मुंबईत राजकीय सन्नाटा
2009 च्या लोकसभा आणि विधानसभा मतदार संघ पुनर्रचनेनंतर मुंबई आणि ंठाण्याला विशेष महत्त्व आले. लोकसभेच्या मुंबईत 6 तर विधानसभेच्या 36 तर ठाण्यात लोकसभेच्या 4 तर विधानसभेच्या 24 जागा अशी रचना झाल्याने महाराष्ट्रातील राजकारणाच्या सत्तेचा सोपान जो पूर्वी ग्रामीण राजकारणावर आधारलेला होता, त्या तुलनेत या पुनर्रचनेनंतर मुंबई ठाण्याचे महत्त्व वाढले. मुंबई ठाण्यात शेवटच्या टप्प्यात 20 मे ला निवडणूक होणार असल्याने एकीकडे मुंबईतील तापमान वाढलेले असताना राजकीय तापमान मात्र अद्यापही वाढलेले नाही.
राज्यात लोकसभा निवडणुकांचा धुरळा चांगलाच उडलेला आहे. पहिल्या टप्प्यातील 5 जागांसाठी मतदानाच्या टक्केवारीत झालेली वाढ ही चिंताजनक असताना आता दुसऱ्या टप्प्यातील 8 जागांसाठी येत्या शुक्रवारी म्हणजे 26 एप्रिलला होत आहे. मुंबईतील सहा आणि बाजुच्या ठाणे येथील चार लोकसभा मतदार संघातील अजून उमेदवार नक्की न झाल्याने मुंबईत राजकीय धुरळा उडालेला नाही. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 3 मे असणार असून अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 6 मे आहे. त्यामुळे मुंबई आणि ठाण्यात खऱ्या अर्थाने राजकीय शिमग्याला सुरूवात ही 6 मे नंतर होईल.
1 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्याचे कसे प्रयत्न केले जात आहेत हे सांगितले जाईल. मुंबईतील चाकरमानी ‘मे’च्या मध्यात गावाला जात असल्यानेच तसेच मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठीच मुंबईतील लोकसभेची निवडणूक शेवटच्या टप्प्यात घेतल्याचा मुद्दाही प्रचारात वापरला जाईल. त्यामुळे मुंबईतील प्रचाराचे मुद्दे स्थानिक, राज्य, देशपातळी ते आंतरराष्ट्रीय पातळीवरचे असतील, सध्या मुंबईच्या सहा लोकसभा मतदारसंघापैकी केवळ दोन मतदार संघातील उमेदव़ारी प्रमुख पक्षांनी जाहीर केल्या आहेत. महाआघाडी आणि महायुत्यांमध्ये अनेक पक्ष असल्याने नेमकी उमेदवारी कुणाला मिळणार हे जाहीर नसल्याने कार्यकर्त्यांवर सबुरीने घेण्याची वेळ आली आहे. दक्षिण मध्य मुंबईत शिंदे गटाचे राहूल शेवाळे तर ठाकरे गटाचे अनिल देसाई तर ईशान्य मुंबईतून ठाकरे गटाचे संजय दिना पाटील आणि भाजपाचे मिहिर कोटेचा हे निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांनी मतदारांच्या गाठीभेटींवर जोर दिला आहे.
दक्षिण मुंबईत ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांनी आपल्या प्रचारावर जोर दिला आहे. उत्तर मुंबईत भाजपाचे पियुष गोयल यांना उमेदवारी दिली असून त्यांनी तेथे मतदारांना साद घालण्यास सुरूवात केली आहे. काही मतदारसंघासाठी उमेदवारांची संभाव्य नावे चर्चेत असली तरी पक्षाने जाहीर केल्याशिवाय तेही हालचाल करायला तयार नाहीत. कारण भाजपच्या पहिल्या यादीत उत्तर मुंबईत 2019 ला तब्बल 4 लाख 65 हजार इतके मताधिक्य घेऊन निवडून आलेल्या गोपाळ शेट्टी यांचे तिकीट कापले गेले. मनोज कोटक यांना नारळ देण्यात आला. पुनम महाजन अद्याप वेटींगवर असताना आपला अतिउत्साह आपल्याला नडु शकतो. त्यामुळे सगळे उमेदवारच नव्हे तर कार्यकर्तेही शांत आहेत.
