नंदिहळ्ळी होते. संस्थापक व माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी यांच्या हस्ते सरस्वती फोटो प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ग्रामीण क्षेत्र समन्वय अधिकारी एम. एस. मेदार, कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षण संघाच्या कार्याध्यक्ष रामू गुगवार, बेळवट्टी ग्राम पंचायत अध्यक्ष विठ्ठल पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य एन. के. नलवडे, भुजंग गाडेकर, नारायण जोतिबा नलवडे, बांधकाम कमिटीचे अध्यक्ष सतीश पाटील, उपाध्यक्ष सातेरी चौगुले आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. व्यासपीठावर डी. ए. देसाई, डॉ. अर्जुन पाटील, लुमाण्णा नलवडे, सुरेश राजुकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक यू. एस. होनगेकर यांनी केले. त्यांनी पी. एम. बेळगावकर हे हायस्कूलमध्ये रुजू झाल्यापासून यांनी हायस्कूलसाठी केलेली धडपड, शाळेचा विकास आणि त्यांची शिकविण्याची पद्धत याबद्दल सविस्तर माहिती दिली. प्रारंभी विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागत गीत म्हटले. पी. एम. बेळगावकर यांचे गुरु आर. आय. कोकितकर, पी. के. तरळे, परशुरामभाऊ नंदिहळ्ळी, पी. एम. टपाले आदींसह व्यासपीठावर यांचे गुरुपूजन करण्यात आले. बेळगावकर यांनी आपल्या गुरुप्रती दाखविलेला हा आदरभाव पाहून सारेच भावूक झाले होते.
स्वाती होसूरकर, कावेरी मरगाळे, सोनाली सावंत, प्रेरणा मंजुळे आदी विद्यार्थ्यांबरोबरच प्रकाश चलवटेकर व अनेक मान्यवरांची बेळगावकर यांच्या कार्याचा आढावा घेणारी भाषणे झाली. युरोप येथून जोतिबा रामू पाटील या माजी विद्यार्थ्याने ऑनलाईनवर भाषण करून सरांच्या आठवणींना उजाळा दिला. इमारत बांधकाम कमिटी बेळवट्टी, शिक्षक वर्ग, ग्राम पंचायत सदस्य, आजी -माजी विद्यार्थी, तुरमुरी येथील वैशाली खांडेकर व ग्राम पंचायत सदस्य इनाम बडस, बाकनूर, बेटगेरी, गोल्याळी, कावळेवाडी व तालुक्याच्या विविध भागातील हायस्कूलमधील शिक्षक व नागरिकांच्यावतीने सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यानिमित्त पी. एम. बेळगावकर यांनी शहापूर येथील सिद्धार्थ बोर्डिंगला 5 हजार व बेळवट्टी येथे उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी 5 हजार रुपयांची देणगी दिली. परशुरामभाऊ नंदिहळ्ळी व विजय नंदिहळ्ळी यांनी बेळगावकर यांनी निवृत्तीनंतरही पश्चिम भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, असे सांगितले. सत्काराला उत्तर देताना पी. एम. बेळगावकर म्हणाले, वडील सांप्रदायिक होते. मी इंग्रजी बोलावे आणि त्यामध्ये शिकवावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळेच मी इंग्रजी विषयाचा शिक्षक बनलो. बेळवट्टी गावातील या हायस्कूलमध्ये गेली 35 वर्षे मी प्रामाणिकपणे सेवा केली. या गावातील नागरिकांची व सर्व शिक्षकांची खंबीर साथ मिळाली. निवृत्तीनंतर निराधारांना आधार देण्यासाठी माझ्या मित्रांच्या सहकार्याने कार्य करणार, असेही त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन आर. बी. देसाई व ईश्वर पाटील यांनी केले.