मतमोजणीसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी

सुरक्षा व्यवस्थेवर भर : कर्मचारी नियुक्ती पूर्ण बेळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या मतदानाची मतमोजणी येत्या दि. 4 जून रोजी करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक तयारी करण्यात येत आहे. मतमोजणी केंद्रांवर सुरक्षा व्यवस्था व मतमोजणीसाठी कर्मचारी नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी दि. 7 मे […]

मतमोजणीसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी

सुरक्षा व्यवस्थेवर भर : कर्मचारी नियुक्ती पूर्ण
बेळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या मतदानाची मतमोजणी येत्या दि. 4 जून रोजी करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक तयारी करण्यात येत आहे. मतमोजणी केंद्रांवर सुरक्षा व्यवस्था व मतमोजणीसाठी कर्मचारी नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी दि. 7 मे रोजी मतदान घेण्यात आले आहे. मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले असून आणखी 15 दिवस वाट पहावी लागणार आहे. निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या उमेदवारांना मतमोजणीची उत्सुकता लागून राहिली आहे. तर राजकीय वर्तुळासह नागरिकांमध्ये मतमोजणीबाबत आकडेमोड सुरू आहे. राजकीय पक्षांकडून गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली जात आहे. कोण वरचढ ठरणार, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? याची विचारणा केली जात आहे. राजकीय नेत्यांकडून आपला पक्षच वरचढ ठरणार असल्याचे ठाम मत व्यक्त केले जात आहे. यावरून तर्कवितर्क लढविले जात आहेत. असे असले तरी मतमोजणीनंतरच चित्र स्पष्ट होणार असे सांगून समाधान मानावे लागत आहे. जिल्हा प्रशासन मतमोजणी करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक बाबींची तयारी करण्यात गुंतले आहे. मतमोजणीदरम्यान सुरक्षा व्यवस्था, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. मतदान यंत्रे ठेवण्यात आलेल्या मतमोजणी केंद्रांवरील स्ट्राँगरुमची सुरक्षितता, याबाबतचा दररोजचा अहवाल मागवून घेतला जात आहे. अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेत मतदानयंत्रे ठेवण्यात आली आहेत. यासाठी खास व्यवस्था करण्यात आली असून मतमोजणी करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लवकरच प्रशिक्षण पूर्ण करण्यात येणार आहे. सुरक्षा व्यवस्थेबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
मतमोजणी कर्मचारी नियुक्ती पूर्ण
दि. 4 जून रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे. सुरक्षा व्यवस्था व मतदान केंद्रांवर मतमोजणी कर्मचारी नियुक्ती पूर्ण झाली असून प्रशासन सज्ज आहे.
– जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील