बाजारपेठेत पार्किंग फी वसुली

नरगुंदकर भावे चौकातील प्रकार : भूभाडे पावतीचा आधार बेळगाव : नरगुंदकर भावे चौकात दत्त मंदिर शेजारी वाहने लावणाऱ्या वाहनचालकांकडून पार्किंग शुल्क वसूल केले जात आहे. पार्किंग शुल्क घेतल्यानंतर त्यांना दिली जाणारी पावती ही भूभाड्याची आहे. त्यामुळे ही निव्वळ वाहनचालकांची लूट असून महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच असे प्रकार घडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. बेळगावची मुख्य बाजारपेठ […]

बाजारपेठेत पार्किंग फी वसुली

नरगुंदकर भावे चौकातील प्रकार : भूभाडे पावतीचा आधार
बेळगाव : नरगुंदकर भावे चौकात दत्त मंदिर शेजारी वाहने लावणाऱ्या वाहनचालकांकडून पार्किंग शुल्क वसूल केले जात आहे. पार्किंग शुल्क घेतल्यानंतर त्यांना दिली जाणारी पावती ही भूभाड्याची आहे. त्यामुळे ही निव्वळ वाहनचालकांची लूट असून महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच असे प्रकार घडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. बेळगावची मुख्य बाजारपेठ असणाऱ्या गणपत गल्ली, मारुती गल्ली कॉर्नरवर भाजी, तसेच इतर साहित्याची विक्री केली जाते. रस्त्याशेजारी विक्री करणाऱ्या विव्रेत्यांकडून महानगरपालिका भूभाडे वसूल करते. यासाठी कंत्राट देण्यात आले असून त्यांचे कामगार दिवसाला एकदा भूभाडे वसूल करतात. परंतु, नरगुंदकर भावे चौकातील दत्त मंदिराशेजारी वाहने लावणाऱ्या कामगारांकडून भूभाडे वसूल केले जात आहे. पार्किंग शुल्कच्या नावाखाली भूभाड्याची पावती दिली जात असल्याने हा एकूणच प्रकार संशयास्पद असल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. रविवारी दुपारी निलेश गोरक्ष यांनी या प्रकाराविरुद्ध आवाज उठविला. पार्किंग शुल्कच्या नावाखाली वसुली करण्याचा अधिकार कोणी दिला? असा सवाल करताच संबंधित कर्मचाऱ्याने तेथून काढता पाय घेतला. महानगरपालिकेने या ठिकाणी पे अॅण्ड पार्क केले नसतानाही वसुली केली जात असल्याने याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागू, असेही निलेश यांनी सांगितले.
अधिकार कोणी दिला?
दररोज शेकडो वाहनचालक या परिसरात दुचाकी वाहने लावत असतात. त्यांच्याकडून पार्किंगच्या नावाखाली पैसे वसूल केले जात आहेत. पैसे वसुलीचा अधिकार त्यांना नेमका कोणी दिला? असा प्रश्न वाहनचालकांमधून विचारला जात आहे.