मोदी सरकारवर पवारांचा निशाणा

राम मंदिराच्या नावावर भाजपचे राजकारण : निपाणीतील सभेतून शरद पवार यांनी डागली तोफ निपाणी : अयोध्येतील राम मंदिर बांधण्याचा निर्णय सर्वप्रथम राजीव गांधी यांनी पंतप्रधान असताना घेतला होता. त्याचा शिलान्यासही राजीव गांधींनी केला. मात्र त्यानंतर काहीजण न्यायालयात गेल्याने हा प्रश्न रखडला. राम मंदिराला आमचा कधीच विरोध नाही. मर्यादा पुरुषोत्तम रामांचा आदर सर्वांनाच आहे. मात्र लोकांचे […]

मोदी सरकारवर पवारांचा निशाणा

राम मंदिराच्या नावावर भाजपचे राजकारण : निपाणीतील सभेतून शरद पवार यांनी डागली तोफ
निपाणी : अयोध्येतील राम मंदिर बांधण्याचा निर्णय सर्वप्रथम राजीव गांधी यांनी पंतप्रधान असताना घेतला होता. त्याचा शिलान्यासही राजीव गांधींनी केला. मात्र त्यानंतर काहीजण न्यायालयात गेल्याने हा प्रश्न रखडला. राम मंदिराला आमचा कधीच विरोध नाही. मर्यादा पुरुषोत्तम रामांचा आदर सर्वांनाच आहे. मात्र लोकांचे प्रश्न बाजूला ठेवून भाजप आणि आरएसएसकडून राम मंदिराच्या नावावर राजकारण सुरू आहे, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केली. निपाणीत आयोजित सभेत ते बोलत होते. पवार पुढे म्हणाले, राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 11 दिवस उपवास करणार असल्याचे समजते. त्यांच्या श्रद्धेचा आपण आदर करतो. मात्र देशातील गरिबी हटविण्यासाठीही त्यांनी एखादा उपवास करावा. देशातील मूलभूत प्रश्नांपासून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपण कृषिमंत्री असताना महाराष्ट्रात लातूर येथे एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या केल्याचे समजल्यानंतर दिल्लीत जाऊन आपण तत्कालिन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांशी चर्चा केली. यानंतर तात्काळ देशातील शेतकऱ्यांची 72 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. देशाचा आर्थिक कणा शेतकरी आहे. आजही शेतकरी कर्जबाजारी असून यासंदर्भात आपण संसदेत वेळोवेळी प्रश्न उपस्थित केले. मात्र विद्यमान सरकारने याकडे दुर्लक्ष करत उद्योगपतींचे 3 हजार कोटींचे कर्ज माफ केले. सामान्य माणसाच्या हक्क आणि विकासासाठी तसेच सहकार चळवळ टिकावी यासाठी देश पातळीवर आकारास आलेल्या इंडिया आघाडीच्या धोरणांना जनतेने पाठिंबा देण्याची गरज आहे. आज इंडिया आघाडीत कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, दिल्ली, पंजाब, झारखंड, केरळ, तेलंगणा या राज्यांचे मुख्यमंत्री आहेत. समाजा-समाजात अंतर कसे निर्माण करता येईल, हे काम विद्यमान राज्यकर्त्यांकडून सुरू आहे.
देशातील साखर उद्योग अडचणीत
देशात तंबाखूसाठी निपाणी शहर प्रसिद्ध होते. मात्र आता तंबाखूची जागा उसाने घेतल्याचे दिसून येते. आज देशातील साखर उद्योग अडचणीत आहे. आपण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष म्हणून काम करताना आंतरराष्ट्रीय साखर परिषद बोलवली. यात 22 देशांचे प्रतिनिधी, कारखानदार व पाच हजार शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी उसापासून केवळ साखर न बनवता मळीपासून अल्कोहोल, इथेनॉल, हायड्रोजन, विमानासाठी लागणारे इंधन यांची निर्मिती करण्यावर एकमत झाले. शेतकऱ्यांच्या खिशात दोन पैसे जादा जावेत यासाठी हा निर्णय घेतला. देशासमोर आज अनेक प्रश्न उभे असून त्याकडे राज्यकर्त्यांचे साफ दुर्लक्ष झाले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत कर्नाटकच्या जनतेने जो निर्णय घेतला, हा निर्णय देशपातळीवर जनतेने घ्यावा यासाठीच आम्ही इंडिया आघाडीची रचना केली असल्याचेही शरद पवार यांनी सांगितले.