मोदींची वाटचाल हुकुमशाहीच्या दिशेने : प्रकाश आंबेडकर

मोदींची वाटचाल हुकुमशाहीच्या दिशेने : प्रकाश आंबेडकर

मिरज प्रतिनिधी

ईडी, सीबीआयच्या कारवाया, पोलिसांच्या धमक्या आणि जुलमी वसुली यामुळे देशातील 17 लाख हिंदू कुटुंबांनी नागरिकत्त्वासह भारत देश सोडला. नरेंद्र मोदींचे कार्यालय हे सध्या वसुलीचे कार्यालय झाले असून, त्यांची वाटचाल हुकुमशाहीच्या दिशेने सुरू आहे. पुन्हा ते सत्तेवर आले तर भारताचा नकाशाही बदलेल. मुख्यमंत्री असताना गोध्राकांड घडले. तर पंतप्रधान असताना मणिपूर हिंसाचार समोर आला, असा घणाघाती आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी केला. अत्याचारी भाजपला थोपविण्यासाठी सांगलीतून विशाल पाटील यांना मतदारांनी साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
सांगली लोकसभा मतदार संघातील महाआघाडीचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ रविवारी शहरातील किसान चौकात प्रकाश आंबेडकरांची जाहीर सभा झाली. या सभेला मिरज विधानसभा मतदार संघातील मतदारांनी विक्रमी हजेरी लावली होती. त्यावेळी आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढविला. सभेसाठी माजीमंत्री अजितराव घोरपडे, श्रीमती जयश्रीताई पाटील, किशोर जामदार, विजयराव धुळूगुळू, मैनुद्दीन बागवान, सुरेशबापू आवटी, वंचित बहुजनचे युवक प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजित घाटे यांच्यासह निरंजन आवटी, संदीप आवटी, अय्याज नायकवडी, करण जामदार, संजय मेंढे, सदानंद कबाडगे, शिवाजी दुर्वे, राजेंद्र गवई यांच्यासह माजी नगरसेवक, विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.