आईच्या नावे करा वृक्षारोपण 4 महिन्यांनंतर पंतप्रधान मोदींची मन की बात

पॅरिस ऑलिम्पिकसाठी खेळाडूंना शुभेच्छा ► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली पंतप्रधान मोदींनी तब्बल 4 महिन्यांनी ‘मन की बात’ हा रेडिओ कार्यक्रम केला. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणूक, होळी, रथयात्रा-अमरनाथ यात्रा, कुवेत रेडिओचा हिंदी कार्यक्रम, स्थानिक उत्पादने, पर्यावरण दिन आणि योग दिन अशा विविध विषयांवर देशवासियांशी संवाद साधला. पर्यावरण दिनासंबंधी बोलताना त्यांनी आपल्या आईच्या नावे वृक्षारोपण करण्याचा सल्ला त्यांनी […]

आईच्या नावे करा वृक्षारोपण 4 महिन्यांनंतर पंतप्रधान मोदींची मन की बात

पॅरिस ऑलिम्पिकसाठी खेळाडूंना शुभेच्छा
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान मोदींनी तब्बल 4 महिन्यांनी ‘मन की बात’ हा रेडिओ कार्यक्रम केला. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणूक, होळी, रथयात्रा-अमरनाथ यात्रा, कुवेत रेडिओचा हिंदी कार्यक्रम, स्थानिक उत्पादने, पर्यावरण दिन आणि योग दिन अशा विविध विषयांवर देशवासियांशी संवाद साधला. पर्यावरण दिनासंबंधी बोलताना त्यांनी आपल्या आईच्या नावे वृक्षारोपण करण्याचा सल्ला त्यांनी दिला. तर, 26 जुलैपासून होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जाणाऱ्या भारतीय संघाचे पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी काही गोष्टी पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये पाहायला मिळतील असे सांगत खेळाडू देशाचे नाव उज्ज्वल करतील, असा आशावाद व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’ रविवारी (30 जून) पुन्हा सुरू झाला. यापूर्वी 110 वा भाग फेब्रुवारीमध्ये प्रसारित झाला होता. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे गेले चार महिने त्यांचा हा संवाद बंद होता. जवळपास चार महिन्यांच्या विरामानंतर 30 जून रोजी पंतप्रधानांनी 111 व्या भागाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. याप्रसंगी ‘मन की बात’च्या माध्यमातून मी पुन्हा एकदा तुमच्या आणि माझ्या कुटुंबियांमध्ये आलो आहे, असे सांगत त्यांनी विविध विषयांना स्पर्श केला.
लोकसभा निवडणुकीसंबंधी आभार
आज मी देशवासियांचे आभार मानतो की त्यांनी आपल्या संविधानावर आणि देशातील लोकशाही व्यवस्थेवरील अढळ विश्वासाचा पुनऊच्चार केला आहे. नुकतीच झालेली मतदान प्रक्रिया ही जगातील सर्वात मोठी निवडणूक होती. एवढी मोठी निवडणूक जगातील कोणत्याही देशात झाली नाही. या निवडणुकीत 65 कोटी लोकांनी मतदान केले आहे. यासाठी मी निवडणूक आयोगाचे आणि मतदान प्रक्रियेशी संबंधित सर्वांचे अभिनंदन करतो, असे पंतप्रधान म्हणाले.
‘आईच्या नावाने झाड’
पीएम मोदी म्हणाले की, जर मी तुम्हाला विचारले की जगातील सर्वात मौल्यवान नाते कोणते आहे, तर तुम्ही नक्कीच म्हणाल ‘आई’. आपल्या सर्वांच्या आयुष्यात ‘आई’ला सर्वोच्च स्थान आहे. प्रत्येक दु:ख सहन करूनही आई आपल्या मुलाची काळजी घेते. प्रत्येक आई आपल्या मुलावर प्रेम करते. आपल्या जन्मदात्या आईचे हे प्रेम आपल्या सर्वांवरील ऋणासारखे आहे, जे कोणीही फेडू शकत नाही. आम्ही आमच्या आईला काही देऊ शकत नाही, पण दुसरे काही करू शकतो का? हे लक्षात घेऊन यावषी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एक विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेचे नाव ‘एक पेड माँ के नाम’ असे आहे. मी माझ्या आईच्या नावाने एक झाडही लावले आहे. आता प्रत्येकाने या मोहीमेत सहभागी व्हावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.