बिहारमध्ये उद्यापासून सत्तास्थापनेची तयारी

   ► वृत्तसंस्था/ पाटणा                                                                                                 बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेची […]

बिहारमध्ये उद्यापासून सत्तास्थापनेची तयारी

   ► वृत्तसंस्था/ पाटणा                                                                                                
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेची प्रक्रिया उद्या सोमवारपासून औपचारिकपणे सुरू होईल. सोमवारी सायंकाळी होणाऱ्या बैठकीनंतर मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यपालांना राजीनामा सादर करतील. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एनडीए विधिमंडळ पक्षाची बैठक होईल. विधिमंडळ पक्षनेते म्हणून निवड झाल्यानंतर नितीश कुमार राजभवनात परतून सरकार स्थापनेचा दावा करतील.
बिहारमधील विधानसभा निवडणुकीत जेडीयू-भाजप आघाडीला ‘द्विशतकी’ यश मिळाल्यानंतर सत्तास्थापनेचा मार्ग सुकर झाला आहे. तसेच विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या गळ्यातच पुन्हा नेतृत्त्वपदाची माळ पडणार हेसुद्धा जवळपास निश्चित मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य मंत्रिमंडळ सध्याची विधानसभा विसर्जित करण्याचा निर्णय घेईल. त्यापूर्वी, मुख्यमंत्री नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकमताने आभार मानले जाणार आहेत.
सोमवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर लगेचच मुख्यमंत्री राज्यपालांना राजीनामा देण्यासाठी राजभवनात जातील. त्यानंतर ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी परतून एनडीएच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत सहभागी होतील अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली. ही बैठक औपचारिक स्वरुपाचीच असेल. विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर नितीश कुमार सोमवारीच पुन्हा सरकार स्थापनेचा दावा करून शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू करणार आहे. राजभवनाऐवजी गांधी मैदानावर नवीन एनडीए सरकारचा शपथविधी समारंभ आयोजित करण्याचा विचार सुरू आहे. नितीश कुमार यांनी यापूर्वी दोनदा गांधी मैदानावर मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
भेटीगाठी आणि विजयोत्सव
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शनिवारी दिवसभर नवनिर्वाचित आमदारांशी भेट घेतली. ‘लोजपा-एन’चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी शनिवारी सकाळीच त्यांची भेट घेतली. त्यानंतर जीतन राम मांझी यांचे पुत्र आणि नितीश सरकारमधील मंत्री संतोष सुमन हेसुद्धा मुख्यमंत्र्यांना भेटले. मुख्यमंत्र्यांना भेटणाऱ्यांमध्ये जेडीयूचे प्रदेशाध्यक्ष उमेश सिंह कुशवाह, नवनिर्वाचित आमदार श्याम राजक, रामकृपाल यादव आणि राहुल सिंह यांचा समावेश होता. मुख्यमंत्र्यांनी संध्याकाळी जेडीयूच्या आमदारांशी स्वतंत्र आणि संयुक्तपणेही भेट घेतली. यावेळी विजयोत्सवही साजरा करण्यात आला.