पोलिसांचा वावर… तरीही गुन्हेगारीचे कॉल सेंटर!

हाकेच्या अंतरावरच पोलीस ठाणे अन् चौकी, स्थानिक पोलिसांची संशयास्पद भूमिका : संशयितांची कोठडीत घेऊन चौकशी करणार  बेळगाव : बेळगावात बसून अमेरिकन नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरमधील 33 जणांना बेळगाव पोलिसांनी अटक केली आहे. या मोठ्या कारवाईमुळे पोलिसांचे कौतुक होत असतानाच एपीएमसी पोलीस स्थानकापासून केवळ हाकेच्या अंतरावर असणारे  कॉल सेंटर पोलिसांना कसे दिसले नाही? असा […]

पोलिसांचा वावर… तरीही गुन्हेगारीचे कॉल सेंटर!

हाकेच्या अंतरावरच पोलीस ठाणे अन् चौकी, स्थानिक पोलिसांची संशयास्पद भूमिका : संशयितांची कोठडीत घेऊन चौकशी करणार 
बेळगाव : बेळगावात बसून अमेरिकन नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरमधील 33 जणांना बेळगाव पोलिसांनी अटक केली आहे. या मोठ्या कारवाईमुळे पोलिसांचे कौतुक होत असतानाच एपीएमसी पोलीस स्थानकापासून केवळ हाकेच्या अंतरावर असणारे  कॉल सेंटर पोलिसांना कसे दिसले नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आझमनगरमधील बॉक्साईट रोडला लागूनच असलेल्या मोक्याच्या ठिकाणी कुमार हॉल आहे. याच कुमार हॉलमध्ये कॉल सेंटर थाटण्यात आले होते. अमेरिकन नागरिकांना लक्ष्य बनविण्यासाठी कॉल सेंटर थाटणारे गुजरात व पश्चिम बंगालमधील आहेत. ते अद्याप फरारी आहेत. परराज्यातील तरुणांना बोलावून त्यांना याकामी जुंपण्यात आले होते.
परराज्यातील तरुण कामाला
दिल्ली, गुजरात, राजस्थान, उत्तराखंड, मेघालय, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश, झारखंड, आसाम, नागालँड येथील तरुणांना बोलावून त्यांना कॉल सेंटरमध्ये कामाला जुंपण्यात आले होते. त्यांची राहण्याची व खाण्यापिण्याची सोयही कॉल सेंटर चालकांकडूनच केली जात होती. ज्या कुमार हॉलमध्ये कॉल सेंटर थाटण्यात आले आहे, त्याच्या मालकांना नेमके तेथे काय चालते, याची कल्पना आली नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कुमार हॉलपासून हाकेच्या अंतरावर एपीएमसी पोलीस ठाणे आहे. कॉल सेंटरपासून केवळ शंभर मीटर अंतरावर एक पोलीस चौकीही आहे. पोलिसांची वाहने नेहमी तेथे असतात. मुख्य चौकाला लागूनच हा हॉल असल्यामुळे पोलिसांचा कायम वावर असतो. तरीही कॉल सेंटरची माहिती स्थानिक पोलिसांना कशी मिळाली नाही? की या कामासाठी त्यांचीही मौन संमती होती? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
अंतर्गत सुरक्षा विभागाने दिलेल्या माहितीवरून सायबर क्राईम विभाग व एपीएमसी पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करून 37 लॅपटॉप, 37 मोबाईल जप्त केले आहेत. अटक करण्यात आलेल्या 33 जणांमध्ये पाच तरुणींचाही समावेश आहे. याच परिसरात त्यांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. तरीही स्थानिक पोलिसांना याची माहिती मिळत नाही, याचे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
तपासासाठी सीआयडीचीही मदत घेण्यात येणार
