बारावी परीक्षा संपताच पेपर तपासणी

उद्या होणार शेवटचा पेपर : शनिवारपासून पाच केंद्रांवर नऊ विषयांसाठी पेपर तपासणी बेळगाव : बारावीची परीक्षा अंतिम टप्प्यात आली असून शुक्रवार दि. 22 रोजी अंतिम पेपर होणार आहे. यामुळे मूल्यमापन प्रक्रियेसाठी पदवीपूर्व शिक्षण विभागाने तयारी सुरू केली आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात एकूण पाच केंद्रांवर नऊ विषयांसाठी पेपर तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे वेळेत निकाल देणे […]

बारावी परीक्षा संपताच पेपर तपासणी

उद्या होणार शेवटचा पेपर : शनिवारपासून पाच केंद्रांवर नऊ विषयांसाठी पेपर तपासणी
बेळगाव : बारावीची परीक्षा अंतिम टप्प्यात आली असून शुक्रवार दि. 22 रोजी अंतिम पेपर होणार आहे. यामुळे मूल्यमापन प्रक्रियेसाठी पदवीपूर्व शिक्षण विभागाने तयारी सुरू केली आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात एकूण पाच केंद्रांवर नऊ विषयांसाठी पेपर तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे वेळेत निकाल देणे पदवीपूर्व विभागाला शक्य होणार आहे. पदवीपूर्व द्वितीय वर्षाच्या अंतिम परीक्षेला 1 मार्चपासून प्रारंभ झाला. विज्ञान, वाणिज्य व कला शाखेच्या विद्यार्थ्यांच्या टप्प्याटप्प्याने परीक्षा घेण्यात आल्या आहेत. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 42 परीक्षा केंद्रांवर परीक्षा झाल्या. शुक्रवार दि. 22 रोजी बारावीचा अंतिम पेपर होणार आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून पेपर तपासणीला सुरुवात करण्यात येणार आहे. बारावीच्या परीक्षा संपताच दुसऱ्याच दिवशी मूल्यमापन प्रक्रियेला सुरुवात होत असल्याने प्राध्यापकवर्गातून काहीशी नाराजी आहे. मागील महिनाभरापासून बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने प्राध्यापकांच्या पर्यवेक्षक म्हणून नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. यामुळे परीक्षेच्या कामात असणाऱ्या प्राध्यापकांना किमान दोन दिवस तरी विश्रांती मिळाली असती तर बरे झाले असते, असे प्राध्यापकांचे म्हणणे आहे.
वेळेत निकाल लागण्यासाठी प्रयत्न
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात पाच केंद्रांवर पेपर तपासणी केली जाणार आहे. ज्योती पदवीपूर्व महाविद्यालयात अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र, आरएलएस कॉलेजमध्ये इंग्रजी, जैन पीयू कॉलेजमध्ये कन्नड, समिती पीयू कॉलेजमध्ये हिंदी व समाजविज्ञान, शेख पीयू कॉलेजमध्ये हिंदी, मराठी व भूगर्भशास्त्र या विषयांचे पेपर तपासणी होणार आहे. पदवीपूर्व शिक्षण विभागाने यासाठी वेळापत्रक तयार केले असून त्यानुसार वेळेत निकाल लागण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
जिल्ह्यात परीक्षा सुरळीत
बारावीच्या परीक्षा अंतिम टप्प्यात आल्या आहेत. यावर्षी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात सुरळीतपणे परीक्षा पार पडल्या असून आता मूल्यमापनासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. पुढील अभ्यासक्रमांना वेळेत प्रवेश घेता यावा, यासाठी लवकर निकाल लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
–  एम. एम. कांबळे  (जिल्हा शिक्षणाधिकारी, पदवीपूर्व शिक्षण विभाग)