पंचवर्षपूर्तीनिमित्त आता ‘पंचायत चलो’ अभियान

येत्या 27 पासून ग्रामस्तरीय मेळावे : सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचविणार,मुख्यमंत्र्यांची माहिती पणजी : लोकसभा निवडणूक आणि प्रमोद सावंत यांच्या मुख्यमंत्रीपदाची पंचवर्षपूर्वी एकाचवेळी आल्याने या अपूर्व योगायोगाची संधी साधत संपूर्ण मंत्रिमंडळाने गावोगावी जाऊन लोकांमध्ये मिसळण्याचे ठरविले आहे. या कार्याला ‘पंचायत चलो’ अभियान असे नावही देण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे हा संपूर्ण उपक्रम लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू […]

पंचवर्षपूर्तीनिमित्त आता ‘पंचायत चलो’ अभियान

येत्या 27 पासून ग्रामस्तरीय मेळावे : सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचविणार,मुख्यमंत्र्यांची माहिती
पणजी : लोकसभा निवडणूक आणि प्रमोद सावंत यांच्या मुख्यमंत्रीपदाची पंचवर्षपूर्वी एकाचवेळी आल्याने या अपूर्व योगायोगाची संधी साधत संपूर्ण मंत्रिमंडळाने गावोगावी जाऊन लोकांमध्ये मिसळण्याचे ठरविले आहे. या कार्याला ‘पंचायत चलो’ अभियान असे नावही देण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे हा संपूर्ण उपक्रम लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी उरकला जाणार आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर प्रमोद सावंत यांनी त्या पदाची सूत्रे हाती घेतली. येत्या 19 मार्च रोजी ते आपल्या कारकिर्दीची पाच वर्षे पूर्ण करत आहेत. त्यानिमित्त सरकारला राज्यस्तरावर विविध कार्यक्रम आयोजित करण्याची इच्छा होती. परंतु त्याच कालावधीत अर्थात मार्चपर्यंत राज्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंचवर्षपूर्तीचा हा सोहळा तत्पूर्वीच उरकण्याच्या दृष्टीने सरकारने तयारी सुरू केली आहे. गुऊवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री सावंत यांनीच ही माहिती दिली. मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर आपण मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर 2022 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्याने आपणच मुख्यमंत्रिपदी कायम राहिलो. त्याला येत्या 19 मार्च रोजी पाच वर्षे पूर्ण होत आहेत. या पंचवर्षपूर्तीचेनिमित्त साधून आम्ही पुन्हा एकदा लोकांमध्ये जाण्याची संधी घेणार आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
आपण मार्चमध्ये मुख्यमंत्रिपदाची पाच वर्षे पूर्ण करत आहे. परंतु त्या दरम्यान लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू होऊ शकते. ही शक्यता गृहित धरूनच आम्ही हे अभियान आगावू आयोजित करत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. येत्या दि. 27 पासून ‘पंचायत चलो अभियान’ प्रारंभ होत आहे. सरकारमधील प्रत्येक मंत्री राज्यातील बाराही तालुक्यातील पंचायतींना भेटी देऊन लोकांशी संवाद साधणार आहेत. त्यांच्या तक्रारी, गाऱ्हाणी, मागण्या ऐकणार आहेत. त्या दरम्यान सरकारच्या विविध योजना, उपलब्धी यांचीही माहिती लोकांना देण्यात येणार आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. समाजातील अंत्योदय घटकापर्यंत पोहोचण्याचा आमचा मानस आहे. सरकारी योजनांचा प्रत्येकाला लाभ मिळाला पाहिजे, या हेतूने ‘स्वयंपूर्ण गोवा 2.0’ कार्यक्रमाचा आढावाही घेण्यात येणार आहे. दि. 4 मार्च रोजी आयोजित कार्यक्रमातून ’व्हिजन फॉर ऑल’ मोहिमेंतर्गत राज्यातील सुमारे 30 हजार विद्यार्थ्यांना चष्म्यांचे वाटप करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. महिला दिनाचे औचित्य साधून महिला आणि बालविकास तसेच ग्रामीण विकास अधिकारिणी यांच्यातर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. त्याशिवाय पर्यटन खात्यातर्फे युवा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहितीही सावंत यांनी दिली.
ईएसआयमधील ‘ते’ कर्मचारी आता कंत्राटी म्हणून नियुक्त
गत सुमारे 20 वर्षांपासून अर्धवेळ तत्त्वावर काम करणाऱ्या ईएसआयधील 40 कामगारांना कंत्राटी कर्मचारी म्हणून नियुक्त करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. गेल्या सुमारे 20 वर्षांपासून हे कामगार काम करत होते. त्यांना आता कंत्राटी कर्मचारी म्हणून नियुक्त करण्यात येणार असून आधी मिळणाऱ्या ऊ. 15,000 वरून त्यांचे वेतन ऊ. 25,000 करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. नुकत्याच संपलेल्या विधानसभा अधिवेशनात मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी यासंबंधी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्या कामगारांप्रश्नी गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता करण्यात आली आहे.
खाण करारावर स्वाक्षरी करण्यास वेदांताला मंजुरी
राज्य मंत्रिमंडळाने डिचोली येथील वेदांता कंपनीला खाण विकास आणि उत्पादन करारावर स्वाक्षरी करण्यास मान्यता दिली. डिचोली येथे असलेल्या या खनिज ब्लॉक -1 मध्ये बोर्डे, लामगाव, मुळगाव, मये आणि शिरगाव आदी गावांचा समावेश आहे. वेदांताने हल्लीच आपल्या खनिज ब्लॉकसाठी पर्यावरण मंजुरी मिळविली असून अशी मंजुरी मिळविणारी ती एकमेव कंपनी ठरली आहे. खाण कराराचे महत्त्व अधोरेखित करताना मुख्यमंत्री सावंत यांनी, खाण विकास आणि उत्पादन करार तसेच खाण लीज कराराला मंजुरी देण्यास सरकार तयार असल्याचे सांगितले. हा करार आधीच्या लिलावात झालेल्या कराराच्या आश्वासनाची पूर्तता करतो. गोव्याच्या खाण क्षेत्रासाठी महत्त्वाचा क्षण असून या कराराचा पहिला लाभार्थी म्हणून वेदांत पुढाकार घेत आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.