गोवा एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांची चेंगराचेंगरी

एखादी अप्रिय घटना घडल्यावरच नैर्त्रुत्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना जाग येणार का? बेळगाव : गोवा एक्स्प्रेसला नॉन एसी डब्यांची संख्या कमी केल्याने प्रचंड गर्दी होऊ लागली आहे. विशेषत: जनरल व नॉन एसी स्लीपर कोचमध्ये पाय ठेवण्यासही जागा शिल्लक राहात नसल्याने जागा मिळेल तेथे कोंबून प्रवासी प्रवास करत आहेत. नैर्त्रुत्य रेल्वे अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे प्रवाशांचे जीव टांगणीला लागले […]

गोवा एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांची चेंगराचेंगरी

एखादी अप्रिय घटना घडल्यावरच नैर्त्रुत्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना जाग येणार का?
बेळगाव : गोवा एक्स्प्रेसला नॉन एसी डब्यांची संख्या कमी केल्याने प्रचंड गर्दी होऊ लागली आहे. विशेषत: जनरल व नॉन एसी स्लीपर कोचमध्ये पाय ठेवण्यासही जागा शिल्लक राहात नसल्याने जागा मिळेल तेथे कोंबून प्रवासी प्रवास करत आहेत. नैर्त्रुत्य रेल्वे अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे प्रवाशांचे जीव टांगणीला लागले आहेत. त्यामुळे एखाद्याचा जीव गेल्यानंतरच नैर्त्रुत्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना जाग येणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. वास्को-द-गामा ते दिल्ली येथील निजामुद्दिनपर्यंतचा प्रवास करणारी गोवा एक्स्प्रेस बेळगावकरांना उत्तर भारतात जाण्यासाठी महत्त्वाची ठरते. पुणे, मध्यप्रदेश तसेच दिल्ली गाठण्यासाठी प्रवासी याच रेल्वेचा वापर करतात. वर्षभरापूर्वी या एक्स्प्रेसला आधुनिक रूप देण्यासाठी एलएचबी कोच बसविण्यात आले. परंतु, एलएचबी कोच बसविताना नॉन एसी स्लीपर दोनच डबे देण्यात आले. पूर्वी नॉन एसी स्लीपर नऊ डबे होते. परंतु, अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे सध्या केवळ दोनच डबे असल्याने प्रवाशांची चेंगराचेंगरी होत आहे. वास्को येथून निघणारी गोवा एक्स्प्रेस नैर्त्रुत्य रेल्वेकडून चालविली जाते. परंतु, या एक्स्प्रेसला दोन जनरल डबे व दोन नॉन एसी स्लीपर डबे देण्यात आले आहेत. या रेल्वेला गर्दी पाहता 10 ते 12 नॉन एसी डबे देणे गरजेचे आहे. जनरल डब्यात गर्दी झाल्यास प्रवासी नॉन एसी स्लीपर डब्यात शिरत आहेत. त्यामुळे बुकिंग करूनदेखील प्रवाशांना वादावादी करत प्रवास करावा लागत आहे.
गोवा एक्स्प्रेसला वेगळा न्याय का?
बेळगावमधून धावणाऱ्या बेळगाव-बेंगळूर सुपरफास्ट व कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्स्प्रेसला 9 ते 10 नॉन एसी डबे जोडण्यात आले आहेत. परंतु, गोवा एक्स्प्रेसला केवळ 2 नॉन एसी स्लीपर डबे देण्यात आल्याने आरक्षण करतानाही अडचणी येत आहेत. बेळगावहून पुण्याला जाण्यासाठी ही एक्स्प्रेस महत्त्वाची ठरत असल्याने प्रवाशांची मोठी मागणी आहे. परंतु, अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. गोवा एक्स्प्रेसला दररोजची होणारी चेंगराचेंगरी नैर्त्रुत्य रेल्वे प्रशासनाला दिसत नाही का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.