गुंजी परिसरात दमदार पावसामुळे उगवलेले भात पाण्याखाली

वार्ताहर /गुंजी गुरुवारी सायंकाळी गुंजीसह परिसरात दमदार पावसाने झोडपल्याने भात पेरणी खोळंबली. विजेच्या कडकडाटासह पावसाला प्रारंभ झाल्याने शेतकरी वर्गाची धांदल उडाली. भात बी, खते पावसापासून सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागली. तब्बल तासभर पाऊस झाल्याने शेतामध्ये पाणीच पाणी झाले. गेल्या दहा-बारा दिवसापासून या परिसरामध्ये भात पेरणीस प्रारंभ केला होता. सुरुवातीस या भागामध्ये वळिवाने वेळोवेळी हुलकावणी […]

गुंजी परिसरात दमदार पावसामुळे उगवलेले भात पाण्याखाली

वार्ताहर /गुंजी
गुरुवारी सायंकाळी गुंजीसह परिसरात दमदार पावसाने झोडपल्याने भात पेरणी खोळंबली. विजेच्या कडकडाटासह पावसाला प्रारंभ झाल्याने शेतकरी वर्गाची धांदल उडाली. भात बी, खते पावसापासून सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागली. तब्बल तासभर पाऊस झाल्याने शेतामध्ये पाणीच पाणी झाले. गेल्या दहा-बारा दिवसापासून या परिसरामध्ये भात पेरणीस प्रारंभ केला होता. सुरुवातीस या भागामध्ये वळिवाने वेळोवेळी हुलकावणी दिल्याने पेरणीपूर्व मशागत झाली नव्हती. मात्र पंधरा दिवसापूर्वी सलग दोन-तीन दिवस पाऊस झाल्यामुळे येथील शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीस प्रारंभ करून पेरणी सुरू केली होती. सध्या या भागातील जवळजवळ निम्म्याहून अधिक पेरणी झाली असली तरी मजुरांचा आणि ट्रॅक्टरचा तुटवडा भासत असून पेरणीस विलंब होत असल्याचे शेतकऱ्यातून सांगितले जात आहे. सध्याच्या पावसामुळे काही शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या असल्या तरी यापूर्वी पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना हा पाऊस दिलासादायक आहे. मात्र मान्सून उंबरठ्यावर ठेपल्याने काही दिवस उघडिपीची गरजही आहे.