प्रकाश आंबेडकर यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका
ओबीसी एल्गार मेळाव्यावरून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “अंबडमधील मेळाव्यात छगन भुजबळ यांनी मनोज जरागेंना राजकीय आव्हान देण्याची काय गरज होती? आरक्षणावरून भांडून काय सिद्ध होणार आहे?” असा सवाल करत प्रकाश आंबेडकर यांनी भुजबळांवर निशाणा साधला.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं, अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता राज्यातील ओबीसी नेतेही एकवटले आहेत. आज अंबड येथे छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात एल्गार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात भुजबळांनी आक्रमक भाषण करत मनोज जरांगे पाटील यांच्यावर शेलक्या शब्दांत टीकास्त्र सोडलं. “ओबीसींच्या तुटपुंज्या आरक्षणात आता वाटेकरी तयार केले जात आहे. पण आम्ही ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. आमच्या वाट्याला याल तर याद राखा,” असं भुजबळ यांनी म्हटलं होतं. छगन भुजबळ यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.