आजवर शहर व जिल्हा सायबर क्राईम विभागात फसवणुकीचे गुन्हे दाखल केले जात होते. दिल्ली, उत्तरप्रदेश, राजस्थान, गुजरात, झारखंड व परदेशातून सायबर गुन्हेगार बेळगावकरांची फसवणूक करीत होते. आता बेळगावात बसून अमेरिकन नागरिकांना लक्ष्य बनविण्यात येत होते. या प्रकरणाच्या तपासासाठी सीआयडीचीही मदत घेण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे. स्थानिक पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे दिसून येते.
कुमार हॉलच्या मालकाचीही चौकशी करण्यात येणार आहे. ज्या 33 जणांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे, त्यापैकी काही जणांना पोलीस कोठडीत घेऊन त्यांचीही चौकशी करण्यात येणार आहे. यापूर्वी चेन्नई, पश्चिम बंगाल, उडुपी पोलिसांनी सायबर गुन्हेगारीच्या आरोपावरून बेळगाव येथील काही तरुणांची धरपकड केली आहे. सायबर गुन्हेगारांना आपल्या नावे बँक खाते उघडून दिल्याच्या आरोपावरून ही कारवाई झाली होती. आजवर इथेपर्यंतच सायबर गुन्हेगारीत बेळगावचा सहभाग आहे, अशी समज होती. आझमनगर येथील कारवाईने या समजाला छेद दिला आहे.
गुजरात व पश्चिम बंगालमधील दोन युवकांनी बेळगावात येऊन उपनगरात कॉल सेंटर थाटले. मार्च-2025 पासून या कॉल सेंटरमधील कर्मचाऱ्यांना पगार सुरू झाला आहे. याचाच अर्थ किमान एक-दोन महिने आधीपासून त्याची तयारी सुरू झाली असणार. तरीही स्थानिक पोलिसांना यासंबंधी माहिती मिळाली नाही. सध्या बीट व्यवस्था अस्तित्वात आहे. गल्लोगल्ली, घरोघरी भेटी देऊन माहिती घेण्याची व्यवस्था पोलीस दलात आहे. आता तर ‘घरोघरी पोलीस’ हा उपक्रम सुरू झाला आहे. प्रत्येक गल्लीबोळात संपर्क वाढवण्यात आला आहे. तरीही मुख्य चौकात असलेल्या कॉल सेंटरची माहिती मिळत नाही, हे न पटण्यासारखे आहे. इमारतीचा मालक व कॉल सेंटर थाटणाऱ्यांच्या चौकशीतूनच स्थानिक पोलिसांचा या प्रकरणात सहभाग आहे की खरोखरच त्यांना माहिती मिळाली नव्हती, याचा उलगडा होणार आहे. सध्या तरी एपीएमसी पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
…तर बेळगाव गुन्हेगारांचे नंदनवन बनण्यास वेळ लागणार नाही
पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी सूत्रे स्वीकारल्यापासून मटका, जुगार, अमलीपदार्थ आदी गैरधंद्यांविरुद्ध मोहीम उघडली आहे. नशामुक्त बेळगावसाठी सुरू असलेल्या त्यांच्या प्रयत्नांना बेळगावकरांचीही त्यांना साथ मिळाली आहे. पोलीस आयुक्तांच्या स्वच्छ प्रतिमेला धक्का पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा संशय बळावला असून काही अधिकारी आपल्या पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात गैरधंदे चालकांना थारा देत आहेत. गैरधंदे थोपवण्यासाठी मोहीम राबविणाऱ्या आयुक्तांमुळे काही अधिकाऱ्यांची कोंडी झाली आहे. गेल्या पंधरवड्यात घडलेल्या दोन घटनात पोलीस अधिकाऱ्यांनी वठवलेल्या भूमिका लक्षात घेता आयुक्तांनी सुरू केलेल्या मोहिमेच्या विरुद्ध दिशेने त्यांची वाटचाल असल्याचे दिसून येते. अशा प्रकारांना वेळीच आवर घातला नाही तर बेळगाव गुन्हेगारांचे नंदनवन बनण्यास वेळ लागणार नाही.