प्रज्ञानंद, विदितचे दणदणीत विजय, गुकेशने नाकामुराला रोखले

वृत्तसंस्था /टोरँटो कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेच्या सहाव्या फेरीत ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद आणि विदित गुजराथी यांनी दणदणीत विजय मिळवले, तर डी. गुकेशने आपला सामना अनिर्णीत राखून संयुक्तरीत्या अव्वल स्थान राखले आहे. अझरबैजानच्या निजात आबासोव्हवर प्रज्ञानंदने विजय मिळविला, तर गुजराथीने फ्रान्सच्या अलीरेझावर मात केली. गुकेशची गाठ अमेरिकेच्या हिकारू नाकामुराशी पडली होती. अद्याप आठ फेऱ्या शिल्लक असताना 17 वर्षीय […]

प्रज्ञानंद, विदितचे दणदणीत विजय, गुकेशने नाकामुराला रोखले

वृत्तसंस्था /टोरँटो
कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेच्या सहाव्या फेरीत ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद आणि विदित गुजराथी यांनी दणदणीत विजय मिळवले, तर डी. गुकेशने आपला सामना अनिर्णीत राखून संयुक्तरीत्या अव्वल स्थान राखले आहे. अझरबैजानच्या निजात आबासोव्हवर प्रज्ञानंदने विजय मिळविला, तर गुजराथीने फ्रान्सच्या अलीरेझावर मात केली. गुकेशची गाठ अमेरिकेच्या हिकारू नाकामुराशी पडली होती. अद्याप आठ फेऱ्या शिल्लक असताना 17 वर्षीय गुकेश आणि इयान नेपोम्नियाची यांनी पुऊष विभागात प्रत्येकी चार गुणांसह आघाडी कायम राखली आहे. ‘फिडे’च्या ध्वजाखाली खेळणाऱ्या रशियन नेपोम्नियाचीने अव्वल मानांकित अमेरिकेच्या फॅबियानो काऊआनासोबतचा सामना बरोबरीत सोडविला. महिलांच्या गटात मात्र भारताची वाट्याला निराशा आली. कारण आर. वैशालीला रशियाच्या कॅटेरिना लागनोकडून पराभव पत्करावा लागला. वैशाली ही प्रज्ञानंदची थोरली बहीण असून तिला या स्पर्धेत पुनरागमन करण्यासाठी अजूनही भरपूर वाव आहे.
कोनेरू हम्पीलाही चीनच्या टिंगजी लेईकडून पराभव पत्करावा लागला, तर बल्गेरियाची नुरग्युल सलीमोव्हा रशियाच्या अॅलेक्झांड्रा गोर्याचकिना हिचे आव्हान पेलू शकली नाही आणि तिला पराभवाचा सामना करावा लागला. प्रज्ञानंद 3.5 गुणांसह काऊआनासमवेत तिसऱ्या स्थानावर असून गुजराथी 3 गुणांसह नाकामुराबरोबर संयुक्तपणे पाचव्या स्थानावर आहे. अलीरेझा आणि आबासोव्ह यांच्यासाठी मात्र मार्ग संपल्यात जमा आहे. वर्षातील या सर्वांत मोठ्या स्पर्धेतील अर्ध्या टप्पा संपत आलेला असताना ते दोघेही फक्त 1.5 गुणांसह तळाशी आहेत. महिला गटात चीनच्या झोंगई टॅनने आणखी एक प्रगती करत युक्रेनच्या अॅना मुझीचूकवर विजय मिळवला. सहा सामन्यांतून 4.5 गुणांसह टॅन आघाडीवर असून तिला फक्त गोर्याचकिनाकडून धोका आहे, जी अर्ध्या गुणाने मागे आहे. लागनो 3.5 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे आणि लेईपेक्षा अर्ध्या गुणाने पुढे आहे. वैशाली आणि सलीमोव्हा यांचे 2.5 गुण झाले असून हंपी मुझीचूकसह 2 गुण घेत तळाशी आहे.