पंचतंत्र : बगळा आणि मुंगूस
एका घनदाट जंगलात एक भल्यामोठ्या वृक्षावर अनेक बगळे राहायचे. त्या वृक्षाच्या खोडाजवळ म्हणजे पायथ्याशी एक साप देखील राहायचा. हा दुष्ट साप बगळ्याची पिल्ले खाऊन टाकायचा. आता के बगळा आपले पिल्ले साप खाऊन टाकतो म्हणून उदास झाला व एका नदीच्या किनाऱ्यावर जाऊन बसला. त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आले.
उदास बगळ्याला पाहून खेकडा म्हणाला की, बगळे दादा काय झाले तुम्ही असे उदास का बसले आहात?त्यावर बगळा म्हणाला की, काय करू खेकडे दादा एक साप माझ्या पिल्लांना खाऊन टाकतो. समजत नाही आहे मी त्या सापाचा सामना कसा करू ते. तुमच्याकडे जर काही उपाय असेल तर मला सांगाल.
आता खेकड्याने मनात विचार केला की, हा बगळा माझा जन्मजात शत्रू आहे, मी त्याला एक उपाय सांगेन जो सापासह त्याचा नाश करेल. आता खेकडा बगळ्याला म्हणाला की, एक काम करा, मांसाचे तुकडे घ्या आणि मुंगूसाच्या बिळासमोर ठेवा. त्यानंतर त्या बिळापासून सापाच्या बिळापर्यंत अनेक तुकडे पसरवा. मुंगूस ते तुकडे खाऊन सापाच्या बिळापर्यंत येईल. आणि जर त्याला तिथे साप दिसला तर तो त्याला ठार करेल. बगळ्याला खेकड्याने सुचवलेली युक्ती आवडली. बगळ्यानेही तेच केले. तसेच ठरल्याप्रमाणे तसेच झाले. मुंगूसाने साप खाल्ला पण सापानंतर त्या झाडावर राहणाऱ्या बगळ्यांनाही खाऊन टाकले. बगळ्याने उपाय तर केला पण परंतु त्याचे इतर परिणाम विचारात घेतले नाहीत. त्याच्या मूर्खपणाचे फळ त्याला मिळाले.
तात्पर्य : कोणतेही कार्य करण्यापूर्वी आधी विचार करावा.
Edited By- Dhanashri Naik