आसनांअभावी प्रवाशी भर उन्हात

आसनांची कमतरता : प्रवाशांची गैरसोय, परिवहनचे दुर्लक्ष बेळगाव : स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात आलेल्या मध्यवर्ती बसस्थानकात आसनांची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे प्रवाशांना उन्हातान्हात थांबावे लागत आहे. प्रवाशांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. त्या तुलनेत आसने कमी पडत असल्याने प्रवाशांना नाइलाजास्तव फलाट सोडून बाहेर उन्हात थांबण्याची वेळ आली आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत सुसज्ज अशा बसस्थानकाची […]

आसनांअभावी प्रवाशी भर उन्हात

आसनांची कमतरता : प्रवाशांची गैरसोय, परिवहनचे दुर्लक्ष
बेळगाव : स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात आलेल्या मध्यवर्ती बसस्थानकात आसनांची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे प्रवाशांना उन्हातान्हात थांबावे लागत आहे. प्रवाशांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. त्या तुलनेत आसने कमी पडत असल्याने प्रवाशांना नाइलाजास्तव फलाट सोडून बाहेर उन्हात थांबण्याची वेळ आली आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत सुसज्ज अशा बसस्थानकाची उभारणी करण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी अद्यापही सुविधांची कमतरता भासू लागली आहे. पिण्याचे पाणी, आसने आणि इतर सुविधांअभावी प्रवाशांची गैरसोय होवू लागली आहे. बसस्थानक स्मार्ट झाले. मात्र सुविधा कधी मिळणार, असा प्रश्नही सर्वसामान्य प्रवाशांना पडू लागला आहे. शक्ती योजनेनंतर महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यातच यात्रा, जत्रा आणि लग्नसराईमुळे प्रवाशांची वर्दळ वाढू लागली आहे. त्यामुळे हजारो प्रवाशांनी बसस्थानक गजबजू लागले आहे. मात्र बसस्थानकाच्या फलाटवर आसनांची कमतरता असल्याने प्रवाशांना उन्ह-पावसाचा सामना करत रस्त्यावर थांबावे लागत आहे. उन्हाचा पारा 38 अंशाच्या पुढे आला आहे. त्यामुळे दुपारच्यावेळी शरीराची लाहीलाही होवू लागली आहे. अशा परिस्थितीत प्रवाशांना भर उन्हात ताटकळत थांबण्याची वेळ आली आहे. त्यामुळे महिला प्रवाशांची मोठी कुचंबणा होवू लागली आहे. लांब पल्ल्याच्या आणि स्थानिक शहरी बसस्थानकात फलाट स्वतंत्र करण्यात आले असले तरी दोन्ही फलाटांमध्ये आसनाची कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळे प्रवासी फलाट सोडून रस्त्यावर उभे राहू लागले आहेत. परिवहनने प्रवाशांसाठी नवीन फलाटाची उभारणी करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.