लोकसभेआधी हरयाणात राजकीय भूकंप

मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचा राजीनामा; भाजप-जेजेपी युती तुटली चंदिगढ : हरयाणात विधानसभेचा कार्यकाळ नोव्हेंबर २०२४ मध्ये संपणार आहे. त्याआधीच राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झालीय. भाजप आणि जेजेपी यांची युती तुटली आहे. यामुळे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी राजीनामा दिला आहे. आता भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. यासाठी अपक्ष आणि जेजेपीच्या […]

लोकसभेआधी हरयाणात राजकीय भूकंप

मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचा राजीनामा; भाजप-जेजेपी युती तुटली
चंदिगढ : हरयाणात विधानसभेचा कार्यकाळ नोव्हेंबर २०२४ मध्ये संपणार आहे. त्याआधीच राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झालीय. भाजप आणि जेजेपी यांची युती तुटली आहे. यामुळे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी राजीनामा दिला आहे. आता भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. यासाठी अपक्ष आणि जेजेपीच्या पाच आमदारांचा भाजपला पाठिंबा असल्याची माहिती समजते. मनोहरलाल खट्टर हे राजभवनावर दाखल झाले असून त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा सोपवला आहे. भाजप आणि जेजेपी (भाजप जेजेपी आघाडी) यांच्यातील जवळपास साडेचार वर्षे जुने नाते तुटले आहे. जेजेपीसोबतची युती तोडल्यानंतर भाजपच्या नव्या सरकारमध्ये नवा मुख्यमंत्री असेल. त्या दृष्टीने नायबसिंग सैनी यांना मोठी लॉटरी लागू शकते, असे बोलले जात आहे. कारण त्यांच्या नावाची चर्चा आघाडीवर आहे. मात्र, याआधी कृष्णपाल गुर्जर यांचे नावही चर्चेत होते. चंदिगढमध्ये भाजपच्या आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी अपक्ष आमदारही पोहोचले आहेत. अपक्ष आमदार नयनपाल रावत यांनी मनोहरलाल खट्टर यांची भेट घेतली आणि भेटीनंतर त्यांनी मोठं विधान केलं. भाजप आणि जेजेपी युती तुटली आहे. अपक्ष आमदारांमध्ये बहुतांश आमदार हे भाजपच्या विचारधारेचे आहेत. विधानसभेला भाजपने त्यांना तिकिट नाकारलं होतं पण अपक्ष निवडणूक लढवून ते जिंकले होते. हरयाणा विधानसभेत ९० जागा आहेत. २०१९ च्या निवडणुकीत भाजपने ४० जागा जिंकल्या, त्यांना बहुमताचा आकडा गाठता आला नाही. जेजेपीसोबत युती करत गेल्या साडेचार वर्षांपासून सरकार चालवलं. जेजेपीकडे १० आमदार आहेत. दुसऱ्या बाजूला काँग्रेसला ३१ जागा मिळाल्या होत्या. आता भाजप स्वबळावर सरकार बनवण्याच्या तयारीत असून यासाठी त्यांना अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता असेल.