पंकज अडवाणीचे सलग दोन विजय

आशियाई बिलियर्ड्स चॅम्पियनशिप वृत्तसंस्था/ रियाध भारताचा प्रमुख बिलियर्ड्स व स्नूकरपटू पंकज अडवाणीने 2024 आशियाई बिलियर्ड्स चॅम्पियनशिपची झोकात सुरुवात करताना आँग फीओ व युतापोप पाकपोज यांच्यावर विजय मिळविले. 38 वर्षीय पंकज आशियाई बिलियर्ड्स जेतेपदाची हॅट्ट्रिक करण्यासाठी प्रयत्नशील असून त्याने येथील पहिल्या सामन्यात म्यानमारच्या आँग फीओचा 4-2 फ्रेम्सनी पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या रोमांचक लढतीत थायलंडच्या पाकपोजवर 4-3 […]

पंकज अडवाणीचे सलग दोन विजय

आशियाई बिलियर्ड्स चॅम्पियनशिप
वृत्तसंस्था/ रियाध
भारताचा प्रमुख बिलियर्ड्स व स्नूकरपटू पंकज अडवाणीने 2024 आशियाई बिलियर्ड्स चॅम्पियनशिपची झोकात सुरुवात करताना आँग फीओ व युतापोप पाकपोज यांच्यावर विजय मिळविले.
38 वर्षीय पंकज आशियाई बिलियर्ड्स जेतेपदाची हॅट्ट्रिक करण्यासाठी प्रयत्नशील असून त्याने येथील पहिल्या सामन्यात म्यानमारच्या आँग फीओचा 4-2 फ्रेम्सनी पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या रोमांचक लढतीत थायलंडच्या पाकपोजवर 4-3 अशी मात केली. ‘स्पर्धेची सकारात्मक सुरुवात करणे नेहमीच आनंददायक असते. या दोन विजयांनी माझा आत्मविश्वास दुणावला असून मी ध्येयावर लक्ष केंद्रित केले आहे,’ असे पंकज नंतर म्हणाला.
पहिल्या सामन्यातील पहिली फ्रेम पंकजने 100-35 अशी जिंकताना 86 चा सर्वात मोठा ब्रेक नोंदवला. दुसऱ्या फ्रेममध्येही हा जोम कायम ठेवत त्याने 104-34 अशी मात केली. तिसऱ्या फ्रेममध्ये फीओने झुंजार खेळ करीत पंकजवर 101-83 अशी मात केली. चौथी प्रेम फीओने 100-35 अशी घेत 2-2 अशी बरोबरी साधली. निर्णायक फ्रेम पंकजने 100-23 अशी जिंकून विजय साकार केला. दुसऱ्या सामन्यात पंकजने पहिली फ्रेम 100-00 अशी एकतर्फी जिंकली, त्यात 93 चा मोठा ब्रेक होता. वर्चस्व कायम राखत पंकजने दुसरी फ्रेम 101-03 अशी जिंकली. नंतर पाकपोजने मुसंडी मारत तिसरी प्रेंम 100-61 तर चौथी प्रेम पंकजने 102-05 अशी जिंकली. पंकजने यावेळी 99 गुणांचा ब्रेक नोंदवला. पाचव्या फ्रेममध्ये पाकपोजने पुन्हा जिगरबाज खेळ करीत 101-79 असा विजय मिळविला, त्यानंतर पुढची प्रेम 100-80 अशी घेत पंकजशी बरोबरी साधली. निर्णायक प्रेममध्ये पंकजने मानसिक कणखरता दाखवत 100-18 असा विजय मिळवित सामना संपवला.