प्रज्ज्वलचे उड्डाण, एसआयटीचा सापळा

प्रज्ज्वलचे उड्डाण, एसआयटीचा सापळा

बेंगळूर विमानतळावर अधिकारी तळ ठोकून
बेंगळूर : अश्लील चित्रफीत आणि लैंगिक शोषण प्रकरणासह तीन प्रकरणांमध्ये आरोप असणाऱ्या हासनचे खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. मागील 34 दिवसांपासून विदेशात फरार असलेल्या प्रज्ज्वल यांनी जर्मनीच्या म्युनिच येथून गुरुवारी दुपारी बेंगळूरच्या दिशेने विमानातून प्रस्थान केले. येथील केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर मध्यरात्री आगमन झाल्यानंतर त्यांना एसआयटीकडून ताब्यात घेण्यात येणार आहे. जर्मनीतील लुफ्तान्सा एअरलाईन्स विमानातील बिझनेस क्लासचे तिकीट बुकींग केलेल्या प्रज्ज्वल यांनी म्युनिच विमानतळावर लगेज चेक इन केल्यानंतर त्यांच्या परतीच्या प्रवासाची अधिकृत माहिती एसआयटी अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार 11 तासांच्या प्रवासानंतर मध्यरात्री 1:30 च्या सुमारास ते बेंगळूर विमानतळाच्या टर्मिनल-2 वर पोहोचतील अशी माहिती सुत्रांनी दिली. त्यानंतर लगेच इमिग्रेशन विभागाकडून त्यांची चौकशी करून नंतर एसआयटीकडून ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू होईल.
अधिकारी बुधवारपासूनच विमानतळावर ठाण मांडून
प्रज्ज्वल रेवण्णा यांनी सोमवार 27 मे रोजी विदेशातून व्हिडिओ जारी करून 31 मे रोजी सकाळी 10:30 वाजता एसआयटीसमोर हजर होणार असल्याचे सांगितले होते. त्यांनी दोन दिवसांपूर्वी तयार केलेला हा व्हिडिओ हंगेरीच्या बुडापेस्ट येथून जारी केला होता. बुधवारी त्यांनी बेंगळूरला परतण्यासाठी लुफ्तान्सा एअरलाईन्सचे (एलएच 764) विमानाचे तिकीट बुकींग केले होते. त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी बुधवारपासूनच एसआयटीचे अधिकारी ठाण मांडून होते. प्रज्ज्वल बेंगळूर विमानतळावर उतरणार असल्याची खातरजमा झाल्यानंतर एसआयटने 8 ते 10 अधिकाऱ्यांना विमानतळाच्या टर्मिनलमध्ये प्रवेश करण्यासाठी पास देण्याची विनंती केली. त्यानुसार विमानतळ प्राधिकरणाने रात्रीच अधिकाऱ्यांना त्यांची ओळख व इतर कागदपत्रांची पडताळणी करून पास बनवून दिले. तसेच लुकआऊट नोटीस जारी करण्यात आल्याने विमानतळ परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला.
अटकपूर्व जामीन याचिकेवर आज सुनावणी
विदेशातून परतल्यानंतर एसआयटीचे अधिकारी अटक करण्याची भीती असल्याने प्रज्ज्वल यांनी बुधवारी आपल्या वकिलांमार्फत बेंगळूरमधील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयात अटकपूर्व जामीन याचिका दाखल केली होती. मात्र,  त्यावर तातडीने सुनावणी करण्यास न्यायालयाने नकार दिला होता. त्यामुळे 31 मे रोजी त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार असून त्याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. प्रज्ज्वल यांच्याविरुद्ध सीआयडी पोलीस स्थानक, सायबर गुन्हे विभाग आणि हासन जिल्ह्याच्या होळेनरसीपूर पोलीस स्थानकात गुन्हे दाखल आहेत.
मतदानानंतर दुसऱ्याच दिवशी विदेशात काढला पळ
हासन लोकसभा मतदारसंघात 26 एप्रिल रोजी मतदान झाले होते. तत्पूर्वी तीन दिवस अगोदर निजदचे उमेदवार असणारे प्रज्ज्वल यांच्याशी संबंधित व्हिडिओ असणारे पेनड्राईव्ह व्हायरल झाले होते. त्यामुळे मतदानानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी जर्मनीत पळ काढला होता. त्यांच्याविरोधात एसआयटीने समन्स बजावले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी अज्ञात ठिकाणाहून व्हिडिओ जारी करत सहा दिवसांचा अवधी मागितला. मात्र, ते चौकशीला हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली. त्यापाठोपाठ इंटरपोलच्या मदतीने ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली. या दरम्यान, दोन वेळा परतीच्या विमानप्रवासाचे बुकींग केलेले तिकीट त्यांनी रद्द केले होते. त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी एसआयटीने विशेष न्यायालयाकडून अटक वॉरंटही जारी केले होते.