हुदली कुस्ती मैदानात प्रकाश बनकर विजयी
बेळगावचा पार्थ पाटील गदेचा मानकरी
बेळगाव : हुदली (ता. जि. बेळगाव) येथील महालक्ष्मी यात्रा व रथोत्सव निमित्त भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. या मैदानात विशाल बेंदू हरियाणा गंभीर जखमी झाल्याने प्रकाश बनकरला विजयी घोषित करण्यात आले तर आकर्षक कुस्तीत बेळगावचा उगवता मल्ल पार्थ कंग्राळीने साहील बेनापूरचा एकलांगी डावावर पराभव करून चांदीच्या गदेचा मानकरी ठरला. हुदली येथे महालक्ष्मी यात्रेनिमित्त भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. सदर मैदान जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या संयोगाने या मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. मैदानात प्रमुख कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर, भारत केसरी विशाल बोंदू हरियाना ही कुस्ती माजी आमदार एस. सी. माळगी, अरविंद काळची, अडव्याप्पा गिरगेडेरी, ग्रा. पं. अध्यक्ष, उपाध्यक्षा कृषी पत्तीन सहकारी संघाचे सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते लावण्यात आले. या कुस्तीत दुसऱ्या मिनिटाला प्रकाश बनकरने एकेरीपट काढून विशाल बोंदूला खाली घेतले पण विशालने त्यातून सुटका करून घेतली. चौथ्या मिनिटाला विशाल बोंदूने दुहेरीपट काढून प्रकाशला खाली घेत झोळी बांधण्याचा प्रयत्न केला. पण अनुभवी प्रकाशने त्यातून सुटका करून घेतली. आठव्या मिनिटाला प्रकाशने पायाला टाच मारून विशालला खाली घेत मानेवरती कस काढुन घुटना मारण्याचा प्रयत्न केला. पण विशालने त्यातून सुटका करून घेतली. 14 व्या मिनिटाला प्रकाश बनकरने दोन्ही हाताचे हाप्ते भरून विशालला वरून खाली घेतले. त्यावेळी विशाल बोंदूच्या पायाला गंभीर दु:खापत झाल्यामुळे प्रकाश बनकरला विजयी घोषित करण्यात आले.
दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती कृषी पत्तीन सहकारी व ग्रा. पं. सदस्यांच्या हस्ते कर्नाटक केसरी नागराज बशीदोनी, महाराष्ट्र चॅम्पियन संदीप पोटे यांच्यात लावण्यात आली. चौथ्या मिनिटाला नागराज बशीदोनीने एकेरीपट काढून संदीप पोटेला खाली घेत घुटना मारण्याचा प्रयत्न केला. पण अनुभवी संदीपने त्यात रितसर सुटका करून घेतली. 8 व्या मिनिटाला संदीप पोटेने हप्ते भरून नागराजला खाली घेत कब्जा मिळविला. पायाला एकलांगी करून नागाराजला चित करण्याचा प्रयत्न केला. पण बलदंड शरीर असलेल्या नागराजला चित करणे कठीण गेले. त्यानंतर पंचानी कुस्ती खाडाखाडी लावली. चौदाव्या मिनिटाला संदीप पोटेने एकेरीपट काढून नागराजला झोळी बांधून चित करण्याचा प्रयत्न केला होता. पण नागराजने खालून डंकी मारत संदीपवर कब्जा मिळविला. वेळेअभावी ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती शिवानंद नेरवानट्टी व सागर तांबकट्टी ही कुस्ती डाव प्रतिडावाने झुंजली. पण वेळेअभावी बरोबरीत सोडविण्यात आली. चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत प्रकाश इंगळगी व सदाशिव नलवडे यांच्यात झाली. प्रकाश इंगळगीने या कुस्तीत सातव्या मिनिटाला एकेरीपट काढून सदाशिवला खाली घेऊन एकचाक मारण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून सदाशिवने सुटका करून घेतली. पाचव्या क्रमांकाच्या कुस्ती मुबारक इंगळगीने प्रविण पाटीलचा बाहेरील टांगेवर चित करून कुस्ती शौकीनांकडून वाहवा मिळविली. सहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत महेश अथणी व विजय डोईपुडे या कुस्तीत महेश अथणीला दु:खापत झाल्याने विजय डोईपुडीला विजयी घोषित करण्यात आले.
सातव्या क्रमांकाची कुस्ती संजु इंगळगी, अजुबा मुधोळ, आठव्या क्रमांकाची परमानंद इंगळगी, संतोष हारूगेरी, नव्या क्रमांकाची बाळू शिंदीकुरबेट, सचिन पाटील या कुस्त्या डावप्रतिडावाने झुंजल्या. पण वेळेअभावी या कुस्त्या बरोबरीत सोडविण्यात आल्या. दहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत मंजुने अथणीच्या मुल्लाला एकेरी हाताच कस चढवित चित केले. त्याचप्रमाणे भूमीपुत्र मुतगा, सोमराज हुदली, कासिम इंगळगी, सत्याप्पा हुदली, रामगौडा सुल्तानपूर, अस्लम इंगळगी, संजू इंदरगी, शिवाण्णा हुदली, आकाश हुदली, मदन हुदली यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून विजय मिळविले. आकर्षक कुस्तीत बेळगावच्या उगवता मल पार्थ कंग्राळी व साहिल बेनापूर यांच्यात लढत झाली. दुसऱ्या मिनिटाला पार्थ कंग्राळीने एकेरीपट काढुन साहिलला खाली घेत एकचाक मारण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये साहीलने सुटका करून घेतली. पाचव्या मिनिटाला साहीलने एकेरीपट काढीत पार्थला खाली घेतले व घिस्सा मारण्याचा प्रयत्न केला. पण पार्थ पाटीलने खालून डंकी मारून साहीलवर कब्जा मिळविला. व दहाव्या मिनिटाला पायाला एकलांगी भरून साहीलला आसमान दाखवित चांदीच्या गदेच्या मानकरी ठरला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या पार्थ पाटीलला चांदीची गदा देऊन त्याचा गौरव करण्यात आला.
Home महत्वाची बातमी हुदली कुस्ती मैदानात प्रकाश बनकर विजयी
हुदली कुस्ती मैदानात प्रकाश बनकर विजयी
बेळगावचा पार्थ पाटील गदेचा मानकरी बेळगाव : हुदली (ता. जि. बेळगाव) येथील महालक्ष्मी यात्रा व रथोत्सव निमित्त भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. या मैदानात विशाल बेंदू हरियाणा गंभीर जखमी झाल्याने प्रकाश बनकरला विजयी घोषित करण्यात आले तर आकर्षक कुस्तीत बेळगावचा उगवता मल्ल पार्थ कंग्राळीने साहील बेनापूरचा एकलांगी डावावर पराभव करून चांदीच्या गदेचा मानकरी […]