पूजाकडे दिलेले आमचे रुपये मिळवून द्या

सरकारी नोकरीसाठी पैसे दिलेल्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे : साखळी रवींद्र भवनात घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, तक्रार करुन पुरावेही देण्याचा मुख्यमंत्र्यांचा सल्ला  डिचोली : सरकारी नोकऱ्यांसाठी पूजा नाईक यांना पैसे देऊन नंतर नोकरी नाही व पैसेही नाही,अशा परिस्थितीत फसलेल्या लोकांनी काल रविवारी 16 नोव्हें. रोजी सकाळी साखळी रवींद्र भवन येथे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या जनता दरबारात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. बुडालेले पैसे परत […]

पूजाकडे दिलेले आमचे रुपये मिळवून द्या

सरकारी नोकरीसाठी पैसे दिलेल्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे : साखळी रवींद्र भवनात घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, तक्रार करुन पुरावेही देण्याचा मुख्यमंत्र्यांचा सल्ला 
डिचोली : सरकारी नोकऱ्यांसाठी पूजा नाईक यांना पैसे देऊन नंतर नोकरी नाही व पैसेही नाही,अशा परिस्थितीत फसलेल्या लोकांनी काल रविवारी 16 नोव्हें. रोजी सकाळी साखळी रवींद्र भवन येथे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या जनता दरबारात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. बुडालेले पैसे परत मिळवून देण्यासाठी आम्हाला सहकार्य करा, अशी विनंती केली. यावर मुख्यमंत्र्यांनी तुम्ही पूजा नाईक हिला रोख पैसे दिले आहेत. त्याची कुठेही नोंद नाही. तरीही जवळच्या पोलिसस्थानकावर तक्रार दाखल करा आणि पुरावेही सादर करा, अशी सूचना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांना केली आहे.
गेले अनेक दिवस गोव्यात पुन्हा पॅश फॉर जॉब हे प्रकरण गाजू लागले आहे. या प्रकरणातील प्रमुख संशयित पूजा नाईक यांनी काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत आपण लोकांकडून गोळा केलेले पैसे एक मंत्री व दोन सरकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्याचे सांगितले होते. या अधिकाऱ्यांनी जर आपले पैसे परत केले नाही, तर त्यांची नावे ही जाहीर करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार पूजा नाईक यांना गुन्हा अन्वेषण शाखेतर्फे बोलावण्यात आले होते. गुन्हा अन्वेषण पोलिसांकडून झालेल्या चौकशीत पूजा नाईक यांनी संबंधित मंत्री व दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे उघड केली होती.
त्यानंतर ही चौकशी सुरू असतानाच पूजा नाईक यांनी मंत्री व दोन अधिकाऱ्यांची नावे पणजीतील पत्रकार पारिषदेत जाहीर केली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी सध्या गुन्हा अन्वेषण विभागातर्फे सुरू आहे. सध्या पूजा नाईक जी काही वक्तव्ये करत आहेत ती निराधार असून लोकांच्या तक्रारीनुसार पुढील चौकशी केली जाणार आहे. पूजा नाईक हिची काही मालमत्ता किंवा वस्तू असल्यास त्यातून तुमचे पैसे वसूल होत असल्यास प्रयत्न करू, असे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितले आहे, असे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आलेलयांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
निखिल देसाई यांची पूजला नोटिस
नोकरीसाठी पैसे घेतल्याचा खोटा आरोप करून बदनामी केल्याप्रकरणी आयएएस अधिकारी निखिल देसाई यांच्या वकीलांनी पूजा नाईकला कायदेशीर नोटिस बजावली आहे. 72 तासांत लिखित स्वरूपात तसेच प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावर सार्वजनिक माफी मागावी, अन्यथा फौजदारी कारवाई करू, असा इशारा देसाई यांनी दिला आहे. पूजा नाईकने आरोप केला होता की 2019 च्या मेगा नोकर भरतीदरम्यान 613 उमेदवारांकडून सरकारी नोकरीसाठी घेतलेले 17.68 कोटी रुपये आपण आयएएस अधिकारी निखिल देसाई आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका वरिष्ठ अभियंत्याला दिले होते. त्यानुसार देसाई यांनी ही नोटिस बजावली आहे.
नोटिशीला उत्तर देणार, नार्को टेस्टलाही तयार : पूजा
आयएएस अधिकारी निखिल देसाई यांनी दिलेल्या बदनामीच्या नोटिशीला आपण उत्तर देणार असल्याचे पूजा नाईक हिने सांगितले. तसेच गरज भासल्यास आपली नार्को चाचणीसाठी तयारी असल्याचेही तिने स्पष्ट केले आहे.  तिने एक व्हीडीओ जारी करून सदर माहिती दिली. गोवा पोलिसाना पूर्णपणे सहकार्य करणार आहे.  आपल्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या मोबाईलची पूर्णपणे चौकशी करावी. आपण कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. मानवतेच्या दृष्टीने आपचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांच्याकडे मदत मागितली आणि ती त्यांनी देण्याचे मान्य केले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यामध्ये हस्तक्षेप करून आपण ज्यांना रक्कम दिली ती वसूल करावी, अशी मागणीही पूजा नाईक हिने केली आहे.