सीएनजी कमतरतेमुळे वाहनधारकांचे हाल

बेळगाव-खानापुरातील वाहनचालकांना फटका : दक्षिण भागातही पंपांची संख्या वाढविण्याची मागणी बेळगाव : शहरात सीएनजी वाहनांची संख्या वाढत असताना त्यामानाने सीएनजी पंप उपलब्ध नसल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. विशेषत: शहराच्या दक्षिण भागामध्ये सुरू असणारा एकमेव सीएनजी पंप मागील काही दिवसांपासून बंद असल्याने बेळगावसह खानापूर येथील सीएनजी वाहनचालक बेळगावमध्ये येऊन पुन्हा माघारी फिरत आहेत. त्यामुळे सीएनजी पंपाची […]

सीएनजी कमतरतेमुळे वाहनधारकांचे हाल

बेळगाव-खानापुरातील वाहनचालकांना फटका : दक्षिण भागातही पंपांची संख्या वाढविण्याची मागणी
बेळगाव : शहरात सीएनजी वाहनांची संख्या वाढत असताना त्यामानाने सीएनजी पंप उपलब्ध नसल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. विशेषत: शहराच्या दक्षिण भागामध्ये सुरू असणारा एकमेव सीएनजी पंप मागील काही दिवसांपासून बंद असल्याने बेळगावसह खानापूर येथील सीएनजी वाहनचालक बेळगावमध्ये येऊन पुन्हा माघारी फिरत आहेत. त्यामुळे सीएनजी पंपाची संख्या वाढविण्याची मागणी केली जात आहे. पेट्रोलपेक्षा सीएनजी परवडत असल्याने वाहनांची संख्या वाढली आहे. बेळगाव शहराच्या दक्षिण भागात तीन ते चार सीएनजी पंपस्टेशन्स आहेत. परंतु, दक्षिण भागात एकमेव पंपस्टेशन उद्यमबाग येथे आहे. परंतु, काही कारणास्तव हे पंपस्टेशन मागील काही दिवसांपासून बंद असल्याने वाहनचालकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. यामुळे सीएनजी भरण्यासाठी उद्यमबागपासून शिवाजीनगरपर्यंतचा दहा किलोमीटरचा अधिकचा प्रवास करावा लागत आहे.
खानापूरच्या वाहनधारकांचीही धाव
सीएनजी वाहनांची संख्या अधिक असतानाही खानापूर तालुक्यात सीएनजी पंपस्टेशन नाही. त्यामुळे या सर्व वाहनचालकांना बेळगाव गाठावे लागते. उद्यमबाग येथील सीएनजी स्टेशन खानापूर येथील नागरिकांसाठी सोयीचे ठरत होते. विशेषत: रिक्षाचालकांची संख्या मोठी होती. परंतु, उद्यमबाग येथील सीएनजी स्टेशन वारंवार बंद ठेवले जात असल्याने रिक्षाचालकांना शहराच्या उत्तर भागात शिवाजीनगर अथवा गांधीनगरपर्यंतचा प्रवास करावा लागत आहे.
शहरात चार हजारहून अधिक रिक्षा
बेळगाव शहरात नोंदणीकृत चार हजारहून अधिक रिक्षा आहेत. तर अनेक अनधिकृत रिक्षाही चालविल्या जात आहेत. पेट्रोलपेक्षा सीएनजीवर वाहन चालविणे रिक्षाचालकांना परवडत असल्याने अधिकाधिक सीएनजी रिक्षा आहेत. परंतु, वेळच्यावेळी सीएनजी उपलब्ध होत नसल्याने रिक्षाचालकांचे हाल होत आहेत. बऱ्याच वेळा सीएनजीसाठी तासन्तास रांगा लावाव्या लागत आहेत. त्यामुळे शहराच्या दक्षिण भागातही दोन ते तीन सीएनजी स्टेशन सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
सीएनजी स्टेशन वाढविण्याची गरज
बेळगाव शहरात चार हजारांहून अधिक सीएनजी रिक्षा आहेत. शहराच्या उत्तर भागासह दक्षिण भागातही रिक्षांची संख्या अधिक आहे. केवळ रिक्षाच नाही तर चारचाकी वाहनांची संख्या अधिक असल्याने शहराच्या दक्षिण भागात 2 ते 3 सीएनजी स्टेशन सुरू करणे गरजेचे आहे. सध्या केवळ एकच स्टेशन असून त्यावरही भार पडत असल्याने बऱ्याच वेळा स्टेशन बंद असते. त्यामुळे स्टेशनची संख्या वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.
– मन्सूर होनगेकर (बेळगाव रिक्षा संघटना अध्यक्ष)