दुसरीकडे शिंदे गटाच्या राहुल शेवाळे यांच्या नावाची दक्षिण मध्य मुंबईसाठी घोषणा करण्यात आली. गजानन किर्तीकर खासदार असलेल्या उत्तर-पश्चिम तर अरविंद सावंत खासदार असलेल्या दक्षिण मुंबईत महायुतीचा उमेदवार जाहिर झालेला नाही. काँग्रेस नेते आणि माजी खासदार संजय निरूपम यांनी काँग्रेसचा दिलेला राजीनामा तसेच अभिनेता गोविंदा यांनी शिंदे गटात केलेला प्रवेश बघता ऐनवेळी राजकीय समीकरणे बदलू शकतात. शिवसेना ठाकरे गटाकडून अरविंद सावंत, अनिल देसाई आणि अमोल किर्तीकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
विशेष म्हणजे 2009 ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील 6 पैकी 5 खासदार निवडून आलेल्या काँग्रेसने मुंबईतील एकही उमेदवार जाहीर केलेला नाही. 2009 ला निवडून आलेल्या पाच खासदारांपैकी मिलिंद देवरा आणि संजय निरूपम यांनी काँग्रेस सोडली आहे, तर गुरूदास कामत आणि एकनाथ गायकवाड यांचे निधन झाले आहे.
फक्त प्रिया दत्त ह्या काँग्रेसमध्ये असल्या तरी 2014 आणि 2019 ला झालेल्या दोन पराभवानंतर प्रिया दत्त ह्या काँग्रेसमध्ये किती सक्रिय आहेत, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. मुंबई बरोबरच ठाणे आणि पालघर लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवारांचा तिढा कायम आहे. भिवंडी येथून केंद्रीय मंत्री कपिल पाटील तर कल्याण येथुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे, तर महाआघाडीने भिवंडीत राष्ट्रवादी शरद पवार गटाने बाळ्यामामा म्हात्रे, पालघरमध्ये शिवसेना ठाकरे गटाने भारती कामडी, ठाण्यात राजन विचारे तर कल्याणमध्ये शिवसेना ठाकरे गटाने वैशाली दरकेर-राणे यांना उमेदवारी घोषित केली आहे.
भिवंडी लोकसभा मतदार संघातील भिवंडी-पूर्व विधानसभेचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला असून, ते लोकसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या कपिल पाटील यांच्या विरोधात असणाऱ्या काँग्रेसच्या सुरेश तावरे यांना रईस शेख यांच्या मतदार संघातून लिड मिळाले होती, राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादीत पडलेली फुट, त्यामुळे बदललेल्या युत्या आणि आघाड्या याचा कोणाला फायदा आणि कोणाला तोटा होईल हे सांगणे कठीण आहे.
भिवंडीत राष्ट्रवादीचे बाळ्या मामा म्हात्रे यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यासमोर यावेळी चांगलेच आव्हान निर्माण केले आहे जर सपाचे रईस शेख यांनी निवडणूक लढविली तर याचा मोठा फटका हा राष्ट्रवादीच्या उमेदवारला बसू शकतो तर दुसरीकडे छत्रपती संभाजी नगरमध्ये 2019 च्या निवडणुकीत वंचित आणि एमआयएम युतीचे इम्तियाज जलील यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा अवघ्या 4492 मतांनी पराभव केला होता. त्यामुळे भिवंडीतील मुस्लिमांची निर्णायक मते बघता शेख यांची पुढील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
प्रवीण काळे
Home महत्वाची बातमी मुंबईत राजकीय सन्नाटा
मुंबईत राजकीय सन्नाटा
2009 च्या लोकसभा आणि विधानसभा मतदार संघ पुनर्रचनेनंतर मुंबई आणि ंठाण्याला विशेष महत्त्व आले. लोकसभेच्या मुंबईत 6 तर विधानसभेच्या 36 तर ठाण्यात लोकसभेच्या 4 तर विधानसभेच्या 24 जागा अशी रचना झाल्याने महाराष्ट्रातील राजकारणाच्या सत्तेचा सोपान जो पूर्वी ग्रामीण राजकारणावर आधारलेला होता, त्या तुलनेत या पुनर्रचनेनंतर मुंबई ठाण्याचे महत्त्व वाढले. मुंबई ठाण्यात शेवटच्या टप्प्यात 20 मे […]