अग्निवीर योजनेमुळे लोकांमध्ये नाराजी : संजद

वृत्तसंस्था /पाटणा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा रालोआचे सरकार स्थापन होणार आहे. परंतु यावेळी भाजपला स्वबळावर बहुमत मिळाले नसल्याने आघाडीतील घटक पक्षांना सांभाळण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.  रालोआत तेदेप आणि संजद यांचा पाठिंबा आता महत्त्वपूर्ण ठरला आहे. मोदी सरकारने लागू केलेल्या अग्निवीर योजनेमुळे लोकांमध्ये नाराजी असल्याचे वक्तव्य संजद नेते के.सी. त्यागी यांनी केले आहे. […]

अग्निवीर योजनेमुळे लोकांमध्ये नाराजी : संजद

वृत्तसंस्था /पाटणा
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा रालोआचे सरकार स्थापन होणार आहे. परंतु यावेळी भाजपला स्वबळावर बहुमत मिळाले नसल्याने आघाडीतील घटक पक्षांना सांभाळण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.  रालोआत तेदेप आणि संजद यांचा पाठिंबा आता महत्त्वपूर्ण ठरला आहे. मोदी सरकारने लागू केलेल्या अग्निवीर योजनेमुळे लोकांमध्ये नाराजी असल्याचे वक्तव्य संजद नेते के.सी. त्यागी यांनी केले आहे. अग्निवीर योजनेवरून मतदार नाराज आहेत. या योजनेतील त्रुटींवर विस्तृत चर्चा केली जावी आणि संबंधित त्रुटी दूर केल्या जाव्यात अशी आमच्या पक्षाची इच्छा आहे. तर समान नागरी संहितेवर पक्षाचे अध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी कायदा आयोगाच्या प्रमुखाला पत्र लिहिले होते. आम्ही समान नागरी संहितेच्या विरोधात नाही, परंतु सर्व सबंधित घटकांशी चर्चा करून यावर मार्ग काढला जावा अशी भूमिका त्यागी यांनी मांडली आहे. संजद नेत्याने यावेळी जातनिहाय जनगणनेचाही उल्लेख केला. देशात कुठल्याही पक्षाने जातनिहाय जनगणनेला विरोध दर्शविलेला नाही. तर बिहारने याप्रकरणी देशाला मार्ग दाखवून दिला आहे. पंतप्रधानांनी देखील सर्वपक्षीय शिष्टमंडळासमोर याला विरोध केला नव्हता, असे त्यागी म्हणाले. जातनिहाय जनगणना ही काळाची गरज असून हा मुद्दा आम्ही लावून धरणार आहोत. याकरता आम्ही कुठलीही अट लादणार नाही, सरकारला आमचा बिनशर्त पाठिंबा आहे, परंतु बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळवून देण्याचा मुद्दा आमच्यासाठी महत्त्वाचा असल्याचा दावा संजद नेत्याने केला आहे. तर एक देश, एक निवडणूक प्रस्तावाला पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.