कोहली, डु प्लेसिस, करण यांना दंड

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये रविवारी झालेल्या बेंगळूर आणि कोलकाता यांच्यातील सामन्यात आरसीबीचा कर्णधार डु प्लेसिस याला षटकांची गती राखता न आल्याने त्याला आयपीएलच्या शिस्तपालन नियमानुसार 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पंजाब संघाचा कर्णधार सॅम करण यालाही याच गुन्ह्यांबद्दल मिळणाऱ्या मानधनातील 50 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावी लागणार आहे. कोहलीला मात्र […]

कोहली, डु प्लेसिस, करण यांना दंड

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये रविवारी झालेल्या बेंगळूर आणि कोलकाता यांच्यातील सामन्यात आरसीबीचा कर्णधार डु प्लेसिस याला षटकांची गती राखता न आल्याने त्याला आयपीएलच्या शिस्तपालन नियमानुसार 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पंजाब संघाचा कर्णधार सॅम करण यालाही याच गुन्ह्यांबद्दल मिळणाऱ्या मानधनातील 50 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावी लागणार आहे. कोहलीला मात्र पंचांच्या निर्णयाविरुद्ध निषेध व्यक्त केल्याबद्दल त्याच्यावर सामना मानधनाच्या पन्नास टक्के रकमेचा दंड करण्यात आला आहे.
कोहलीला 50 टक्के दंड
हर्षित राणाचा फुलटॉस चेंडू कंबरेच्या वर असूनही पंचांनी तो नोबॉल दिला नाही. या चेंडूवर कोहली झेलबाद असल्याचा निर्णय पंचांनी दिला. त्याविरुद्ध कोहलीने पंचांशी हुज्ज घातली. हॉकआय तंत्राच्या आधारे कोहलीने कंबरेच्या वर असताना चेंडूला फटका मारल्याचे स्पष्ट दिसून आले. त्यावेळी तो क्रीझच्या किंचीत बाहेर उभा होता. तो क्रीझवर सरळ उभा राहिला असता तर चेंडू त्याच्या कंबरेइतक्याच उंचीवरून गेला असता, असे तिसऱ्या पंचांनी ठरविले आणि तो बाद असल्याचा निर्णय कायम ठेवला. तंबूत परतल्यानंतर संतप्त झालेल्या कोहलीने ड्रेसिंगरूमबाहेरील डस्टबिनवर रागाने बॅट मारली. ‘त्याची ही कृती आयपीएल आचारसंहिता भंग करणारी असल्याने त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे,’ असे आयपीएलने म्हटले आहे.
आरसीबी संघाचा या स्पर्धेतील हा सातवा पराभव होता. आरसीबी संघाला या सामन्यात केवळ 1 धावेने हार पत्करावी लागली होती. स्पर्धेतील हा 36 वा सामना होता. या स्पर्धेत बेंगळूर संघाकडून पहिल्यांदाच असा गुन्हा नोंदविला गेला. रविवारी झालेल्या पंजाब आणि गुजरात यांच्यातील सामन्यात पंजाब संघाला षटकांची गती राखता आली नाही. त्यामुळे या संघाचा कर्णधार सॅम करणला मिळणाऱ्या मानधनातील 50 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावी लागणार आहे. या सामन्यात गुजरात टायटन्सने पंजाबचा 3 गड्यांनी पराभव केला. स्पर्धेच्या गुणतक्त्यात पंजाब नवव्या स्थानावर असून त्यांचा हा सलग चौथा पराभव आहे.