काणकोणातील आसरास्थळांची वाली नसल्यागत स्थिती

आपत्कालीन सेवेसाठी 9 कोटी रुपये खर्चून तीन ठिकाणी केली होती उभारणी, चापोलीतील प्रकल्पाला झुडपांचा वेढा काणकोण : काणकोण तालुक्यात 2009 साली आलेल्या पुरानंतर सावधगिरीचा उपाय म्हणून आपत्कालीनप्रसंगी सेवेसाठी उभारलेल्या आसरास्थळांना कोणीच वाली नाही की काय अशी अवस्था या ठिकाणी निर्माण झाली आहे. जलस्रोत खात्याच्या अधिपत्याखाली पैंगीण पंचायतीत महालवाडा, काणकोण नगरपालिका क्षेत्रात नगर्से आणि श्रीस्थळ पंचायतीत […]

काणकोणातील आसरास्थळांची वाली नसल्यागत स्थिती

आपत्कालीन सेवेसाठी 9 कोटी रुपये खर्चून तीन ठिकाणी केली होती उभारणी, चापोलीतील प्रकल्पाला झुडपांचा वेढा
काणकोण : काणकोण तालुक्यात 2009 साली आलेल्या पुरानंतर सावधगिरीचा उपाय म्हणून आपत्कालीनप्रसंगी सेवेसाठी उभारलेल्या आसरास्थळांना कोणीच वाली नाही की काय अशी अवस्था या ठिकाणी निर्माण झाली आहे. जलस्रोत खात्याच्या अधिपत्याखाली पैंगीण पंचायतीत महालवाडा, काणकोण नगरपालिका क्षेत्रात नगर्से आणि श्रीस्थळ पंचायतीत चापोली या ठिकाणच्या धरणाजवळ अंदाजे 9 कोटी रु. इतका खर्च करून ही अद्ययावत सुविधांनी युक्त आसरास्थळे उभारली आहेत. वर्षभरापूर्वी जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, सभापती रमेश तवडकर, स्थानिक नगराध्यक्ष, सरपंच, पंच, नगरसेवक यांच्या उपस्थितीत या तिन्हा प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा झाला होता. मागच्या वर्षभरात हे तिन्ही प्रकल्प कधी उघडले गेले, आजवर किती जणांनी त्याचा लाभ घेतला आणि या प्रकल्पांच्या देखभालीची जबाबदारी कोणावर सोपविली आहे ते स्पष्ट करण्याची मागणी सर्व थरांतून व्हायला लागली आहे.
या तिन्ही प्रकल्पांत अद्ययावत सुविधा असून सभागृहृ, स्वयंपाकघर, खोल्या, त्यात लागणाऱ्या खाटा, कपाटसारखे फर्निचर तसेच वीज, पाण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. त्यातील नगर्से येथील आसरास्थळाची जबाबदारी काणकोण पालिका,. तर महालवाडा, पैंगीण येथील आसरास्थळाची जबाबदारी तात्पुरती स्थानिक पंचायतीकडे दिलेली असली, तरी त्यासंबंधी अधिकृत असा काहीच दस्तऐवज नाही. महालवाडा येथील आसरास्थळाच्या एका खोंलीत सरकारी प्राथमिक शाळेचे वर्ग चालतात. बाकीची जागा विनावापर पडून आहे. तर नगर्से येथील प्रकल्प कधी तरी काणकोण पालिकेची पत्रकार परिषद, मासिक बैठक, शिमगोत्सवाच्या बैठका, एखादे वैद्यकीय शिबिर यासाठी वापरला जातो. बाकीचे दिवस सर्वत्र सामसूमच असते असे दिसून येत आहे.
चापोली धरणाजवळ बांधलेल्या भव्य अशा प्रकल्पाच्या मुख्य दरवाजाला टाळे ठोकलेले आहे. या प्रकल्पाची जबाबदारी काणकोणच्या जलस्त्रोत कार्यालयाकडे न देता फोंडा येथील विभागीय कार्यालयाकडे देण्यात आलेली आहे. या इमारतीच्या चाव्या नेमक्या कोणाकडे आहेत यासारख्या गोष्टी गुलदस्त्यात आहेत. या प्रकल्पाच्या देखरेखीसाठी एक रक्षक नेमण्यात आलेला आहे. कधी तरी हा रक्षक येतो-जातो. त्यामुळे या प्रकल्पाच्या चारही बाजूंनी झुडुपे वाढलेली आहेत, इमारतीवर कोळीष्टके लटकत आहेत, इमारतीवरील रंग जाऊ लागला आहे. आपत्कालीन सेवेसाठी कोट्यावधी रुपये खर्च करून उभारलेल्या या प्रकल्पांची जर योग्य ती देखभाल घेतली नाही, तर काणकोणात आदिवासी कल्याण खात्यामार्फत आमोणे, येडा, गावडोंगरी, गुळे या भागांत उभारण्यात आलेल्या संस्कृती भवनांसाठी त्यांची अवस्था व्हायला उशीर लागणार नाही, अशा प्रतिक्रिया काणकोणच्या जागरुक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहेत. जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी या प्रकरणी लक्ष देण्याची मागणी होत आहे.