‘तुमचे अश्रू पुसायला पंतप्रधान पोहोचले नाहीत’

मणिपूर’साठी मोदींकडे नाही वेळ, राहुल गांधींची मणिपूरमध्ये गर्जना : भारत जोडो न्याय यात्रेला प्रारंभ वृत्तसंस्था/ थौबल (मणिपूर) काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपूरच्या थौबल येथून भारत जोडो न्याय यात्रेला सुऊवात केली. यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी उपस्थितांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार शाब्दिक प्रहार केले. ‘मणिपूरमध्ये आमच्या डोळ्यासमोर भाऊ, बहिणी, आई-वडील मरण पावले. मात्र, आजपर्यंत […]

‘तुमचे अश्रू पुसायला पंतप्रधान पोहोचले नाहीत’

मणिपूर’साठी मोदींकडे नाही वेळ, राहुल गांधींची मणिपूरमध्ये गर्जना : भारत जोडो न्याय यात्रेला प्रारंभ
वृत्तसंस्था/ थौबल (मणिपूर)
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपूरच्या थौबल येथून भारत जोडो न्याय यात्रेला सुऊवात केली. यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी उपस्थितांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार शाब्दिक प्रहार केले. ‘मणिपूरमध्ये आमच्या डोळ्यासमोर भाऊ, बहिणी, आई-वडील मरण पावले. मात्र, आजपर्यंत भारताचे पंतप्रधान तुमचे अश्रू पुसण्यासाठी किंवा तुम्हाला मिठी मारण्यासाठी मणिपूरमध्ये आले नाहीत. हे खूप लाजिरवाणे आहे’, अशी आगपाखड राहुल गांधी यांनी केली. तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदीजी समुद्रात फिरायला जातात, राम-राम करतात पण मणिपूरला येत नाहीत’, असा हल्लाबोल पक्षाध्यक्ष खर्गे यांनी केला.
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली सुरू झालेल्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवारी मणिपूरमधील थौबल येथून हिरवा झेंडा दाखवला. राहुल गांधी यांच्यासोबत अशोक गेहलोत, सचिन पायलट, दिग्विजय सिंग, सलमान खुर्शिद, आनंद शर्मा, राजीव शुक्ला असे अनेक ज्येष्ठ नेते मणिपूरला पोहोचले. भारत जोडो न्याय यात्रा 67 दिवसात 110 जिल्ह्यांतून 6,700 किलोमीटरहून अधिक अंतर कापणार आहे. 20 मार्च रोजी मुंबईत यात्रेची सांगता होणार आहे.
यात्रेला प्रारंभ करताना राहुल गांधी यांनी ‘आम्ही तुमची मते आणि भावना ऐकण्यासाठी आलो आहोत, आमच्या मनातले बोलण्यासाठी नाही.’ असे स्पष्ट केले. तसेच निवडणुकीला फारसा अवधी उरलेला नसल्यामुळे पायी तसेच बसने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. प्रवास कुठून सुरू करायचा, असा प्रश्न पडला असतानाच काहींनी पूर्वेकडून तर काहींनी पश्चिम भारतातून यात्रेला प्रारंभ करण्याचे सुचविले होते. मात्र, आपण भारत जोडो यात्रा मणिपूरपासून सुरू करण्याचा हट्ट धरला. या राज्याच्या बाबतीत भाजप द्वेषाचे राजकारण करत असल्यामुळे मणिपूरची निवड करण्यात आल्याचे राहुल गांधींनी सांगितले.
मल्लिकार्जुन खर्गेंचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
पंतप्रधान मोदी मणिपूरमध्ये मतदानासाठी येतात. पण मणिपूरची जनता अडचणीत असताना ते येत नाहीत. ते समुद्रात फेरफटका मारतात आणि राम-रामाचा जप करतात. मते मिळविण्यासाठी त्यांचा हा सगळा ढोंगीपणा सुरू असतो. पंडित नेहरू पहिल्यांदा मणिपूरला आले तेव्हा त्यांनी याला भारताचे भूषण म्हटले होते. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनीही हेच सांगितले होते, असे सांगत मणिपूरने स्वातंत्र्यासाठी लढा दिल्याचे मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.
…हा विचारधारेचा लढा : अधीर रंजन चौधरी
मकर संक्रांतीच्या पवित्र मुहूर्तावर मणिपूरमधून न्यायासाठी हा मोर्चा सुरू होत आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा पूर्वेकडून पश्चिमेकडे म्हणजेच मणिपूरपासून मुंबईपर्यंत जाणार आहे. ही यात्रा विचारधारांची लढाई आहे. काँग्रेस पक्षाची विचारधाराच देशाला वाचवू शकते. या यात्रेचा निवडणुकीतील विजय-पराजयाशी काहीही संबंध नाही, असे अधीर रंजन चौधरी म्हणाले.
जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न : जयराम रमेश
ही यात्रा म्हणजे ध्रुवीकरणाचे राजकारण आणि सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अन्यायाविऊद्ध काँग्रेसने सुरू केलेला वैचारिक लढा आहे. हा निवडणूक प्रवास नसून राजकीय पक्षाचा वैचारिक प्रवास आहे. द्वेष आणि हिंसेच्या राजकारणाविरोधात देशभरात प्रेम आणि एकोपा मागण्यासाठी भारत जोडो यात्रा होती. देशातील जनतेला न्याय मिळावा या मागणीसाठी ही न्याय यात्रा काढण्यात येत असल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी स्पष्ट केले.
ईशान्येतील 25 जागांवर काँग्रेसची नजर
ईशान्येकडील राज्यांना डोळ्यासमोर ठेवून थौबल येथून यात्रेला सुऊवात करण्यात आली आहे. मणिपूरमधील हिंसाचारामुळे लोकांचा भाजपबद्दल भ्रमनिरास झाला असल्याचे राजकीय तज्ञांचे मत आहे. यामुळेच ईशान्येच्या 25 जागांसाठी राहुल गांधी 13 दिवस या भागात राहणार आहेत. मणिपूरमध्ये 3 मे पासून कुकी आणि मीतेई समुदायांमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत 200 हून अधिक मृत्यू झाले आहेत. त्याचबरोबर एक हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत. 65 हजारांहून अधिक लोक बेघर झाले आहेत.
67 दिवस, 15 राज्यांमधून प्रवास
‘भारत जोडो न्याय यात्रे’चा प्रवास मणिपूरच्या थौबल जिह्यातून सुरू होऊन मुंबईला पोहोचेल. हा प्रवास तब्बल दोन महिने चालणार आहे. यादरम्यान राहुल गांधी ठिकठिकाणी थांबून स्थानिक लोकांशी संवाद साधतील आणि जाहीर सभांना संबोधित करतील. 67व्या दिवशी यात्रेच्या समारोपाच्या वेळी राहुल पत्रकार परिषदेला संबोधित करू शकतात. या यात्रेत 110 जिल्हे, जवळपास 100 लोकसभा मतदारसंघ आणि 337 विधानसभा जागांचा समावेश असेल. ही यात्रा मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, अऊणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरातमार्गे महाराष्ट्रात पोहोचेल.