सर्व्हरडाऊनमुळे सिव्हिलमध्ये रुग्णांची हेळसांड

चार तास रांगेत थांबूनही ओपीडी पावती न मिळाल्याने संताप : हॉस्पिटल कर्मचारी-नागरिकांमध्ये वादावादी : रुग्णांसह नातेवाईकांचे हाल बेळगाव : सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्व्हरडाऊन झाल्याने ओपीडी नोंदणी केंद्रासमोर नागरिकांना तासन्तास ताटकळत उभे राहण्याची वेळ आली. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. रुग्णाला घेऊन आलेल्या नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. यामुळे हॉस्पिटल कर्मचारी व नागरिकांमध्ये वादावादी झाली. सिव्हिल […]

सर्व्हरडाऊनमुळे सिव्हिलमध्ये रुग्णांची हेळसांड

चार तास रांगेत थांबूनही ओपीडी पावती न मिळाल्याने संताप : हॉस्पिटल कर्मचारी-नागरिकांमध्ये वादावादी : रुग्णांसह नातेवाईकांचे हाल
बेळगाव : सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्व्हरडाऊन झाल्याने ओपीडी नोंदणी केंद्रासमोर नागरिकांना तासन्तास ताटकळत उभे राहण्याची वेळ आली. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. रुग्णाला घेऊन आलेल्या नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. यामुळे हॉस्पिटल कर्मचारी व नागरिकांमध्ये वादावादी झाली. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. रुग्णांना उपचार घेण्यापूर्वी ओपीडी नोंदणी केंद्रावर नावनोंदणी करून पावती घ्यावी लागते. त्यानंतर पुढील उपचाराला सुरुवात केली जाते. यासाठी नागरिक सकाळपासूनच सदर केंद्रावर गर्दी करतात. सोमवारचा दिवस असल्याने उपचारासाठी मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल झाले होते. अनेक नातेवाईकांनी नोंदणीसाठी रांगा लावल्या होत्या. मात्र सर्व्हरडाऊन झाल्याने नोंदणी करणे अशक्य झाले. त्यामुळे बराचकाळ नागरिकांना ताटकळत उभे रहावे लागले. बाहेर गावांहून आलेल्या रुग्णांचे व नातेवाईकांचे हाल झाले. नोंदणीअभावी रुग्णांवर उपचार करणे अशक्य होते. त्यामुळे अनेक रुग्णांना तासन्तास बाहेरच ताटकळत बसावे लागण्याची वेळ आली. नागरिकांनी चार तास रांगेत थांबूनही नोंदणी होत नसल्याची तक्रार केली. रुग्णाला उपचारासाठी आणण्यात आले. मात्र नावनोंदणी होत नसल्याने उपचार देणे अशक्य झाले आहे. याबद्दल संबंधित नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. सर्व्हरडाऊनच्या समस्येमुळे रुग्णालयात रुग्णांची व नातेवाईकांची तोबा गर्दी झाली होती. दुपारनंतर सर्व्हरडाऊनची समस्या दूर करून सेवा पूर्ववत सुरू केली.
बेंगळूरहूनच सर्व्हरडाऊनची समस्या
सर्व्हरडाऊनची समस्या स्थानिक नाही तर बेंगळूरहूनच निर्माण झाली आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय झाली. मात्र ही समस्या निवारण करण्यासाठी तातडीने उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत.
– अशोक शेट्टी, बिम्स संचालक