वेदांचा हवाला देऊन लोकांची दिशाभूल केली जाते
अध्याय पहिला
बाप्पा म्हणाले, राजा विषयातून मिळणारे सुख कायम टिकणारे नाही हे लक्षात आले की मनुष्य कायम टिकणाऱ्या सुखाचा शोध घेऊ लागतो. ईश्वर हा आनंदस्वरूप असल्याने त्याची प्राप्ती करून घेतल्यास आपल्याला कायम टिकणाऱ्या आनंदाचा ठेवा मिळेल हे समजले की, ईश्वरप्राप्तीसाठी त्याचे प्रयत्न सुरु होतात. अनेक जन्म त्यासाठी धडपडल्यावर त्याला ईश्वरप्राप्ती होते आणि तो ब्रह्मस्वरूप होतो. ब्रह्मस्वरुपाचे एखाद्या हत्याराने तुकडे करणे किंवा अग्नीने दहन करणे अशक्य आहे. ह्या ब्रह्मावर कशाचाही परिणाम होत नाही. ते पाण्याने भिजत नाही, वायूने शोषले जात नाही, त्याचा वधही करता येत नाही. ब्रह्मस्वरूपाचा जन्म होत नसल्याने त्याला मृत्यूचे भय नसते. त्यामुळे त्याचा कोणत्याही उपायाने नाश होत नाही.
ब्रह्माचे स्वरूप उलगडल्यानंतर बाप्पा आता वेदात अमुक अमुक सांगितलंय असं म्हणून दिशाभूल करणाऱ्या संधीसाधू लोकांच्या वागण्यावर प्रकाश टाकत आहेत. ते म्हणाले,
यामिमां पुष्पितां वाचं प्रशंसन्ति श्रुतीरिताम् ।
त्रयीवादरता मूढास्ततो न्यन्मन्वते पि न ।। 33 ।।
अर्थ- वेदांनी सांगितलेल्या व पुष्पांप्रमाणे मनोहर भासणाऱ्या कर्मविषयक वचनांची जे प्रशंसा करतात, जे मूढ वेदांसंबंधी वादामध्ये रत असतात, त्याखेरीज इतर काही आहे असे मानीत नाहीत.
विवरण-वेद हे ईश्वरनिर्मित आहेत. त्याचा पूर्ण अर्थ जाणून घेणे आवश्यक आहे. पण मूर्ख माणसे त्यातील पूर्ण अर्थ जाणून न घेता केवळ त्यातील भोग ऐश्वर्याची वर्णने करणारा, आपल्या सोयीचा भाग वेगळा काढतात व त्यावरच भर देऊन लोकांची दिशाभूल करतात आणि त्यातच धन्यता मानतात. त्यांना इतर कोणतीच गोष्ट महत्त्वाची वाटत नाही. वास्तविक पाहता विशाल अशा वेदवेलीला पाने, फुले व फळे हे सर्व भाग आहेत पण कुठल्याही गोष्टीतील डोळ्यांना आकर्षून घेणाऱ्या भागाकडे माणसाची नजर चटकन जाते व त्या भागाच्या आकर्षणाने मनुष्य तिथेच गुंतून पडतो. वेदवेलीच्या बाबतीत माणसाचं असंच होतं. वेदवेलीवरील भोग ऐश्वर्याची वचने ही फक्त पाने फुले होत पण ती आकर्षक असल्याने मनुष्य तिथेच रेंगाळतो. प्रत्यक्षात त्याची फळे वेगळीच आहेत. पानेफुले वेलींना शोभा आणतात. त्यायोगे मनुष्य त्यांच्याकडे खेचला जातो पण शोभा आणण्यापलीकडे पानेफुले काहीच करू शकत नाहीत. वेलींचा खरा गाभा फळात असतो. ज्याला फळं खायला मिळतात त्यातील रस चाखायला मिळतो तो खरा भाग्यवान असतो.
बाप्पा म्हणतायत की, वेदरूपी वेलीवरील पानाफुलांची आकर्षक रंगसंगती हे इथं रूपक असून, पानाफुलांची प्राप्ती म्हणजे भोगविषयाची प्राप्ती हेच खरे प्राप्त करण्याचे विषय होत असा सामान्य जनांचा समज करून देण्यात येतो. त्यामुळे भोग ऐश्वर्याच्या प्राप्तीसाठी धडपडणे हेच ध्येय आहे आणि तेच अंतिम साध्य आहे अशी त्यांची दिशाभूल होते. वास्तविक पाहता माणसाच्या मुक्तीमध्ये भोग आणि ऐश्वर्याची लालसा ही मोठीच बाधा असते. ज्याप्रमाणे जाळ्यात अडकलेला मासा पुढे जाऊ शकत नाही तसेच भोग आणि धनाच्या संग्रहात अडकलेला मनुष्य परमात्म्याच्या दिशेने पुढे सरकू शकत नाही. ज्यांना ह्या गोष्टी हव्या असतात ते ईश्वरप्राप्तीत रस न घेता ह्या लोकातील आणि परलोकातील म्हणजे स्वर्गसुखाच्या मागे असतात. त्यासाठी आवश्यक ती कर्मकांडे करण्यात त्यांना धन्यता वाटते. ही सगळी सकाम अनुष्ठाने असून खर्चिक असतात. तसेच त्यात माणसाला शारीरिक कष्ट करावे लागतात. भोग ऐश्वर्याच्या जाळ्यात अडकलेला मनुष्य परमेश्वराला सन्मुख होऊ शकत नाही. त्यामुळे त्याची आध्यात्मिक प्रगती होत नाही.
क्रमश:
Home महत्वाची बातमी वेदांचा हवाला देऊन लोकांची दिशाभूल केली जाते
वेदांचा हवाला देऊन लोकांची दिशाभूल केली जाते
अध्याय पहिला बाप्पा म्हणाले, राजा विषयातून मिळणारे सुख कायम टिकणारे नाही हे लक्षात आले की मनुष्य कायम टिकणाऱ्या सुखाचा शोध घेऊ लागतो. ईश्वर हा आनंदस्वरूप असल्याने त्याची प्राप्ती करून घेतल्यास आपल्याला कायम टिकणाऱ्या आनंदाचा ठेवा मिळेल हे समजले की, ईश्वरप्राप्तीसाठी त्याचे प्रयत्न सुरु होतात. अनेक जन्म त्यासाठी धडपडल्यावर त्याला ईश्वरप्राप्ती होते आणि तो ब्रह्मस्वरूप होतो. […]